How do you look at 'Maya' in the movie Inkaar who show the Power Games in relationship of men and women. | स्त्री आणि पुरूषाच्या नात्यातला पॉवर गेम सांगणा-या इन्कार चित्रपटातल्या ‘माया’कडे तुम्ही कसं पाहाता?

स्त्री आणि पुरूषाच्या नात्यातला पॉवर गेम सांगणा-या इन्कार चित्रपटातल्या ‘माया’कडे तुम्ही कसं पाहाता?


- माधवी वागेश्वरी 

कामाच्या ठिकाणी बायकांना सहन कराव्या लागणा-या गैरवर्तनाविषयी मुख्य धारेतील सिनेप्रकारातून बोलणारा सिनेमा म्हणजे  ‘इन्कार’.  ‘पिंक’ चित्रपटातील ‘ना का मतलब ना होता है’ किंवा हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये महत्त्वाची ठरू पाहणारी ‘मी टू’ चळवळ या सगळ्याच्या आधी 2013 साली सुधीर मिश्रंनी ‘इन्कार’सारख्या सिनेमातून या महत्त्वाच्या विषयावर भाष्य केलं होतं. त्यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं होतं. अजरुन रामपाल (राहुल) आणि चित्रंगदा सिंग (माया) यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका होत्या. कधी काळी मायाचा बॉस तसेच  ‘प्रियकर’ असलेल्या राहुलवर लैंगिक छळाचा आरोप लावते. मोठय़ा आणि प्रथितयश अँड एजन्सीत दोघं काम करत असल्यामुळे एका प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेच्या बाईला (दीप्ती नवल) ऑफिसमध्ये बोलावलं जातं आणि आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागतात. 
‘हॅरसमेण्ट’ आणि ‘फ्लर्टिग’ यातला फरक काय? यावर ‘माया’ आणि ‘राहुल’ आपापली मतं सांगतात. इंग्रजीत एक वाक्य आहे, ‘मोरॅलिटी इज नथिंग बट हू डायजेस्ट व्हॉट.’ अर्थात, कोणाला काय पचतं त्यावर त्या माणसांची नैतिकता ठरत असते. मायाची नैतिकता, तिच्या नीतीचा तिनं आणि इतरांनी लावलेला अर्थ उलडत जातो.
‘माया’ लहान गावातून आलेली हुशार मुलगी. ती सुंदर, महत्त्वाकांक्षी आणि प्रेमळ  आहे. तिचा बॉस राहुल तिला कामाच्या ठिकाणी ‘घडवत’ नेतो. ‘माया’सारख्या अनेक मुली आजूबाजूला दिसतात. कामाच्या ठिकाणी काय काय चालू शकतं? याचा कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या सोयीनं अर्थ लावतात. माया काय किंवा एकूणच बायकांची नैतिकता ही  ‘लैंगिकता’ या एकाच गोष्टीभोवती करकचून बांधली गेलेली आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं जे काही बोललं जातं त्याचा पुरुष काय किंवा  स्री काय दोघेही आपापल्या समजेप्रमाणो अर्थ लावतात. आणि तोही अत्यंत सोयीनं.
मायासारखी व्यक्तिरेखा इथे ‘सेक्शुअल हॅरेसमेण्ट’मध्ये ‘न्याया’पेक्षा ‘पॉवर गेम’ची जाणीव करून देते. प्रत्येक स्री-पुरुष नाते  संबंधात मग ते अगदी कुठल्याही स्वरूपाचं नातं असो- घरी किंवा दारी, त्यात ‘सत्तेचं’ राजकारण चालतच असतं. ते आपण नाकारलं म्हणून त्याचं अस्तित्वं नाहीसं होत नाही.
‘माया’च्या सौंदर्याबद्दल राहुलनं कौतुक करणं हे तिला आधी सुखावह वाटतं आणि नंतर त्याच ‘कौतुका’चं लैंगिक छळात रूपांतर होणं हा प्रवास समजून घेणं आवश्यक आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था असलेल्या समाजानं बाईचं ‘वस्तुकरण’ करणं आणि तेच योग्य वाटून बाईनं स्वत:चं ‘वस्तुकरण’ करून घेणं यातील सूक्ष्म फरक समजून घेणं आवश्यकआहे. 
एके ठिकाणी माया म्हणते, ‘एखाद्या पुरुषानं स्वत:हून प्रेमाचं नातं संपवणं म्हणजे पुरुष चांगला आणि एखाद्या स्रीनं पुढाकारानं संबंध सुरू करणं किंवा संपवणं म्हणजे लगेच तिला संधिसाधू म्हणणं. बघा हिनं कसा फायदा घेतला असं म्हणणं कितपत योग्य आहे?
बाईची  ‘लैंगिकता’ म्हणजे ती ‘संपूर्ण’ नव्हे. जीवन यापेक्षा कितीतरी मोठं आहे. हे आधी बायकांनी समजून घ्यायला हवं आहे. ‘लैंगिकता’ ही फक्त एक बाजू झाली त्याला  ‘अवास्तव’ महत्त्व देण्याची गरज नाही.  त्याचप्रमाणो त्याचा ‘सोयीनं’ वापरही करता कामा नये. कारण त्यात बाईनं ‘पॉवर गेम’ खेळायला सुरुवात केली तर ज्यांच्यावर खरोखरीच अन्याय झाला आहे त्यांचा आवाज दाबणं पुरुषांना सहज शक्य होतं. 
कामाच्या ठिकाणी बायकांचा  ‘बाई’ म्हणून केलेला अपमान आणि त्याला वरून  ‘सेन्स ऑफ ह्युमर’सारखं गोंडस नाव देणं, मोठमोठय़ा कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये क्लायण्टवर इंप्रेशन पाडण्यासाठी सुंदर स्री कर्मचा-याला बॉसनं सोबत नेणं- जिथं तिच्या बुद्धीचा संबंध नसतो. काम करण्याचं स्वातंत्र्य या नावाखाली जरा अतिअनौपचारिक वातावरण ऑफिसेसमध्ये असणं आणि या सगळ्याचा ‘माया’वर होणार परिणाम दिसून येतो.
माया म्हणते, ‘तुझ्या माझ्यासारख्या व्यक्ती ज्यांना प्रेमापेक्षा अधिक काही तरी हवं आहे आयुष्याकडून त्यांचं काही होऊ शकत नाही.’ अगदी खरं आहे. स्री काय किंवा पुरुष काय या दोघांनीही  ‘लैंगिकता’ या विषयाचा बाऊ करण्यापेक्षा आपली खरी  ‘तळमळ’ काय आहे याचाच शोध घेतला पाहिजे.  ‘माया’सारख्या व्यक्तिरेखेकडे बघून हे निश्चित वाटतं की, बायकांनी काय म्हणजे  ‘करिअरिस्टिक’ असणं आणि त्यात आपण काय पणाला लावतो आहोत याचा मुळापासून विचार करण्याची गरज आहे. ज्या विचाराला सत्ता, हिंसा, अन्याय यांचा पाया नसेल. उलट न्याय, अहिंसा, निसर्ग संरक्षण, शांतता आणि भवतालातील चेतन अचेतनांच्या सहअस्तित्वाबद्दल आदर आणि  कृतज्ञभाव असेल.

(लेखिका चित्रपट आणि दृश्य माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)

madhavi.wageshwari@gmail.com

                                                                                                                                                                         

 

Web Title: How do you look at 'Maya' in the movie Inkaar who show the Power Games in relationship of men and women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.