Hug the trees to satisfy the appetite of touch | स्पर्शाची भूक भागवणारी झाडांना मिठी

स्पर्शाची भूक भागवणारी झाडांना मिठी

-प्रतिनिधी

एक काळ असा होता की, माणसांना माणसं हवी होती. कार्यक्रमांना गर्दी हवी होती. बाजारपेठांना असंख्य ग्राहकांची आस होती. पण चार महिन्यांपूर्वी जगभरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि सामाजिक जीवनाचे संदर्भच बदलले. माणसं माणसांना टाळू लागली. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी हे आवश्यकही होतं. पण या स्पर्शासाठी, सहवासासाठी आता लोकं आसुसलेली आहेत. आपल्या जीवलगांना कवटाळण्याची इच्छा त्यांना अस्वस्थ करत आहे. पण कोरोनाचा धोका त्यांना आपल्या माणसांपासून चार हात लांबच राहायला भाग पाडत आहे. पण इस्त्रायलमधील लोकांनी यावर उपाय शोधला आहे. स्पर्शाची ही गरज भागवण्यासाठी त्यांनी निसर्गाचा, झाडांचा आधार शोधला आहे. तेल अवीव या शहरात ‘अपोलोनिआ नॅशनल पार्क’मध्ये अनेक लोकं गर्दी न करता येतात. आणि झाडांना मिठी मारून आपल्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देतात. कोरोनाच्या या अप्रिय वास्तवाचा सामना करण्यासाठी प्रेमाची, आधाराची गरज आहे. ही गरज माणूस निश्चितच भागवू शकतो. पण माणसांना आता एकमेकांपासून अंतर राखणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे इच्छा असूनही नातवंड, आजी-आजोबा एकमेकांना मिठी मारू शकत नाही. कितीही जवळची मैत्रीण असू देत किंवा मित्र माणसं एकमेकांच्या आपुलकीच्या स्पर्शाला पारखी झाली आहेत. या भावना व्यक्त करता येत नसल्यानं घुसमट होते आहे. पण या घुसमटीतून बाहेर पडण्याचा मार्ग आहे असं येथील उद्यानांच्या संचालक मंडळांना वाटलं. आणि म्हणून तेल अवीवमधील बाग आणि उद्यानाचे संचालक आता लोकांना निसर्गाच्या सान्निध्यात राहा, मोकळ्या हवेत श्वास घ्या, झाडांना मिठी मारून आपल्या मनातील प्रेमाच्या भावनेला वाट मोकळी करून द्या आणि निसर्गाकडून मिळणारं मूक प्रेम अनुभवा. आपल्या प्रिय माणसांच्या स्पर्शाची गरज निसर्गातील ही झाडं नक्कीच भागवू शकतात.

 उद्यानांच्या संचालकांच्या या आवाहनाला आता तेथील लोकंही प्रतिसाद देऊ लागले आहेत. आपल्या नात-नातींना कुरवाळू न शकणारे आजी-आजोबा झाडांना कुरवाळत आहेत. एकमेकांचा सहवास, एकमेकांसोबतचं नात, स्पर्श, मिठी या गोष्टी मानवी जीवनातल्या अत्यंत आवश्यक गोष्टी आहेत. आणि कोरोनामुळे नेमक्या याच गोष्टींवर मर्यादा आल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून लोकांना एकटं वाटू लागलंय. विशेषत: वयस्कर माणसांमध्ये तुटलेपणाची जाणीव निर्माण होतेय. ही जाणीव आणि माणसांच्या मनातली नकारात्मकता दूर करण्यासाठी इस्नयलमधील लोकांनी निसर्गात येण्याची, झाडांबरोबर राहाण्याची, त्यांना मिठी मारण्याची युक्ती शोधून काढली आहे. 
अर्थात जगभरातील लोकं प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी या युक्तीचा वापर करू शकतात, असं आवाहनही इस्त्रायलमधील लोक करत आहेत.

Web Title: Hug the trees to satisfy the appetite of touch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.