ठळक मुद्देपक्वान्नांतलं हे नैपूण्य सहज शिकता येणारं आहे.

-सखी ऑनलाइन टीम


सणावाराला आपण पुरणाची पोळी करतोच. काल दत्तजयंती झाली, अनेक घरी पुरणावरणाचा नैवैद्य झाला. मात्र पुरणाची पोळी जशी गोडाची असते तसेच  गोडाच्या पोळ्यांचे इतर प्रकारही फार छान होतात. गोडाच्या पोळ्यांमधल्या विविधतेमुळे खरंतर पाहुणचार करताना जरा पाककौशल्यही दाखवता येतं आणि मेन्यूही बदलतो. पण गोडाच्या पोळ्या या काही सहजासहजी जमत नाही. मग ती सांज्याची असू देत की गुळाची किंवा खव्याची.
आता संक्रांत येईलच पुढच्या महिन्यात. तर गुळाची पोळी करावीशी वाटते पण ती हमखास फुटते, कडकच होते अशा तक्रारी असतात. खरंतर सारणाचे,  पारीचे, आणि त्यातील घटकांच्या प्रमाणाचे नियम पाळले तर या गोडाच्या पोळ्या करणं अवघड वाटत नाही. उलट आवडीनं करण्याचा हुरूप येतो. 

सांज्याची पोळी


 सांजा गूळ घालून किंवा साखर घालून दोन प्रकारे करता येतो. गुळाचा सांजा घालून केलेल्या पोळ्या खमंग लागतात. त्यासाठी बारीक चाळणीनं चाळलेली कणीक घेणं योग्य असतं. पुरणाच्या पोळीसाठी ज्या प्रकारची कणीक लागते त्याच प्रकारे कणीक भिजवून, मळून,  तिंबून तेलामधे ठेवायची असते. सांजा मऊ शिजवायचा असतो पण तो पुरणाइतका मऊ नसल्यानं सांज्याच्या पोळ्यांसाठी कणीक पुरणाच्या पोळीच्या कणकेपेक्षा थोडी घट्ट असावी लागते. सांजा जर साखर घालून केला असेल तर कणकेऐवजी रवा आणि मैदा सम प्रमाणात घेणं योग्य ठरतं, बाकी कृती तशीच असते. रवा आणि मैदा घेतल्यानं आणि तो साखर घातलेला सांजा असल्यानं या पोळ्या पांढर्‍याशुभ्र दिसतात. सांजाच्या पोळ्याही तांदळाच्या पिठावर लाटायच्या असतात.

गुळाची पोळी
 
संक्रांतीला गुळाच्या पोळ्या केल्या जातात. तिळाचं कूट, खसखस वगैरे जिन्नस किसलेल्या गुळात घालून सारण तयार केलं जातं. थोडं डाळीचं पीठही खमंग भाजून घातलं जातं. किसल्यामुळे गूळ पातळ झाला तर डाळीच्या पीठानं खुटखुटीत होतो. तिळाच्या कुटात अन खसखशीत तेल असतं, तेही डाळीचं पीठ शोषून घेतं. गुळाचं सारण खुटखुटीत असल्यानं कणीकही त्या सारणाच्या घट्टपणाइतकी घट्ट भिजवायला हवी. गव्हाच्या पिठात थोडं तेल आणि मीठ घालून  कणीक घट्ट भिजवावी. दोन गोळ्या घेऊन गुळाच्या सारणाची जरा मोठी गोळी दोन्हीच्यामधे घालून दोन्ही गोळ्यांची कड बंद करावी.  आणि मग पोळी तांदळाच्या पिठावर पातळ लाटावी.  पोळी तव्यावर  भाजताना विस्तव मध्यम ठेवावा लागतो. कधीकधी गव्हाच्या पिठात थोडा मैदा आणि थोडं डाळीचं पीठ घालून भिजवली जाते. मैद्यामुळे तिचा पोत जास्त चांगला होतो आणि डाळीच्या पिठानं पोळीला कडकपणा येतो. गुळाची पोळी मऊ नसते. ती कडक पण खुसखुशीत  असते.

 


 

खव्याची पोळी


खव्याच्या पोळीसाठी खवा तुपावर जरा भाजून घेतला की त्याला खमंगपणा येतो. खवा गार झाला की पुरणयंत्रातून काढावा किंवा  मिक्सरमधे वाटावा. मग त्यात खसखस, वेलची पूड आणि पिठीसाखर घालून थोडा रवा भाजून किंवा मैदा घालावा आणि मऊ सारण बनवावं. खव्याच्या सारणात रवा किंवा मैदा घातला की खव्यामधला तुपाचा अंश त्यात शोषला जातो. खव्याच्या सारणात काजूची पूडही कधी कधी घातली जाते. त्यामुळे पोळीला आणखी चव येते. रवा  आणि मैदा समप्रमाणात घेऊन त्यात तेल आणि मीठ घालून पीठ   भिजवलं जातं. खव्याच्या सारणाचा जेवढा मऊपणा असेल तेवढीही कणीक मऊ भिजवायला लागते.  कणीक मऊ असली की पोळीत सारण शेवटर्पयत पसरतं. कणकेच्या दोन गोळ्या घेऊन त्यामधे खव्याची जरा जास्त मोठी गोळी घालून गुळाच्या पोळीप्रमाणे पोळी    लाटली किंवा कणकेची पारी करून त्यात खव्याचं सारण भरुन पोळी लाटली जाते. पोळी तांदळाच्या पिठावर लाटावी लागते आणि भाजताना विस्तव मध्यम  ठेवावा लागतो खव्याच्या पोळीप्रमाणे श्रीखंडाची, आंब्याची, बेसनाची आणि खजुराची अशा अनेक प्रकारच्या पोळ्या करता येतात.
 

Web Title: How to make perfect maharashtrian traditional gulachi poli, khavyachi poli & sanjyachi poli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.