An importance of Artist's personal staff | कलाकारांचा पर्सनल स्टाफ म्हणजे चहापेक्षा किटली गरम !

कलाकारांचा पर्सनल स्टाफ म्हणजे चहापेक्षा किटली गरम !

- योगेश गायकवाड

पूर्वी म्हणजे राजेश खन्नाच्या काळात   ‘हिरोईन की माँ’ हा निर्मात्याच्या डोक्याचा ताप असायचा. बहुतेक प्रत्येक हिरोइनबरोबर तिची आई फ्री असायची. शूटिंगवाल्यांच्या जालीम दुनियेत आपल्या निरागस बेबीची काळजी घेण्यासाठी तिची आई सोबत येण्याची प्रथा होती. आपल्या राजकन्येच्या डोक्यावर छत्री धरली जाते आहे की नाही हे बघणे , दर काही वेळाने तिला ज्यूस पाजणे , लवकर काम संपवण्यासाठी दिग्दर्शकावर दबाव टाकणे , फावल्या वेळात उगाच लगट करायला येणा-या हिरोच्या ‘बु-या’ नजरेपासून तिचा बचाव करणे , तिला काय हवं आहे पेक्षा काय काय नको आहे ते बघणे , अशा अनेक जबाबदा-या पार पाडण्याच्या नादात ती प्रॉडक्शनच्या लोकांना वैताग आणायची.
- पण आजकाल या ‘हिरोईनच्या माय माउली’ अगदी अभावानेच कुठेतरी दिसतात. कारण जसजशी चित्रपट आणि मालिकांच्या निर्मितीच्या क्षेत्रात व्यावसायिकता येत गेली तशी हिरोईनच्या आईची जागा हिरोईनच्या ‘पर्सनल स्टाफ’ने घेतली आहे. आता हिरो-हिरोईन पॅकेजमध्ये येतात. हिरोईन, तिचा मॅनेजर, पर्सनल मेकअपमन पर्सनल हेअर ड्रेसर, ड्रायव्हर आणि पर्सनल बॉय असा सगळा संच मॅडमसोबत येतो. आता ‘पर्सनल मेकअपमन’ ही काय भानगड आहे? तर त्याचं असं असतं की सर्वसामान्यपणो नट-नटय़ांच्या दिमतीला मेकअपमन, हेअर ड्रेसर आणि एक स्पॉट बॉय देणो ही त्या निर्मिती संस्थेची म्हणजेच ‘प्रॉडक्शन’ची जबाबदारी असते. पण जसजसे कलाकार इंडस्ट्रीमध्ये मुरू लागतात तसतसे त्यांना हे मंडळाचे कार्यकर्ते चालेनासे होतात आणि ते स्वत:च्या सेवेसाठी असा ‘पर्सनल स्टाफ’ ठेवतात. आणि मी शूटिंगला यायला हवी/हवा असेल तर माझाच स्टाफ निर्मात्याला हायर करावा लागेल, अशी अट घालतात. निर्मात्याला हा महागडा ‘पर्सनल स्टाफ’ नाइलाजाने स्वीकारावा लागतो. माझ्या आजवरच्या अनुभवात दर वेळी मी चहापेक्षा या किटल्याच गरम असलेल्या पाहिलेल्या आहेत.
..अशी ही हिरोईनच्या माहेरची माणसं प्रॉडक्शनचे जावई असल्याच्या थाटात शूटिंगच्या ठिकाणी वावरत असतात. पर्सनल मेकअप आणि हेअर ड्रेसर दिग्दर्शकाने सांगितल्याप्रमाणो त्यांच्या राजकन्येला तयार करतात खरे; पण त्यासाठी ते किती वेळ घेतील याचा काहीच नेम नसतो. सगळी तयारी झाली आणि आता दिग्दर्शक  ‘अँक्शन’ म्हणणार तेवढय़ात तिच्या या खासगी सेवकांना आपल्या कर्तव्याची तीव्र जाणीव होते आणि ते हिरोईनच्या चेह-या समोर आरसा-फणी घेऊन उभे राहतात. आता त्यांनी एवढा समोर आणलाच आहे म्हटल्यावर ती सुंदरीपण आरशाचा मान राखत उगाच एकदा कपाळावरची बट कानामागे अडकवून घेते. बिचारा दिग्दर्शक तोवर हताशपाणे हा ‘पर्सनल शृंगार’ बघत बसून राहतो. कसा बसा शॉट पूर्ण होत नाही तर लगेच हिरोइनचा ताबा तिचा मॅनेजर घेतो. चाहत्यांनी तिच्या सोबत सेल्फी कधी घ्यायची पासून ते बेबीच्या ब्लाउजचा गळा किती खोल असावा? इथर्पयतचे सगळे निर्णय बेबीच्या वतीने आणि अर्थातच तिच्या सांगण्यावरून तोच घेत असतो. त्याला ओलांडून  कामाचं काही बोलण्यासाठी म्हणून युनिट मधल्या कोणाला जर हिरोईनला भेटायचं असेल तर तिचा  ‘पर्सनल  बॉय’ नावाचा एक भला मोठा अडथळा त्यांना आडवा येतो. पार्वतीच्या न्हाणीघराबाहेर उभ्या  बालगणोशाने ज्या कर्तव्यदक्षतेने आपल्या बापालाच अडवलं होतं, त्याच किंबहुना त्याहीपेक्षा काकणभर जास्त दक्षतेने हा   ‘पर्सनल बॉय’ साक्षात निर्मात्यालाच अडवण्याची पूर्ण क्षमता बाळगून असतो. आजकालच्या नट-नटय़ांच्या आयुष्यात या व्यक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. साधारणपणो हातात मोठी छत्री, गळ्यात एक स्लिंग आणि कमरे भोवती गुंडाळलेला एक पाऊच, असा त्याचा थाट असतो. हिरोईनला शूटिंगच्या वेळी प्रत्यक्ष लागणा-या आणि प्रसंगी फक्त दिखावा करण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टींचा साठा त्याने स्वत:च्या अंगाखांद्यावर लादलेला असतो. मॅडम कॅमे-यासमोर गेल्या की त्यांचा मोबाइल फोन सांभाळण्याची अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची जबाबदारी या इसमाकडे असते. हिरोईनने तिचा फोन ज्याच्या स्वाधीन करावा, अशी ही व्यक्ती साधी सुधी कशी असू शकेल? हा विश्वास संपादन करण्यासाठी त्याला किती साधना करावी लागली असेल? हिरोईनला जोवर पर्सनल बाउन्सर ठेवणे परवडत नाही तोवर हाच तिचा बॉडीगार्डपण असतो. 
- अशा या प्रॉडक्शनच्या जावई मंडळींच्यातला शेवटचा म्हणजे हिरोईनचा ड्रायव्हर. मॅडमला सकाळी एकदा सेटवर आणून सोडलं की रात्री शूटिंग संपेर्पयत याला अक्षरश: काहीच काम नसतं. पण सेटवर कुठेही मुक्त संचार करण्याचा अलिखित परवाना असलेला हा समर्था घरचा चक्रधर, ‘ड्रायव्हर चौकशा’ करत नुसता कामाच्या माणसांच्या मधेमधे करत असतो. अशा या   ‘पर्सनल’ मंडळींना चुकून नियम शिकवण्याची गुस्ताखी जर प्रॉडक्शनवाल्यांनी केली तर हिरोईन मॅडमचा पापड कडकडा मोडतो आणि मेकअप रूमचं रूपांतर कोप भवनात होऊन जातं. आणि पुढचे कित्येक तास मग प्रॉडक्शन प्रमुखांना तिचा रुसवा काढण्यासाठी घालवावे लागतात. 
मी या दुनियेत जे काम करतो त्यात निर्मात्याच्या बाजूने शूटिंग बजेटमध्ये बसवण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने मला हा ‘पर्सनल स्टाफ’ नेहमीच नकोसा वाटतो. कारण त्यांच्या इतकाच  किंवा त्यांच्यापेक्षा जास्त कार्यक्षम स्टाफ माङया टीममध्ये असताना केवळ हिरो/हिरोईनचा हट्ट म्हणून जास्त पैसे मोजून त्यांना मला हायर करावं लागतं. एवढंच नाही तर प्रसंगी त्यांच्या मालकापेक्षा जास्त नखरेपण सहन करावे लागतात. 
पण या विषयाला एक दुसरी बाजूदेखील आहे. मुळात कोण असतात ही माणसं? तर दररोज नवीन काम शोधत फिरणारी आणि रोजंदारीवर काम करणारी मंडळी.
एक सिरिअल संपली की दुसरी मिळेर्पयत मध्ये दोन दोन महिनेसुद्धा जातात. त्या काळात घर कसं चालवायचं, रोजचा खर्च कसा भागवायचा मुलांच्या शिकवणीची फी कशी भरायची? - असे प्रश्न त्यांना भेडसावत असतात. बरं युनियनने ठरवून दिलेल्या रेटप्रमाणो एका हेअर ड्रेसरला 10 तास काम करण्याचे आणि त्याकरिता रोज किमान 2 तास प्रवास करण्याचे फक्त 750 रुपये मिळतात. 
आणि सगळ्यात वाईट म्हणजे, बारीकशी चूक झाली तरी शिव्या खायच्या मात्र चांगलं काम केलं तर कौतुक किंवा पुरेसं श्रेय कधीच त्यांच्या वाटय़ाला येत नाही. अशावेळी नट मंडळी जरा सेटल झाल्यावर यांच्यापैकी चांगलं काम करणारे मेकअपमन, हेअर ड्रेसर, स्पॉट बॉय किंवा चालक हेरतात आणि त्यांना आपल्याकडे महिन्याच्या पगारावर ठेवून घेतात. शूटिंग असो वा नसो त्यांना फिक्स पगार मिळू लागतो. आजारपणाला अचानक पैसा लागला तर उचल घ्यायला एक हक्काची जागा मिळते. खरी खोटी माहीत नाही; पण युनिटमध्ये थोडी जास्त प्रतिष्ठापण मिळते. त्यांच्या हक्कांना एक सुरक्षा कवच लाभतं.
आदेश बांदेकर यांच्या सोबत अशाच एका स्मार्ट मुलाला मी गेली कित्येक वर्ष बघतोय. तो आधी त्यांचा चालक होता, मेहनत आणि अक्कल हुशारीने त्यांचा मेकअप आर्टिस्ट आणि पुढे मॅनेजरपण झाला. आदेश दादा मोठय़ा भावासारखी त्याची काळजी घेतो आणि तोपण धाकटय़ा भावाच्या नात्याने त्यांची सेवा करतो. कलाकारांच्या ‘पर्सनल स्टाफ’पैकी सगळेच काही डोक्याला ताप असतात असं नाही. तुरळक अपवाद असतातही. 
काही सुजाण कलाकार मंडळी आपल्या स्टाफला योग्य प्रशिक्षण देत प्रोफेशनल बनवण्याचा  प्रामाणिक प्रयत्नदेखील करत असतात. पण मालिकेच्या किंवा सिनेमाच्या सेटवर मी लग्नकार्यातल्या मुलीच्या धाकटय़ा काकाच्या भूमिकेत असतो. त्यामुळे माझं या लोकांशी असलेलं नातं हे व्यवहाराच्या पातळीवर विळ्या भोपळ्याचंच असणार हे वास्तव आहे. 
पण माणुसकीच्या पातळीवर विचार केला तर त्यांचं हे ‘पर्सनल’ असणं मला 100टक्के  मान्य आहे कारण त्यामुळे त्यांच्या हाताला रोज काम मिळतं आणि त्यांच्या लेकरांची फी न चुकता भरली जाते.

(लेखक  सामाजिक विषयांवरील फिल्ममेकर आहेत.)

yogmh15@gmail.com

 

कलाकारांचा पर्सनल स्टाफ म्हणजे चहापेक्षा किटली गरम !                                                                                                                                                     

 

Web Title: An importance of Artist's personal staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.