Join us   

गरोदरपणात छळणारं ‘बाळंतवात’ नावाचं गुढ रहस्य, हा छूपा आजार कसा ओळखायचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 12:17 PM

बाईचे आरोग्य ही फार नाजूक गोष्ट! एकतर तिच्या पोटी बाळ वाढते आणि चारचौघात सांगायचे नाही असेही बरेच काही तिला एकटीला (उगीचच) सोसावे लागते. बाईच्या आरोग्याविषयीची गूढ कोडी उलगडणारी ही नवी लेखमाला.

डॉ. शंतनू अभ्यंकर

‘रशियात कट्टर कम्युनिस्ट राजवट होती. पोलादी पडदा होताच, त्यामुळे काहीही कळणे मुश्कील!’ - अशा रशियाचे वर्णन चर्चिल सायबाने आपल्या तिरकस ब्रिटिश शैलीत करून ठेवले आहे. रशिया म्हणजे एका रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले एक कोडे आहे! (It is a riddle, wrapped in a mystery, inside an enigma.) थोडक्यात. रशियाबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही आणि काही माहीत होण्याची शक्यताही नाही.

गरोदरपणी होणारा असाच एक आजार आहे, ज्याबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही आणि काही माहीत होण्याची शक्यताही सध्या धूसर आहे. हा आजार म्हणजे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे! एरवी माझ्यासकट तमाम डॉक्टर, ही नाहीतर ती, अशी काहीतरी माहिती सांगायला, हिरीरीने लिहित असतात; पण आज मी काहीही माहीत नाही, हे सांगायला लिहितो आहे.

हा आजार दहातील एकातरी गरोदर स्त्रीला होतो. याला म्हणतात ‘पीआयएच’ (Pregnancy Induced Hypertension). इतरही नावे आहेत, पण आपल्यापुरते हे एकच पुरे. जगातील एकूण बाळंतपणांपैकी बरीच बाळंतपणे भारतात होतात. पण तरीही एकाही भारतीय भाषेत अथवा पारंपरिक शास्त्रात, आयुर्वेदात, याला विशिष्ट नावच नाही! म्हणजे आजार म्हणून याची ओळख करून घेण्यात आपण कमी पडलो. म्हणजे कसला कसलेला बहुरूपी आहे हा आजार, ते बघा. त्यामुळे माझ्यापुरता मी या आजाराला ‘बाळंतवात’ असा शब्द शोधला आहे आणि आता इथून पुढे योजला आहे. यात पाचव्या महिन्याच्या पुढे ब्लड प्रेशर वाढते आणि लघवीतून प्रथिने वाहू लागतात. (पाचव्याच्या आतच हे सगळे घडले तर त्याची कारणे भिन्न असू शकतात.) ब्लड प्रेशरला किती महत्त्व द्यायचे आणि प्रथिनेपाताला किती, हे निकष जरा जरा बदलत असतात. बहुतेकदा हातापायांवर सूजही येते. सुजेला पूर्वी महत्त्व होते. आता ते तेवढे राहिले नाही. याच्याच टोकाच्या अवस्थेत त्या बाईला झटके येतात. याला म्हणतात ‘ईक्लाम्पशिया.’ शब्दशः अर्थ वीज पडणे. तडीताघातासारखेच केव्हाही, अचानक झटके येऊ लागतात, तेव्हा ‘बाळंतवात’ हे नाव सार्थच म्हणायचे.

बऱ्याच पेशंटला विशेष काही होत नाही. ब्लड प्रेशर वाढते, सूज येते, प्रथिनपात होत राहतो, पण हे सारे सौम्य प्रमाणात होत राहते. पुढे डिलिव्हरी होते आणि सारे बिघाड आपोआप विरून जातात. झाले तर पुन्हा पुढच्या बाळंतपणात होतात.

काही वेळा मात्र बराच बिघाड घडतो. पण बराच बिघाड घडूनही पेशंटला काही होत नाही आणि हेच फार त्रासाचे ठरते. काहीही होत नसलेल्या पेशंटला जेव्हा, ‘तुमचे ब्लड प्रेशर फार जास्त आहे, तुम्ही गंभीररीत्या आजारी आहात, ताबडतोब ॲडमिट व्हा,’ असे कोणी डॉक्टर सांगतो तेव्हा अर्थातच पेशंटचा त्यावर विश्वास बसत नाही. पेशंट म्हणतात, ‘असं कसं वाढलं? आम्ही तर तुमच्याकडे पहिल्यापासून तपासतोय!’ मग मी सांगतो, ‘मी तपासतोय आणि व्यवस्थित तपासतोय, म्हणूनच तर ही गोष्ट लक्षात आली. प्रॉब्लेम वेळीच लक्षात आल्याबद्दल अभिनंदन, माझं!!’ प्रत्येक वेळी बारकाईने तपासत राहणे एवढेच डॉक्टर करू शकतात आणि करतात. म्हणता म्हणता गंभीर दुष्परिणाम घडविणारा असा हा बिलंदर बाळंतवात आहे.

प्रत्यक्षात ज्यावेळी पेशंटला काही व्हायला लागते तेव्हा गोष्टी फार पुढच्या थराला गेलेल्या असतात. पायावर, शरीरावर, प्रचंड सूज, असह्य डोकेदुखी, उलट्या, दृष्टी मंदावणे, नजरेसमोर लाईट दिसणे, पोटात दुखणे, अंगावरून रक्तस्राव, झटके येणे... असे काही होणे म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याच्या खुणा.

मुळात बाळंतवाताची लक्षणे आणि दुष्परिणाम जरी पाचव्याच्या पुढे दिसत असले तरी त्याची सुरुवात होते अगदी दुसऱ्या-तिसऱ्या महिन्यात. गर्भातील बाळाकडे भरपूर रक्त जावे म्हणून वारेकडे जाणाऱ्या आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायू गरोदरपणात लोप पावतात. मग या रक्तवाहिन्या मुळी आकुंचनच पावत नाहीत. त्या अगदी लेवाळ्या होतात. त्यांचा व्यास वाढतो. रक्तप्रवाह कित्येकपट वाढतो. आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायुलोप ही बाळाच्या वारेची किमया. वारेच्या पेशी आईच्या रक्तवाहिन्यात घुसून त्यातील स्नायू नष्ट करतात; पण आपल्यात घुसून आईच्या रक्तवाहिन्यांनी स्नायू नष्ट करू दिले तर! म्हणजे इथे जरा समजुतीने घ्यायचा प्रश्न येतो. अशी समज आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये असते. केव्हा प्रतिकार करायचा आणि केव्हा भिडू आत सोडायचा याचे पक्के आराखडे, ठोकताळे असतात. बहुतेक आयांची प्रतिकारशक्ती, बहुतेक वेळी हे बिनबोभाट होऊ देते. काही वेळा मात्र हे गणित चुकते. मग स्नायू लोप पावण्याची क्रिया होतच नाही.

यामुळे अनेक घोटाळे होतात. स्नायू लोप न झाल्यामुळे या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. मग बाळाला रक्त पुरे कसे पडणार? मग ते रोडावते. जसजसा बाळाचा रक्त पुरवठा कमी कमी होतो तसतसे आपोआपच बाळ मिळतेय ते रक्त, नीट जपून वापरायला लागते. मग आहे? तो प्रवाह मेंदूकडे वळवला जातो. मग बाळाच्या किडनीकडे रक्त कमी जाते. मग बाळाला शू कमी होते. शू कमी झाल्यामुळे बाळाभोवतीचे पाणी आटते. येस!! बाळाभोवतीचे पाणी म्हणजे बव्हंशी बाळाची शू असते!! हे पाणी आटले की अनेक गोच्या होतात. हातपाय नीट न हलवता आल्यामुळे सांधे आखडतात. हेच पाणी श्वसनाच्या हालचालीबरोबर फुफ्फुसात आत-बाहेर होत असते. यामुळे फुफ्फुसाची वाढ होत असते. पाणी कमी असेल तर फुफ्फुसाची वाढ नीट होत नाही. पूर्वी या कशाचाही पत्ता लागायचा नाही. नुसते पोट तपासून काय कळणार? आता सोनोग्राफीच्या तंत्रांनी सगळेच बदलले आहे. रक्तप्रवाहाची मोजमापे घेऊन खूप काही समजते. बाळाचे नेमके वय किती? ते सुपोषित आहे? का कुपोषित? निव्वळ अन्नाला मोताद आहे, का आता ऑक्सिजन कमी पडल्याने गुदमरले आहे? कलर डॉप्लरमध्ये हे सगळे कळते आणि त्यानुसार निर्णय घेता येतो.

अशा प्रसंगात डॉक्टरांच्या हातात काय काय पर्याय असतात?

- त्याबद्दल पुढच्या मंगळवारी ! (लेखक ख्यातनाम स्त्रीआरोग्यतज्ज्ञ आहेत) faktbaykanbaddal@gmail.com

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीगर्भवती महिला