lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Inspirational > सत्तरीच्या आजी जगभर करतात एकटीने प्रवास, डॉ. सुधा महालिंगम या भन्नाट आजींना भेटा.

सत्तरीच्या आजी जगभर करतात एकटीने प्रवास, डॉ. सुधा महालिंगम या भन्नाट आजींना भेटा.

डॉ. सुधा महालिंगम या सत्तरीतल्या आजीची गोष्टच न्यारी. या वयातही एकटीनं प्रवास करण्याची, साहसी मोहिमांवर जाण्याची त्यांच्यातली आवड आणि हौस कायम आहे. नुसतीच ती सांगण्यासाठी नसून त्या एकट्यानं प्रवास करतात, साहसी मोहिमांमधे सहभागी होवून या मोहिमांमधील अनपेक्षित क्षणांचा अनुभव आणि आनंद घेतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 03:01 PM2021-09-03T15:01:54+5:302021-09-03T15:14:06+5:30

डॉ. सुधा महालिंगम या सत्तरीतल्या आजीची गोष्टच न्यारी. या वयातही एकटीनं प्रवास करण्याची, साहसी मोहिमांवर जाण्याची त्यांच्यातली आवड आणि हौस कायम आहे. नुसतीच ती सांगण्यासाठी नसून त्या एकट्यानं प्रवास करतात, साहसी मोहिमांमधे सहभागी होवून या मोहिमांमधील अनपेक्षित क्षणांचा अनुभव आणि आनंद घेतात.

70 years old Dr. Sudha Mahalingam travels solo in world and makes her dream true | सत्तरीच्या आजी जगभर करतात एकटीने प्रवास, डॉ. सुधा महालिंगम या भन्नाट आजींना भेटा.

सत्तरीच्या आजी जगभर करतात एकटीने प्रवास, डॉ. सुधा महालिंगम या भन्नाट आजींना भेटा.

Highlightsनोकरीतला व्यस्त दीनक्रम, घरातल्या कामाच्या जबाबदार्‍या यामुळे महालिंगम यांना ठरवून, आखून रेखून प्रवास करण्याची सवय नव्हती. तीच सवय त्यांनी आजही कायम ठेवली.एकटीनं प्रवास करण्यासोबतच सुधा महालिंगम यांना स्कुबा डायव्हिंग, हॅंग ग्लायडिंग, ट्रेकिंग या साहसी मोहिमा करण्याचीही आवड आहे. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियातील उलुरु येथे स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवला.सुधा म्हणतात की , एकटीनं प्रवास करताना त्यांच्यातलं साहस जसं वाढलं तशाच त्यांना अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. लोकांवरचा, त्यांच्यातल्या मानवतेवरचा विश्वास पक्का केला. छायाचित्रं- गुगल

 वयाची सत्तरी गाठलेल्या आज्या काय करतात. आपल्या आरोग्यास, शरीरास जपत झेपेल तितकं काम करत मुलाबाळात रमतात, आराम करतात. पण डॉ. सुधा महालिंगम या सत्तरीतल्या आजीची गोष्टच न्यारी. या वयातही एकटीनं प्रवास करण्याची, साहसी मोहिमांवर जाण्याची त्यांच्यातली आवड आणि हौस कायम आहे. नुसतीच ती सांगण्यासाठी नसून त्या एकट्यानं प्रवास करतात, साहसी मोहिमांमधे सहभागी होवून या मोहिमांमधील अनपेक्षित क्षणांचा अनुभव आणि आनंद घेतात. एकटीन केलेल्या प्रवासानं त्यांना केवळ जगायलाच शिकवलं असं नाही तर जगण्याच्या किती तर्‍हा असू शकतात हे त्यांनी जवळून अनुभवलं.

तसं 25 एक वर्षापूर्वी आपल्याकडे बाईनं एकटीनं फिरणं ही काही समाजमान्य गोष्ट नव्हती. एकटीनं हट्टानं प्रवास करणार्‍या महिला म्हणजे हटवादी, समाजाचे,संस्कृतीचे नियम मोडणार्‍या मानल्या जायच्या. महिला प्रवसात एकटी स्वत:ची काळजी घेण्यास असर्मथ असतात असा समज रुढ होता. पण बाईच्या एकटीनं प्रवासाला चिकटलेले हे सर्व समज गैरसमज, चुकीच्या रुढी परंपरा सुधा महालिंगम यांनी मोडून काढल्या.

 छायाचित्र- गुगल

डॉ. सुधा महालिंगम या नवर्‍याच्या सोबत त्याच्या कामानिमित्त परदेशात जायच्या तेव्हा तिथल्या जागा एकटीनं फिरण्याच्या संधी त्यांना साद घालायच्या. या संधी त्यांनी कधीच दवडल्या नाहीत. त्यांच्या नवर्‍याला पर्यटनाची, फिरुन जागा बघण्याची अजिबात आवड नव्हती. ते सुधा यांना स्थानिक गाइड घेऊन फिरुन येण्यास सांगत. पण सुधा यांना हे असं गाइट घेऊन फिरणं मंजूर नसायचं. या अशा प्रवासात काहीच अनपेक्षित, रोमांचकारी राहात नाही. गाइड त्याला हव्या असलेल्या जागा दाखवत राहातो. आणि आपल्याला जे पाहायचं आणि अनुभवायचं असतं ते मात्र होतच नाही.

दोन दशकांपूर्वी सुधा महालिंगम यांनी मुख्य प्रवाहातील पत्रकारितेच्या नोकरीचा राजीनामा दिला. ऊर्जेवर त्यांनी संशोधन करण्यास सुरुवात केली. या संशोधनाच्या आणि अभ्यासाच्या निमित्ताने त्यांना तेल उत्पादन करणार्‍या देशांमधून आंतरराष्ट्रीय परिषदांमधे बोलण्यासाठी आमंत्रणं यायला लागली. आणि महालिंगम यांना पूर्णपणे एकटीनं फिरण्याची संधी मिळाली. अख्खं जग आपल्याला येण्यासाठी साद घालत आहे, असं त्यांना वाटू लागलं. आज वयाची सत्तरी गाठलेल्या सुधा महालिंगम या सहा खंडातील 66 देशात फिरुन आल्या आहेत. या प्रवासाच्या आठवणींबदल त्या ‘फूटलूज इंडियन’ या ब्लॉगवर लिहित असतात. शिवाय या प्रवासातील अनुभवांवर आधारित ‘द ट्रॅव्हल मस्ट बी क्रेझी’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे.

 छायाचित्र- गुगल

नोकरीतला व्यस्त दीनक्रम, घरातल्या कामाच्या जबाबदार्‍या यामुळे महालिंगम यांना ठरवून, आखून रेखून प्रवास करण्याची सवय नव्हती. पण या सवयींमुळे सुधा यांना अनेक अनपेक्षित घटनांनाही सामोरं जावं लागलं. झेक रिपल्ब्लिक देशात अधिकृत व्हिसा नसताना त्या पोहोचल्या, चीनमधे गेल्या तेव्हा शाकाहारी जेवण शोधताना त्यांची दमछाक झाली. इराणमधे एका स्मारकात त्या अडकून पडल्या तर केनयात नैरोबीच्या विमानतळावर उतरल्या तेव्हा त्त्यांच्याकडे पिवळ्या तापावरच्या लसीकरणाचा पुरावा नव्हता. महालिंगम यांनी आपल्या मित्र मैत्रिणींसोबत प्रवास केला असला तरी त्यांचे बहुतांश प्रवास हे एकटीने केलेले आहेत.

त्यांची सर्वात ताजी ट्रीप म्हणजे 2019 मधे त्यांनी मादागास्कर येथे केलेला प्रवास. ही जागा फारशी कोणाला माहित नव्हती . पर्यटनाच्या दृष्टीने तर ती योग्य जागा नव्हतीच. तिथे त्या बोटीनं प्रवास करत होत्या. प्रवास किती अवघड असू शकतो हे सांगताना सुधा महालिंग म्हणतात की त्या बोटीत शौचालयाची सोयच नव्हती. पण असे अवघड, अनवट , साहसी प्रवास करण्याचीच सुधा यांना आवड आहे. त्यांची अशीच एक साहसी ट्रिप म्हणजे दक्षिणपूर्व आशियातला बॉर्निओ येथील प्रवास. तिथे सरपटणारे अनेक भयानक किटक होते. अंगावर येणारी अशी मोठ्या पानांची झाडं होती. जमिनीवर चालताना आपल्या पायावर एखादा किटक चढला का हे ही त्यांना त्या घनदाट परिसरात कळत नसे. असा परिसर जिथे साप पायाला विळखा घालून बसला तरी कळायचं नाही. विंचू येवून अचानक डंख मारेल ही भीती तर असायचीच. पण एकटीनं , साहसी प्रवास करणं यावर त्यांचं भीतीपलिकडलं अतीव प्रेम होतं.

 छायाचित्र- गुगल

एकटीनं प्रवास करण्यासोबतच सुधा महालिंगम यांना स्कुबा डायव्हिंग, हॅंग ग्लायडिंग, ट्रेकिंग या साहसी मोहिमा करण्याचीही आवड आहे. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी ऑस्ट्रेलियातील उलुरु येथे स्कायडायव्हिंगचा थरार अनुभवला. सुधा यांना या मोहीमा करण्याचं विशेष वाटत नाही. त्या म्हणतात खिशात पैसे असले आणि मनात इच्छा असली की हे जमतं.

एकटीनं प्रवास करताना त्यांना अवघड , हादरवून टाकणार्‍या प्रसंगाचाही सामना करावा लागला. 1997 मधे त्या जेव्हा काश्मिर खोर्‍यात गेल्या होत्या तेव्हा एका लष्करी अधिकार्‍यानं त्यांना लिफ्ट दिली होती. त्यांच्या गाडीतून जाताना अतिरेक्यांनी पेरुन ठेवलेले बॉम्ब निकामी करणारं पथक येत असल्याचं त्यांनी पाहिलं. दुसर्‍या दिवशी विमानतळावर पोहोचताना त्यांना कळलं की ज्या लष्करी अधिकार्‍यानं त्यांना लिफ्ट दिली होती त्या अधिकार्‍याला सशस्त्र दहशतवाद्यांनी गोळी मारली. काश्मीरमधे फिरताना समोररुन गोळीबार होत असल्याचं त्यांनी पाहिलं. पण त्यावेळेस अंगावर रोमांच उभे करणार्‍या प्रसंगांनी सुधा मागे फिरल्या नाहीत.

सुधा म्हणतात की , एकटीनं प्रवास करताना त्यांच्यातलं साहस जसं वाढलं तशाच त्यांना अनेक गोष्टी शिकायलाही मिळाल्या. लोकांवरचा, त्यांच्यातल्या मानवतेवरचा विश्वास पक्का केला. दुर्गम भागात केलेल्या प्रवासांनी त्यांना अनोळखी संस्कृतीचा परिचय झाला आणि जगण्याच्या अनेक पध्दती जवळून बघता आल्या. ऑस्ट्रेलियातील दुर्गम भागात फिरताना सुधा यांना अबॉरिजिन्स नावाची एक जमात भेटली. जे निसर्गाच्या सान्निध्यात राहातात. ही पृथ्वी आणि त्यावरील सर्व जीवांबाबत त्यांच्यात अतीव प्रेम आणि आस्था होती. आणि म्हणूनच त्यांना पृथ्वीवर मानवजातच श्रेष्ठ आहे असं काही वाटत नव्हतं.

 छायाचित्र- गुगल

भारतातील छत्तीसगडमधील आदिवासीमधील प्रचलित   घोटूल प्रथा त्यांनी अनुभवली. तेथील वयात आलेले तरुण तरुणी एकत्र येतात, काम करतात, एकत्र राहातात. योग्य जोडीदार मिळेपर्यंत ते असेच राहातात. यादरम्यान कितीतरी वेळा त्यांचे साथीदार बदलतात. त्यांच्यात शारीरिक संबंधांची अनुभूती घेण्यातला मोकळेपणा सुधा यांना भावला. या प्रवासाता टोकाच्या हवामानाच्या प्रदेशात आनंदानं जगणारी, निसर्गाप्रती नम्र असणारी माणसं त्यांना भेटली.

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात बाहेरील देशात प्रवास करणं सुधा यांना अशक्य होतं. पण त्यांनी स्वत: गाडी चालवत भारतातल्या भारतात रोड ट्रीप केल्या. त्यांनी बंगळूरवरुन गोव्यापर्यंतचा 16 तासांचा प्रवास न थांबता केला. जेव्हा आंतराष्ट्रीय प्रवासावरची बंधनं हटतील तेव्हा त्यांना कोलोंबिया, पॅण्टागोनिया, चिली, अर्जेंटिना या देशात प्रवासाला जायचं आहे अर्थात एकटीनं.

सुधा म्हणतात, की पुढील दहा वर्ष दरवर्षी 3 ठिकाणं याप्रमाणे फिरायचं ठरवलं तरी प्रवासाची यादी संपणार नाही. भरपूर काही फिरायचं तेव्हाही बाकीच असेल. आणि आपण तेव्हाही नक्की एकट्यानं फिरणार हा डॉ. सुधा महालिंगम यांना वाटणारा विश्वास इच्छाशक्तीला वयाची बंधनं नसतात हेच दाखवून देतो.

(सौजन्य : सीएनएन ट्रॅव्हल)

Web Title: 70 years old Dr. Sudha Mahalingam travels solo in world and makes her dream true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.