Join us   

स्तनपान आणि बाळ सांभाळणं एकट्या आईचीच जबाबदारी नाही? आईला मदत करणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 6:33 PM

world breastfeeding week : स्तनपान: यशस्वी बाल संगोपनाचा पाया! पण भरायचा कुणी आणि कसा? ती फक्त एकट्या आईचीच जबाबदारी नाही.

ठळक मुद्दे यशस्वी बालसंगोपनाचा पाया एकट्या आईनं भरायचा नाहीये,आपल्या सर्वांचीच ती जबाबदारी आहे!

डॉ. ज्योत्स्ना पडळकर (बालरोग तज्ज्ञ,पुणे, jyotsnapadalkar@gmail.com) आईचं दूध ही बाळासाठी सर्वोत्तम भेट आहे यावर दुमत नाही. तसंच आईचं दूध मिळालं पाहिजे हा बाळांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो त्यांना मिळावा हेही सर्वांना मान्य आहे. तरीसुद्धा आईच्या दुधाचे सगळे फायदे आईला आणि बाळाला मिळत नाहीत हे सत्य आहे. कारण, स्तनपानाच्या नैसर्गिक क्रियेतही छोट्या-मोठ्या अडचणी येतात याही प्रांतात अनेक गैरसमजुती आणि अज्ञान आहे. तसंच हा वैयक्तिक नाजूक प्रश्न बराच सार्वजनिक झालेला दिसतो. या क्रियेत आजूबाजूच्या बऱ्याच मंडळींचे सहभाग आणि हस्तक्षेप असतात. याचे अर्थातच चांगले आणि वाईट परिणाम होतात. यासाठी सर्वांनाच या क्रियेबद्दल आणि आपापल्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती हवी. सर्वप्रथम स्वतः आई: तिची मानसिक, शारीरिक,भावनिक, बौद्धिक,कौटुंबिक, आर्थिक तयारी होणं महत्त्वाचं. स्वतःची संपूर्ण दिनचर्या बाळ आल्यावर बदलणार, कोणी पूर्ण परावलंबी जीव आता आपला पूर्ण दिवस आणि भावविश्व व्यापणार. हे ताणाचं असणार. पण तरीही मला ते जमणार. अशा विचारांनी आलेल्या अडचणींचा बाऊ न करता त्या मी कशा सोडवीन याकडे उत्साहानं, आत्मविश्वासानं पाहिलं पाहिजे. स्वतःवर, नैसर्गिक क्रियांवर विश्वास हवा. स्तनांचा लहान आकार, अवघड बाळंतपण, कमी वजनाचं बाळ, दोघांमधले काही तत्कालीन प्रश्न यांनी हैराण, हताश न होता वैद्यकीय मदतीनं, कुटुंबीयांच्या पाठिंब्यानं माहिती मिळवून बुद्धीच्या तुर्यानें सर्व अडथळे पार करावेत. हे अशक्य मुळीच नाही.

(Image : google) निपलच्या तयारी विषयी.. केवळ निप्पल नीट तयार नसल्यामुळे दहा टक्के आयांना बाळाला दूध पाजता येत नाही यासाठी सिलेंडर योजना ही क्रिया गरोदरपणीच डॉक्टरांकडून शिकून अमलात आणावी. कौटुंबिक आधार ज्या कोणाचा घ्यायचा त्या व्यक्तीचंही या विषयात पुन्हा नव्यानं शिक्षण व्हावं. म्हणजे मतभेद, समजुतींचे घोटाळे टळतील. यासाठी प्रसूतीपूर्व वर्गामधील शिक्षणात आईबरोबर बाबा, आजी,दाई,आता यांचा समावेश करण्यासाठी डॉक्टरांना विचारावं. बाळाचे बाबा पूर्वी या कार्यक्रमात बाबांचा रोल फारच दुर्लक्षित होता, पण आता चित्र पालटते आहे. तथापि घराची खिंड लढवण्याचं काम बाबांनी स्वेच्छेनं, उत्साहानं करायला घ्यावं. "जिथं कमी तिथं आम्ही" अशा बाण्यानं सर्व पार पाडत राहावं. आर्थिक तरतुदी आधीच केलेल्या असाव्यात. अचानक उद्भवल्या असल्यास आता आपल्या पुण्याईवर त्या उभ्या कराव्यात. माहेरच्या मंडळींकडं सोयीस्करपणे बोट दाखवून अंगचोरपणा करू नये. या गोष्टी समर्थपणे पेलणाऱ्या बाबांची प्रतिमा सर्वांच्याच मनात उंचावते हे लक्षात घेऊन वागावं. हीच ती वेळ आहे आपलं कर्तृत्व दाखवण्याची. ही संधी बाबांनी सोडू नये. यामुळे आईला भावनिक आधार मिळतो, ती सुखावते आणि स्तनपानाला सुलभ वाट मिळते.

(Image : google)

बाळाची आजी  हा भारतीय संस्कृतीतला स्तनपान मध्ये गृहीत धरलेला भक्कम आधार. पूर्वी आई अल्पवयीन असे तेव्हा तर आजीच आईचा रोल करत असे. पण आता सुशिक्षित मोठ्या आयांनी आजीला राबवून घेऊ नये. आज्यांनीही नव्या मंडळींना त्यांची कर्तव्यं दाखवावीत आणि लांबून मार्गदर्शन करावं. नवं शास्त्र शिकून घ्यावं. अनेक अनुभवांच्या साराचं शास्त्र बनतं.त्याला नवं म्हणून कमी लेखू नये. डॉक्टर शिकवतील त्यात एकावाक्यता असावी म्हणून "बरं" म्हणायची तयारी ठेवावी. दुय्यम भूमिका घेऊन हाताखाली काम करायला घ्यावं. बाळाची जबाबदारी नव्या पालकांवर सोडून आपण निर्धास्थपणे नातवंडांच्या लीला एन्जॉय कराव्यात. शेजार पाजार, नातेवाईक,मित्रमंडळी, अर्थात व्हिजिटर्स हा या सोहळ्याचा अविभाज्य घटक पूर्वी पाच आठवडे तरी आई आणि बाळ या सर्वांपासून दूर ठेवण्याचा प्रघात होता तो नक्कीच चांगला होता पुन्हा अनुकरण करावा असाच हा नाजूक गुपित विषय सार्वजनिक करण्याची चूक स्त्रियांकडूनच होत असते भेटणाऱ्या भगिनींच्या बोचऱ्या नजरा, नकोसे हावभाव, टीका-टिप्पण्या,अनाहूत सल्ले- सूचना, अनावश्यक चर्चा, शंका कुशंका या सर्वांचा स्तनपानाच्या क्रियेवर चांगल्या पेक्षा वाईट परिणामच अधिक होतो तेव्हा "नो व्हिजिटर्स !"ही भूमिका योग्य ठरेल. दूध आणि बाळ याविषयी आईला प्रश्न विचारायची मुभा फक्त डॉक्टर आणि आजी यांनाच आहे. आया ,दाया,अंगाला लावायला येणाऱ्या स्त्रिया ही चैन उच्च मध्यमवर्गीयांमध्ये दिसते. अडाणी आई आणि आजी पुढे हीच ज्ञानी व्यक्ती ठरते. तुम्हाला कसं काही येत नाही, बाळाची आंघोळ कशी अवघड आणि जोखमीची बाब आहे. हेच मनावर ठसवण्याचं काम ही व्यक्ती आत्मविश्वासानं करते. आईचं शिक्षण तर दूरच पण दोन-तीन महिन्यानंतरही बाळाच्या आंघोळीबद्दल आईला आपल्याला ती जमेल याबद्दल खात्री नसते,यातच सगळं आलं. या स्त्रियांची आईच्या दुधावरची कॉमेंट म्हणजे जणू एक्सपर्ट कॉमेंट! इतकी ताकद त्या वाक्य उच्चारण्यात असते. त्याकडं दुर्लक्ष करावं असं पटूनही ते शक्य होत नाही. याचा नक्कीच वाईट परिणाम होत असतो. आई आणि आजीनं हे काम शिकून घेऊन स्वतःकडे घेतलं तर हे टळू शकेल. नोकरीच्या ठिकाणचे व्यवस्थापन आणि मायबाप सरकार यांनी नुसतं कागदोपत्री अथवा तोंडी मदतीची आश्वासन देऊ नयेत. स्तनपान हा पूर्णवेळाचा जॉब आहे. तेव्हा दुसरा जॉब होऊ शकत नाही हे लक्षात घ्यावं. गरजे पोटी कित्येक स्त्रिया नाईलाजानं नोकरीवर रुजू होतात, चांगलं येत असलेलं दूध सोईंअभावी बंद पडतं. बंद पडतानाही आईला भरपूर मानसिक, शारीरिक यातना देतं. तिचं भावविश्व विस्कटतं, त्यात भरपूर पडझड होते. त्यातून ती सावरते देखील पण तोवर न दिसणारी बरीच हानी झालेली असते. स्तनपानासाठी सोयी देणं संस्थांनी आद्यकर्तव्य समजावं. ज्या आईला ही मुभा मिळते तिचं घरी दारी दोन्हीकडं काम अधिक चांगलं होतं, कारण तिचं मन भरलेलं असतं!  कामाच्या जागी पाळणाघरं, कामात सुटसुटीतपणा,कामाचे फ्लेक्झी अवर्स, वर्क फ्रॉम होम ,अर्धवेळ अर्ध पगारी नोकरी किंवा किमान पुन्हा नोकरीची हमी असे याला अनेक पर्याय दिसतात. यावर गंभीर विचार आणि कृतीची गरज आहे. अशी प्रत्येकानीच आपली आईच्या स्तनपानातली भूमिका समजून घेऊन उत्साहानं निभावली तर आईच्या स्तनपानाला पाठिंबा मिळेल.  यशस्वी बालसंगोपनाचा पाया एकट्या आईनं भरायचा नाहीये,आपल्या सर्वांचीच ती जबाबदारी आहे!

टॅग्स : जागतिक स्तनपानजागतिक स्तनपान सप्ताहपरिवार