Join us   

बाळ होणार पण आई स्तनपानासाठी तयार आहे का? गरोदरपणातच कशी कराल तयारी?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 5:18 PM

World Breastfeeding Week : निपल्स लहान आहेत, स्तनपान कसे करायचे हेच माहिती नाही? ते समजून घ्या..

डॉ.ज्योत्स्ना पडळकर ( बालरोगतज्ज्ञ, पुणे, jyotsnapadalkar@gmail.com)

प्रत्येक प्रेग्नेंसी ही "प्लॅन्ड" म्हणजे "ठरवून केलेली" असावी "चुकून" झालेली नसावी. आपण आता बाळ आणणार आहोत हे ठरवलं की आपल्या दोघांनाही  कोणताही आजार नाही ना हे पाहणं आवश्यक असतं. आजारांचा प्रेग्नेंसीवर आणि बाळावर परिणाम आणि बाळाचा किंवा प्रेग्नेंसीचा आजारावर होणारा परिणाम या दोन्हीसाठी या तपासण्या आणि त्यावरचे उपचार अतिशय आवश्यक असतात. आपला आहार चांगला आहे असं वाटलं तरीसुद्धा काही कमतरता असू शकतात. म्हणून गरोदरपणाच्या अगोदर पासून विटामिन्स विशेषतः फॉलिक ऍसिड घेणं बाळाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक असतं.  डॉक्टरांच्या सल्ल्यानंच या नव्या प्रवासाला सुरुवात करावी हे चांगलं! एकदा प्रेग्नेंसीची खात्री झाली की, आईनी स्तनपानासाठी मानसिक तयारी  बरोबर आपल्या स्तनांची काळजी घेणं गरजेचं आहे. (आकृतीत दाखविलं आहे )

मागचा काळा भाग चिमटीत धरून त्या पुढे येतात ना पहावं. तशा नसतील तर गरोदरपणीच शेवटच्या काही महिन्यांत सिरिंजनी ओढून निपल बाळाला पिण्या योग्य करता येतात. यासाठी डॉक्टरांचा सल्ला न लाजता जरूर घ्यावा. यशस्वी स्तनपानासाठी हे आवश्यक आहे. दहा पैकी एकीचं स्तनपान निपल चांगल्या नसल्यामुळं कोलमडतं. हे टाळता येण्यासारखे आहे. तरीही चांगल्या निपल तयार झाल्या नसतील तर निपलवर  सिलिकॉन निपल किंवा चक्क बाटलीचं सिलिकॉनचं म्हणजे पांढरं दिसणारं स्वच्छ बूच लावूनही बाळाला पाजता येतं.ही युक्ती शिकून यशस्वीपणे स्तनपान करा. नक्की जमतं.

सुरुवातीच्या काही दिवसात दुधाची मागणी आणि पुरवठा यांचं गणित जमलेलं नसतं.अशावेळी जास्ती झालेलं दूध काढून ठेवावं. छाती भरून आली असेल तर हलक्या हातानं मसाज करून ती रिकामी करावी. बाळांनी पिणं हे सर्वात उत्तम असतं पण काही कारणांनी बाळ चोखू शकत नसेल, उदाहरणार्थ बाळ अशक्त असेल, अपुऱ्या दिवसाचं असेल तर आईनं दुधाचा गाठी होऊ नयेत म्हणून चांगल्या हातांनी स्तन मोकळे करायला हवेत. हे दूध झिप लॉक पिशव्यांमध्ये साठवून ठेवून डीप फ्रिज मध्ये सहा महिने पर्यंत चांगलं राहतं, पुन्हा नंतर वापरता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीचं घट्ट पिवळसर चिका सारखं दूध टाकून देऊ नये.त्यामध्ये सर्वात जास्त प्रतिकारशक्ती देणारे मूल्यवान घटक असतात. हे थोडं असलं तरी सुद्धा खूप उपयोगाचं असतं.

एक महत्त्वाची चुकीची प्रथा:

नवजात बाळाला मग तो मुलगा असो की मुलगी त्याच्या स्तनातून थोडंसं दूध येतं. हे नॉर्मल असतं.आईच्या हार्मोन्सचा परिणाम म्हणून तात्पुरतं असतं. हे पिळून काढायची गरज नसते. किंबहुना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावं. ते पिळून काढण्याच्या प्रयत्नात बाळाच्या छातीमध्ये अतोनात त्रास होतो. हे नक्कीच थांबवलं पाहिजे.

jyotsnapadalkar@gmail.com

टॅग्स : जागतिक स्तनपानजागतिक स्तनपान सप्ताह