गरोदरपणात सगळ्याच स्त्रियांचं वजन वाढतं. ही अतिशय सामान्य बाब आहे. गरोदरपणात स्त्रीचं वजन वाढतं कारण तिला स्वतःबरोबर बाळाचंही पोषण करायचं असतं. योग्य आहार, व्यायाम, नियमित चालणं या गोष्टी केल्या तर बाळंतपणानंतर वजन पूर्ववत होऊ शकतं.
गरोदरपणात वजन का वाढतं? स्त्रियांचं वजन वाढण्यामागे फक्त पोटात बाळ वाढत असतं हे एकच कारण आहे असं नाही. बाळाबरोबर आईच्या शरीरातले स्नायू, पेशीही वाढत असतात. शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. वार तयार होते. गर्भाशयाचा आणि स्तनांचा आकार वाढतो. सर्वसाधारणपणे एका गरोदरपणात स्त्रीचं वजन ११ ते १५ किलो वाढतं. जुळी असतील किंवा शरीरातल्या पाण्याचं प्रमाण वाढलं तरीही वजन वाढू शकतं. वजन वाढल्यामुळे हातापायांवर आणि ओटीपोटाच्या आजूबाजूच्या त्वचेवरही सूज येते.
वजनापेक्षाही सुदृढता महत्त्वाची
गरोदरपणात वजन हे वाढणारच. ते तुम्ही टाळू शकत नाही. पण वजन वाढल्यानंतरही तुम्ही सुदृढ कसं राहू शकता हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे.
१) पोषक आणि योग्य आहार केला पाहिजे. ज्यात फळं, भाज्या, धान्य, सामिष आणि लो फॅट डेअरी पदार्थ असतील. २) खूप साखर आणि तेल, तूप असलेले पदार्थ आणि पेयं शक्यतो टाळली पाहिजेत. ३) रोज थोडा तरी व्यायाम झालाच पाहिजे. ४) जे काही, जेव्हा केव्हा खाल ते स्वच्छ जागी, चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या चवीचं आहे ना हे नक्की बघा. ५) तुमच्या आहारात फॉलीक ऍसिड, आयोडीन, कॅल्शिअम आणि प्रथिनं हे घटक असलेच पाहिजेत. हे पोषक घटक शरीरात गेल्यामुळे बाळंतपण तर सोपं होईलच पण बाळालाही सगळी पोषणमुल्यं मिळू शकतील. ६) भरपूर पातळ पदार्थांचं सेवन करा. अनेकजणींना उलट्यांचा त्रास होतो, ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या काळात शरीरात निरनिराळ्या माध्यमातून द्रव पदार्थ जात राहणं गरजेचं आहे.
विशेष आभार: डॉ. सचिन दलाल (MD, DNB, FCPS, DGO)