How to solve 'weight' problem? | ‘वजन’दार प्रश्न कसा सोडवणार?

‘वजन’दार प्रश्न कसा सोडवणार?

- डॉ. सोनल काठोळे


स्थूलता हा एक गंभीर स्वास्थ्यविकार आहे. अनेकदा परिस्थितीजन्य कारणांमुळे ही समस्या बळावतेच आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे सर्वांचं जीवन पार बदलून गेलं आहे. तासन‌्तास बसून राहाण्याचं प्रमाण वाढलं आहे. सतत डिजिटल गोष्टींमध्ये व्यग्र, व्यायामाचा पूर्ण अभाव असल्यानं लहान-मोठे नैराश्य, स्थूलता, चिडचिडेपणा वाढत चालला आहे. दिवसभरात साधारणपणे दहा-दहा तास बैठं काम करणारे लोक सध्या खूप दिसत आहेत. ऑफिसमध्ये सतत कॉम्प्युटरपुढे बसून राहाणं किंवा घरी टीव्हीसमोर बसून राहणं, तिथेच जेवणं यामुळे शारीरिक हालचालींवर खूप मर्यादा आल्या आहेत. मात्र सलग अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ सलग एका जागेवर बसणं हे आरोग्याच्या दृष्टीनं खूपच धोकादायक ठरत आहे. बैठ्या जीवनशैलीच्या दुष्परिणामांमध्ये हदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मान, पाठ, कंबरदुखी, सांधेदुखी, वाईट कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढणं, रक्ताभिसरणातील अडथळ्यांमुळे रक्तवाहिन्यांमधे गाठी होणं, अर्धांगवायू, ॲसिडिटी, पचनाच्या तक्रारी, बद्धकोष्ठता, भूक कमी होणं सारखे आजार बळावत आहेत आणि अकाली मृत्यू येत आहे.

आता या प्रश्नाकडे पहायचं कसं?

१. मुळात आपण जे खातो त्यामधून शरीराला आवश्यक कर्बोदकं, प्रथिनं आणि मेद यांचा पुरवठा होतो. जेव्हा शरीर काही काम करतं तेव्हा कर्बोदकं जाळून ऊर्जा निर्माण केली जाते. परंतु मेद मात्र क्वचित जाळले जातात. हे मेद शरीरात त्वचेखाली जमा होऊ लागतात. आणि संपूर्ण शरीरात चरबी साठवली जाते. ही चरबी कमी करण्यासाठी रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. परंतु आजकाल सर्वजण व्यायाम फक्त बारीक दिसण्यासाठी करतात. त्याचा तेवढ्यापुरताच उपयोग करून थांबतात. त्यातून स्थूलतेमुळे अनेक जणांना न्यूनगंड निर्माण होतो. नैराश्याचा परिणाम म्हणूनही स्थूलता येते.

२. वजन कमी करण्यासाठी काहीजण व्यायाम आणि आहार नियम पालन या दोन्हींची सुरुवात करतात. काही दिवस जोमानं करतात. परंतु जड व्यायामाचे प्रकार, क्रॅश डाएट फार काळ करू न शकल्यानं मधेच थांबतात. याचाही उलटा परिणाम वजनावर होतो. थोडं कमी झालेलं वजन पुन्हा जोमानं वाढतं आणि पुन्हा ही माणसं नैराश्याकडे झुकतात.

३. कोणताही व्यायाम आणि आहार नियम जो आपल्या मित्रमैत्रिणींना चालतो तो आपल्याला चालेलच असं नसतं. आपली प्रकृती स्वत:च ओळखून व्यायाम आणि आहाराचे नियम आपण ठरवायला हवेत. जे नेहेमी सहज करता येतील असे व्यायाम प्रकार निवडून आयुष्यभर व्यायामाचं सातत्य ठेवायला हवं.

४. स्थूलता कमी करण्यासाठी काही मूलभूत बाबींची आवश्यकता असते. सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, आहाराचं नियोजन आणि सातत्य. एकच एक प्रकारचा व्यायाम नेहेमी करण्याचे फायदे कमी आहेत. व्यायामाचा लाभ होण्यासाठी व्यायामात नेहेमी बदल करावा.

५. वजन अनुवांशिकतेनं वाढलं आहे असं म्हणून स्वत:ला दोष देत राहाण्यातून वजनवाढीची समस्या वाढतच जाणार असते. शरीरातील आळस, सुस्ती झटकून सतत क्रियाशील राहाण्याचा प्रयत्न करायला हवा.

६. दररोज एक सारखेच पदार्थ खाण्यापेक्षा आहारामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करावा. किती खातो/खाते यापेक्षा काय खातो याकडे लक्ष द्यावं.

७. प्रत्येक अर्ध्या तासानं पाच मीनिटांसाठी बसल्या जागेवरून उठणं, हालचाल करणं, मोबाइलवर बोलताना चालत बोलणं, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करणं, जवळपास जायचं असेल तर पायी चालत जाणं, जेवढी शक्य असेल तेवढी शारीरिक हालचाल करणं गरजेचं आहे. प्रश्न दिसण्याचा नाही आनंदाचा आहे.

(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत)

sonalkathole@gmail.com

Web Title: How to solve 'weight' problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.