डॉ. किशोर अतनूरकर (स्त्री रोग, प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आणि समुपदेशक)
गर्भधारणा, बाळंतपण, स्तनपान, बाळाचं सुरुवातीचं संगोपन या गोष्टी कितीही नाही म्हटलं तरी स्त्रियांच्या करियरच्या वाटेवरील गतिरोधक किंवा स्पीडब्रेकर आहेत असं मला वाटतं. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. उच्चशिक्षण घेऊन मुली आता आर्थिक दृष्टीने स्वावलंबी बनत आहेत. लग्न केंव्हा करायचं, कुणाशी करायचं याबाबतीत त्या आपलं मत ठामपणे मांडत आहेत. नोकरी, व्यवसाय सांभाळून गर्भधारणेचं नियोजन करणं त्यांना कठीण जात आहे. सुशिक्षित गर्भवती महिला जेंव्हा तपासणीसाठी येतात, त्यावेळेस ' तुम्ही इंजिनीअर आहात, नोकरी करता? ' असा प्रश्न विचारला असता, 'करत होते, प्रेग्नन्सीमुळे जॉब सोडावा लागला ' असं उत्तर बऱ्याच जणी देतात.
आजही परिस्थिती अशी आहे की,स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या करिअरसाठी जास्त प्राथमिकता दिली जाते. समाजातील हे चित्र बदलायचं असेल तर, गर्भधारणा पूर्वनियोजित असली पाहिजे. अगदी काही महिन्यांपूर्वी आलेला अनुभव शेयर करतो. त्यावरून परिस्थिती किती बिकट आहे हे लक्षात येईल.
गौतम नावाचा तरुण, वय वर्ष २३, शिक्षण दहावीपर्यंत झालेलं, तरीही नीट लिहिता वाचता देखील येत नाही, शहरात रहाणारा, ना नोकरी ना व्यवसाय, वडील सेवानिवृत्त सेवक, त्यांना मिळणारं पेन्शन हेच काय ते त्या कुटुंबाचं आर्थिक स्रोत. असा हा गौतम लग्न करतो. लग्नानंतर सहा महिन्यातच पाळी चुकते, गर्भ आहे किंवा नाही यासाठी लघवीची तपासणी केली जाते, रिपोर्ट निगेटिव्ह. पाळी का चुकली असेल यासाठी गौतमच्या बायकोला माझ्याकडे आणल्यानंतर मी विचारलं, गर्भ नाही हे ठीक आहे,पण गर्भ असावा असं तुला वाटतं का? यावर ती अक्षर ओळख देखील नसलेली नवविवाहित तरुण मुलगी काहीच बोलेना.
मी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर एक वाक्य अतिशय दबक्या आवाजात म्हणाली-आपल्या मनावर काय असते? तुला आता लगेच गर्भधारणा पाहिजे का? या मी विचारलेल्या प्रश्नाला तिने-नको असं उत्तर दिल्यावर मात्र मी बाहेर थांबलेल्या गौतमला आत बोलावून विचारलं-तुझी काय इच्छा आहे, गर्भ राहिला तर तुला चालेल का? या प्रश्नाचं उत्तर त्यानी चक्क ' हो ' असं दिल्यानंतर मी चमकलोच. बायकोला इतक्या दिवसात या बाबतीत कधी बोललास का? गर्भधारणा लगेच पाहिजे का नको या बद्दल तिच्या सोबत काही चर्चा? यावर त्यानी ' नाही 'असं उत्तर दिलं. अशा परिस्थितीत गौतमच्या बायकोची पाळी चुकली तरी ती गर्भवती नव्हती हे एका दृष्टीने चांगलंच झालं असं वाटून गेलं.
सगळंच अजब! न समजण्याच्या पलीकडचं. कोणत्याच नवऱ्याने आपल्या बायकोचं मत विचारात घेतल्याशिवाय तिच्यावर गर्भधारणा लादू नये असं या निमित्ताने सुचवावंसं वाटत. वाचकांनी आपल्या संपर्कात येणाऱ्यांना अशा बेफिकीरपणे वागण्याने स्त्रियांवर जन्मभराचा अन्याय होतो, असं मनापासून समजावून सांगावं ही अपेक्षा.
ते करणं का आवश्यक, त्याविषयी उद्याच्या लेखात..
(लेखक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. MD OBGY, Ph D. Social Sciences, MS counseling & Psychotherapy)
atnurkarkishore@gmail.com
Mob : 9823125637