Join us   

बाळंतपणानंतर अवघ्या २५ दिवसात उर्मिला झाली स्लिमट्रिम! हे कसं जमलं, तीच सांगतेय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 3:27 PM

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या प्रेगन्सीपासूनच चर्चेत आहे. गरोदरपणा, बाळंतपण आणि त्यानंतरची तिची प्रत्येक पोस्ट महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.

ठळक मुद्दे गरोदरपण, बाळंतपण आणि त्यानंतरचा आई म्हणून सुरू होणारा प्रवास या सगळ्याकडे बघण्याचा उर्मिलचा ॲटिट्यूड अतिशय सकारात्मक आहे. 

बिनधास्त अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मिडियावर अतिशय ॲक्टीव्ह असते. मेकअप कसा करावा, चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, इथपासून ते थेट बाळ झाल्यानंतर एक आई म्हणून स्वत:मध्ये करावा  लागणारा किंवा झालेला बदल इथपर्यंत सगळं सगळं उर्मिला सोशल मिडियावर शेअर करते. गरोदरपणा,  बाळंतपण याबाबत उर्मिला सोशल मिडियाद्वारे करत असलेला मनमोकळा संवाद अनेक महिलांसाठी  अतिशय उपयुक्त ठरत आहे. सध्या उर्मिलाने एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून ही पोस्ट पाहून अनेक जणींच्या भुवया मात्र चांगल्याच उंचावल्या आहेत. 

 

उर्मिलाने नुकताच एका गोड बाळाला जन्म दिला आहे. बाळंपणानंतर अवघ्या २५ व्या दिवशी उर्मिलाने फोटो शुट केले असून यात ती कमालीची स्लिमट्रिम दिसते आहे. जांभळ्या रंगाची साडी, गुलाबी रंगाचे ब्लाऊज, गळ्यात मोत्याची माळ आणि केसांचा अंबाडा अशी अगदी टिपिकल महाराष्ट्रीयन वेशभुषा उर्मिलाने केली आहे. या सगळ्याच फोटाेंमध्ये उर्मिला कमालीची फ्रेश दिसत असून, ती नुकतीच बाळंतपणातून उठली आहे, याचा कोणताही लवलेश तिच्या चेहऱ्यावर किंवा देहयष्टीमधून दिसून येत नाही. बोली भाषेत सांगायचं झालं तर उर्मिला सध्या 'ओली बाळांतिण' आहे. पण तरीही फोटोंमधून दिसून येणारी तिची छबी अतिशय आकर्षक आहे. 

 

तिचे हे फोटो पाहून अनेक कमेंट आल्या आहेत. यापैकी बहुतांश कमेंटमधून विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजे बाळंतपण झाल्यानंतर अवघ्या २५ दिवसांत उर्मिलाने तिच्यामध्ये एवढा मोठा बदल कसा काय घडवून आणला. असं काय ती करते आहे की ज्यामुळे इतक्या कमी दिवसात तिचे पोट पुर्णपणे सपाट झाले असून तिची तब्येत देखील अतिशय मेंटेन आहे. एवढेच नाही तर 'तुझी आत्ता डिलेव्हरी झाली आहे, यावरच विश्वास बसत नाही', अशा आशयाच्या कमेंटही तिला मिळाल्या आहेत. यावर उर्मिलाने दिलेले उत्तर तर आणखीनच चकित करणारे आहे.

 

उर्मिला म्हणते की बाळंतपण झाल्यानंतर सुटलेले पाेट आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी मी सध्या कोणतेही विशेष प्रयत्न करत नाही. पण तरीही मला हे कसं जमलं याचं योग्य उत्तर मला अगदी चांगलं माहिती आहे. गरोदरपणात मी खूपच चांगला डाएट प्लॅन फॉलो करत होते. त्यामुळेच गरोदरपणात माझं जे काही वजन वाढलं ते बेबी वेट आणि वॉटर वेट यांच्यामध्ये योग्य प्रकारे विभागलं गेलं. जेव्हा मी बाळाला जन्म दिला, त्यानंतर अवघ्या काही दिवसातच माझं ८ किलो वजन कमी झालं होतं. त्यामुळे बाळंतपणानंतर तुमचं वजन कसं असेल, यासाठी तुम्ही गरोदरपणात कसा आणि किती आहार घेत होतात, हे देखील खूप महत्त्वाचं ठरतं, असं उर्मिला म्हणते आहे. 

 

एवढंच नाही, तर उर्मिलाने पुढे सांगितलं आहे की, ती सध्या वजन कमी करण्यासाठी नव्हे, तर वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करते आहे. सध्या ती दररोज ५०० ग्रॅम कॅलरीज एक्स्ट्रा घेत आहे. उर्मिला म्हणते आहे की, बाळ झाल्यानंतर लगेचच वजन कमी करण्याचा किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करू नका. कारण बाळंतपणात तुमच्या शरीराची झीज झालेली असते. वेटलॉससाठी लगेचच प्रयत्न सुरू केले तर त्यामुळे तुमच्या शरीराची झालेली झीज भरून येण्यासाठी अडथळा येऊ शकते. तसेच त्याचा परिणाम तुमच्या स्तनपानावरही होऊ शकतो. तुमचे दूध कमी होऊ शकते.

 

त्यामुळे डिलिव्हरी झाल्यानंतर लगेचच कोणताही व्यायाम न करणेच बरे. व्यायाम करण्यासाठी आणि अतिरिक्त चरबी बर्न करण्यासाठी सगळे आयुष्य पडले आहे. त्यामुळे मला सध्या तरी वजन कमी करण्याची काहीही घाई नाही, असेही उर्मिलाने सांगितले आहे. गरोदरपण, बाळंतपण आणि त्यानंतरचा आई म्हणून सुरू होणारा प्रवास या सगळ्याकडे बघण्याचा उर्मिलचा ॲटिट्यूड अतिशय सकारात्मक असून आयुष्याच्या या वळणावर असणाऱ्या किंवा येऊ पाहणाऱ्या प्रत्येकीसाठी निश्चितच सकारात्मक आहे. 

 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीउर्मिला निंबाळकरसेलिब्रिटी