I take my mother's name! So what? | मी लावलं आईचं नाव!
मी लावलं आईचं नाव!

-मुक्ता वंदना खरे


मला बोलता यायला लागलं व्हापासून मी माझ्या नावापुढे माझे  आई आणि वडील दोघांची आडनावं लावून नाव सांगायचे. दोन वर्षाची असताना माझे आईवडील वेगळे झाले. माझी आई मला घेऊन मुंबईला आली. नंतर शाळेत जायला लागल्यावर मला धक्काच बसला. माझ्या बाई मला म्हणाल्या, नाव ‘असं’ सांगायचं नसतं. एका नावाला दोन आडनावं नाही लावता येत. इथून पुढे लक्षात ठेव, नेहमी स्वत:चं नाव, वडिलांचं नाव आणि वडिलांचं आडनाव असंच नाव सांगायचं.
पण माझ्या नावात आईचं नाव नसून कसं चालेल? मी राहते आईबरोबर, आईच मला जेवायला देते, नवीन कपडे आणते. वडील तर कित्येक दिवसात दिसलेलेपण नाहीत. एवढं मला 5-6 वर्षाची असतानापण कळायचं. शाळेची सगळी वर्ष माझी खूप चिडचिड होत राहिली. तेव्हाच मला कळलं की, कायदेशीरपणो नाव बदलता येण्यासाठी अठरा वर्षाचं व्हावं लागतं. पण तरी मी त्यात एक चोर वाट शोधली होती. शाळेच्या बाहेर सगळीकडे मी माझं नाव मुक्ता खरे असंच सांगायचे. त्यामुळे माझी तशीच भक्कम ओळखसुद्धा तयार झाली होती. आता फक्त मुंबईत चर्नी रोडला त्या गॅङोट ऑफिस अर्थात नाव बदलायच्या ऑफिसमध्ये जाऊन नाव बदललं की झालं, असं मनात होतं ! 
अठराव्या वाढदिवसानंतर थोडे दिवसांनी मी नाचत नाचत चर्नी रोडला गेले. ऑफिसमध्ये पोहोचले, फॉर्म घेतला, भरला, भरलेला फॉर्म घेऊन एका काउण्टरवर गेले. तिथे एक बाई बसलेली. ती कुणाशीतरी बोलतेय असं मला वाटलं. आसपास बघितलं तर कोणी दिसेना. त्या बाईकडे नीट बघितलं तर ती फोनवरसुद्धा बोलत नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की, ती तिच्या टेबलखाली बसलेल्या मांजरीशी बोलतेय ! ट्रेनला गर्दी होती, अमुक भावाकडे जायचंय असं सगळं ती त्या मांजरीला सांगत होती. असो. तिने माङयाकडून फॉर्म घेतला, वाचला आणि तिच्या कपाळाला आठय़ा पडल्या. तिचं कन्फ्युजन लक्षात येऊन मी म्हंटलं हो, मला माझ्या आईचंच नाव लावायचं आहे. तिने विचारलं का? मी म्हटलं कारण मला तसं करायचं आहे. मी अठरा वर्षाची होईर्पयत आम्ही थांबलो होतो. ती म्हणाली पण का? तुम्हाला वडिलांचं नाव का बदलायचं आहे? मी म्हंटलं मला वडिलांचं नाही माझं स्वत:चं नाव बदलायचं आहे. ती थोडावेळ माङयाकडे बघत राहिली. मग म्हणाली तुम्ही आतमध्ये सरांना जाऊन भेटा. मी आत गेले. तिथल्या सरांना भेटले. तिथेपण वरचा संवाद रिपीट झाला. मला कळतच नव्हतं की या सगळ्यांना असं का वाटतंय की मला माझ्या वडिलांचं नाव बदलायचंय? शेवटी ते सर म्हणाले, तुम्ही असं करा, मंगळवारी या. ते अमुक अमुक सर आज आले नाहीयेत ते मंगळवारी येतील. आता माझ्या लक्षात आलं होतं की हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. मंगळवारी परत गेले. तिथून माङया मनस्तापाची लेवल वाढणार होती. त्यांनी मला सांगितलं की, मला वडिलांचं एनओसी आणावं लागेल. एनओसी म्हणजे मी नाव बदलण्याबद्दल माङया वडिलांची काही हरकत नाही याचा पुरावा. ज्या माणसाशी माझा गेल्या 16 वर्षात संबंध आलेला नाही, त्या माणसाकडून हे मला एनओसी आणायला सांगत होते. एका कायद्यानं सज्ञान व्यक्तीला नाव बदलण्यासाठी कोणाच्याही एनओसीची गरज नसते. मी जरी माझं नाव गाढव, ससा, कासव ठेवायचं ठरवलं तरी मला तसं करण्याचा पूर्ण हक्क आहे. तसं मी सांगून मी एनओसी आणणार नाही हे स्पष्ट बजावलं. त्यावर त्यांनी मला अॅफिडेव्हिट करून आणायला सांगितलं. आता मला रडू यायला लागलं होतं. पण मी चुपचाप काही न बोलता तिथून बाहेर पडले. मग मीपण ठरवलं. 
पंगा तर पंगा !
शेवटी दिवसभर उन्हात धावपळ करून, काही न खाता-पिता मी अॅफिडेव्हिट बनवलं. माझ्या मैत्रिणीचे वडील पोलीस होते. त्यांच्या मदतीमुळे हे काम एका दिवसात आटपलं. मग अफिडेव्हिट घेऊन मी पुन्हा गेले. तरीसुद्धा तिथले महाशय म्हणाले की, हे अफिडेव्हिट चालणारच नाही. तेव्हा माझा पेशन्स संपला. पुढचं वर्षभर मी त्या ऑफिसकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही. त्यादरम्यान आम्हाला समजलं की अफिडेव्हिट वगैरे करायची खरं तर काहीच गरज नसते. मग माझ्या आईने सगळी सूत्रं तिच्या हातात घेतली. ती तिच्या एक सहका:याला घेऊन त्या कार्यालयात पोहचली.  हे दोघं ऑफिसमध्ये पोहोचले. त्या साहेबाने पुन्हा तेच पुराण ऐकवलं. असं वडिलांचं नाव काढता येत नाही, तसा नियम असतो, वडिलांची परवानगी लागते वगैरे वगैरे. आईचा सहकारी म्हणाला, ठिके. तुम्ही हे जे म्हणताय ते सगळं लिहून द्या. मग तुमचं लेटर मी त्या अमुक अमुक साहेबांना दाखवतो. आमचे घरगुती संबंध आहेत त्यांच्याशी. या साहेबांचं नाव ऐकल्यावर मात्र  सर घाबरले. लगेच म्हणाले बरं बरं राहुदे. तुम्ही उद्या येऊन पैसे भरा, तुमचं काम होऊन जाईल. हुश्श!
शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडला. पुन्हा ऑफिसला गेलो. परत फॉर्म भरला आणि पैसे भरायला परत त्या मांजरवाल्या बाईच्या टेबलपाशी गेलो. त्या बाईने न राहवून विचारलंच ! पण काय कारण काय असं नाव बदलून घ्यायचं? आता माङया आईची सटकली. ती म्हणाली, कारण हवंय तुम्हाला? लिहा ! पुरुष सत्तेवर अविश्वास ! बाई म्हणाली बरं बरं. तिनं चुपचाप पैसे घेतले. तर अशाप्रकारे एकदाचं माझं नाव बदललं. आता माझ्या पॅन कार्डवर, आधार कार्ड वर, आणि  पासपोर्टवरसुद्धा माझं नाव ‘मुक्ता वंदना खरे’ असंच आहे ! हल्लीच झालेल्या शपथ विधीमध्ये काही नवनियुक्त आमदारांनी आपल्या नावापुढे आईचं नाव लावून शपथ घेतली. सध्या दोन अशा मराठी सिरीयलसुद्धा सुरू आहेत जिथे कलाकारांची नावं   आणि आईचं नाव आडनाव अशी लिहिली/दाखवली जातात. आपण आडनाव आणि मधलं नाव लावतो त्याचं कारण आपल्याला आपल्या वडिलांना (हल्ली आईलासुद्धा) क्रे डिट द्यायचं असतं. मोठं केल्याबद्दल, शिकवल्याबद्दल, त्यांचा पैसा आणि प्रतिष्ठा दिल्याबद्दल. माझ्या बाबतीत मला शिक्षण, पैसा, प्रतिष्ठा, सगळंच फक्त आईने दिलंय. म्हणून मी फक्त आईचं नाव लावते.
माझी आई शिक्षणाने आर्किटेक्ट आहे. पण तिची ओळख एक धाडसी स्रीवादी लेखिका आणि नाटय़कर्मी अशी आहे. भरपूर कष्टातून मान वर काढून जगलेली ती स्वतंत्र बाई आहे. तिला तिची ओळख आहेच. पण मला वाटतं यापुढे जे कुणी आपल्या नावासोबत आपल्या आईचं नाव लावण्याचं कौतुकास्पद काम कराहेत त्यांनी अजूनही काही गोष्टी ध्यानात ठेवाव्यात. उदा. आईचं स्वत:चं बँक अकाउण्ट आहे का? तिला तिची प्रायव्हसी मिळते का? आपण तिला सारखं छोटय़ा-मोठय़ा गोष्टींमध्ये त्याग करायला लावत नाही ना? अठरा वर्षाचे झाल्यावर तरी आपण आईवर कमीत कमी अवलंबून राहिलं पाहिजे. ते आपल्या वाढीसाठी चांगलं असतं म्हणून नव्हे तर तो तिचा हक्क असतो म्हणून. मुलीचं नाव ही पुरुषसत्तेची फार मोठी पंचाईत असते. माङयासारखी मुलगी जेव्हा वडिलांचं नाव वापरायचं नाकारते. कायदेशीरपणो आईचं नाव वापरते तेव्हा ती पुरुषसत्तेलासुद्धा उघड उघड नाकारत असते. हे किती मोठं धाडसाचं काम आहे ते मला उशिरा कळलं. मला Post Patriarcha हा शब्द आवडतो. मी जेव्हा स्वत:ला असं म्हणवते तेव्हा मला असं म्हणायचं असतं की माझा पुरुषसत्तेवर विश्वास नाही, मला पुरुष सत्तेची गरज नाही. पुरुष सत्तेशिवायचं आयुष्य मी जास्त सुखी समजते. आणि त्यासाठी कराव्या लागलेल्या कष्टाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. इथून पुढेसुद्धा मला त्यासाठी अनेक लोकांचा रोष पत्करावा लागेल, प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील याची मला कल्पना आहे. पण मी ती देईन आणि माझ्या विचारांवर ठाम राहीन. 

 

आईचं नाव लावणा-या अन्य काही व्यक्तींना भेटा.

www.lokmat.com/sakhi
 

mvkhare2019@gmail.com

Web Title: I take my mother's name! So what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.