Ideal school .. but only 300? | आदर्श शाळा.. पण फक्त ३००?

आदर्श शाळा.. पण फक्त ३००?

- हेरंब कुलकर्णी

राज्यातील ३०० शाळा आदर्श करण्याचा २६ ऑक्टोबरला शासन निर्णय आला. या निर्णयानुसार प्रत्येक तालुक्यात एक शाळा आदर्श होणार आहे. संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, क्रीडा साहित्य या सुविधा तिथे असतील. पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त दप्तरमुक्त शाळा असे उपक्रम राबवावेत. भाषा व गणितात प्रभुत्व मिळवावं, स्वयंअध्ययन - गटअध्ययन व्हावं आणि नवनिर्मिती, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन संविधानिक मूल्य आणि संभाषणकौशल्य विद्यार्थ्यांमध्ये येण्यासाठी उपक्रम करावेत, असं या शासन निर्णयात सुचवण्यात आलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षण संकुलाची कल्पना मांडण्यात आली आहे. त्यादृष्टीनं या शाळा संकुल म्हणून विकसित व्हाव्यात, अशी ही दिशा आहे.

             राजीव गांधींची प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय, मनमोहन सिंग यांची ६०० मॉडेल स्कूल ही अशीच कल्पना होती. केंद्र शाळा ही कल्पनाही अशीच होती; पण दुर्दैवानं अशा शाळांचं अनुकरण आजूबाजूच्या शाळांमध्ये होत नाही आणि शासन केवळ या निवडलेल्या शाळांवरच पैसा आणि शक्ती खर्च करते.

या नव्या शासन निर्णयात शाळांनी संविधानमूल्यं, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समीक्षात्मक विचार विकसित करावे, असा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. लोकशाही देशात लोकशाहीला अनुकूल स्वतंत्र विचार करणारे नागरिक तयार करणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘आपलं शिक्षण how to think शिकवत नाही तर what to think शिकवते. रेडिमेड उत्तरे देते. विद्यार्थ्यांना प्रश्न पडतील अशा चर्चा घडवायला हव्यात. विद्यार्थ्यांना विचार करायला भाग पाडायला हवं. समानता- स्वातंत्र्य-बंधुता या मूल्यांना राज्यघटना महत्त्व देते ती मूल्यं विद्यार्थ्यांमध्ये रुजावी असे उपक्रम शाळांमध्ये असायला हवेत. आपल्या देशातील अनेक अनिष्ट प्रथांवर विद्यार्थ्यांना अंतर्मुख करायला हवं. जातिव्यवस्था, परंपरा, स्रियांना दुय्यम वागणूक देणं, गरिबांकडे दुर्लक्ष, शारीरिक कष्टाला कमी लेखणं, आर्थिक विषमता, चंगळवादी जीवनशैली, टीव्ही, मोबाइलचा वापर अशा विषयांवर विद्यार्थी अंतर्मुख होतील, अशा चर्चा कल्पकतेनं घडवता येतील. यातून मतं व्यक्त करताना त्यांच्यात स्पष्टता येईल.

आदर्श शाळेत सुचवलेले उपक्रम राज्यातील सर्वच शाळांनी राबवायला हवेत ही आजची गरज आहे. सुदैवानं या उपक्रमात सुचवलेला ‘दप्तरमुक्त शाळा’ हा उपक्रम राज्यातील अनेक शाळा उत्स्फूर्तपणे राबवत आहेत.

काय घडतं या शाळेत?

- दर शनिवारी शाळेत कार्यानुभव, ठसेकाम, मेहंदी, रांगोळी मातीकाम, कागदकाम असे विषय शिकवले जातात.

- चित्रकलेचा, नाट्यकलेचा सराव केला जातो.

- प्रश्नमंजूषा व सामान्यज्ञान, पारंपरिक खेळ, शिक्षकांच्या, स्थानिक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या जातात. जीवनसत्त्व जेव्हा अन्नातून मिळत नाही तेव्हा ती औषधातून स्वतंत्रपणे द्यावी लागतात. त्याचप्रमाणे दैनंदिन अभ्यासक्रमात ज्या गोष्टी शिकवायच्या राहून जातात किंवा त्यावर भर देणं शक्य नसतं अशा गोष्टी या दप्तरमुक्त शाळा संकल्पना राबवून साध्य होणं शक्य आहे.

पण तरीही ३०० शाळाच ?

  शासन निर्णयात शाळेत चिकित्सक विचार करायला शिकविणं आणि पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे शिकवणं हा मांडलेला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आजचे शिक्षण केवळ पुस्तकी आहे, यात कौशल्यं मिळत नाहीत, विविध कला, अभिरुची विकसित होत नाही, अशी नेहमीच तक्रार केली जाते. नवीन रोजगाराच्या संधीत आता मार्कांपेक्षा व्यक्तीमधील विविध क्षमता बघितल्या जातात. आपले विचार सुस्पष्ट रीतीनं व्यक्त करणं याला महत्त्व दिलं जातं. यासाठी शाळेतच अशा गोष्टींवर भर देणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल; पण शासनानं केवळ ३०० शाळा असं न करता असे उपक्रम सर्वच शाळांना देणं गरजेचं आहे.

इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचं कारण केवळ भाषा हे नाही तर तेथे कला, क्रीडा, संगीत, व्यक्तिमत्त्व विकास, अभिव्यक्ती यावर भर दिला जातो. मराठी शाळेत या गोष्टींवर जर भर दिला गेला तर पालक मराठी शाळांना नक्कीच प्राधान्य देतील.

   ( लेखक प्रयोगशील शिक्षक आहेत.)                        

 herambkulkarni1971@gmail.com

Web Title: Ideal school .. but only 300?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.