Join us   

गर्भपातानंतर उदास वाटतं, रडू येतं, जगण्याची इच्छाच कमी झाली? मूल गमावल्याच्या दु:खात स्वत:लाही हरवलं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 6:25 PM

गर्भपातानंतर( ( abortion)) होणारा मानसिक त्रास अनेकदा शारीरिक त्रासइतकाच गंभीर असतो, त्याकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं आहे.

ठळक मुद्दे वेळीच लक्ष दिलं नाही तर डिप्रेशनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे गर्भपातानंतर होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका.

गर्भपात -ॲबॉर्शन ( abortion) करण्याचा निर्णय कुणाही महिलेसाठी सोपा नसतो. वेदनादायीच असतो. स्वच्छेने, नाईलाजाने, बळजबरीने कुठल्याही परिस्थितीत गर्भपात करण्याचा ताण येतोच. मनात भावनांचा कल्लोळ उठतो. आपण जे करतोय ते चूक की बरोबर असा अपराधभावही मनात असतो. प्रत्येकीचा दृष्टीकोन, घटनेला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया जरी वेगळी असली तरी गर्भपात करण्याचा ताण येतोच. शरीरावर येतो तसा तो मनावरही येतो. गर्भपाताचे भावनिक परिणाम प्रत्येकीची मनोवस्था, कुठल्या परिस्थितीत कुठल्या कारणाने गर्भपाताचा निर्णय घ्यावा लागला, याप्रमाणे प्रत्येकीच्या भावना बदलतात. मात्र मनात गर्भपातानंतर नकारात्मक प्रतिक्रिया उमटणे हे तसे कॉमन आहे. निराश-उदास-दु:खी बहूतेक सर्वच जणींना वाटतं. अगदी नियोजन करुन, ठरवून गर्भपात केला तरी उदास वाटतं. त्याला  गर्भपातानंतर होणारे हार्मोनल बदलही कारणीभूत ठरतात. नैसर्गिक गर्भपात होतो तेव्हा जे हार्मोनल बदल होतात, आपलं मूल गमावण्याची भावना मनात निर्माण होते, फार मोठा भावनिक धक्का बसतो तसंच काहीसं ठरवून गर्भपात केला तरी होतं.

(Image : google)

कोणती लक्षणं दिसतात?

मनात अपराधभाव तयार होतो.  लाज वाटते. पश्चाताप होतो. आत्मविश्वास आणि स्वत:विषयीचा आदरही कमी होतो. वाटतं एकटं रहावं, कुणाशी बोलू नये.  झोप लागत नाही, झोप लागलीच तर विचित्र स्वप्न पडतात. नात्यांतही काही ताण, नव्या समस्या उभ्या राहतात. अगदी टोकाचं म्हणजे काहींच्या मनात आत्महत्येचे किंवा स्वत:ला दुखापत करुन घेण्याचेही विचार येतात. आपण काहीतरी मोठं गमावलं या भावनेनं हताश वाटतं. गर्भपात झाला हे वास्तव स्वीकारणंही अवघड जातं. काही जातीधर्मात गर्भपात हे पाप मानलं गेलं आहे. त्या धार्मिक गोष्टींमुळेही अनेकींना आपण गर्भपात केला याचा त्रास जास्त होतो. खरंतर मूल हवं की नको हे ठरवण्याचा अधिकार महिलेला असतो, तिच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा अधिकार कुणालाही नाही.  बऱ्याचजणींच्या संदर्भात काही दिवसात नकारात्मक भावना मागे पडतात. वास्तव त्या स्वीकारतात. मात्र काहीजणींच्या संदर्भात मात्र भावनिक चढउतार तीव्र होतात. मनावर ताण येतो. खूप उदास राहू लागतात. डिप्रेशनच्या खुणा दिसू लागल्या तर डॉक्टरांची मदत घ्यायलाच हवी.

(Image : google)

गर्भपातानंतर डिप्रेशनचा त्रास कुणाला होऊ शकतो?

आधीपासून मानसिक ताण, मानसिक समस्या असतील तर.. ज्या महिलांना इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने गर्भपात करावा लागला. ज्यांच्या मनात धार्मिक श्रद्धा आहे की गर्भपात पाप आहे.. तत्वनिष्ठ महिला आपण एक जीव घेतला असं ज्यांना वाटतं. गर्भारपणाच्या उशीराच्या टप्प्यात ज्यांना गर्भपात करावा लागला. पतीचा/जोडीदार/कुटुंबाचा अजिबात पाठिंबा नसतो त्यांना होणाऱ्या बाळात काही व्यंग असल्याने गर्भपात करावा लागला असेल तर ज्या महिलांना आधीपासूनच मानसिक आजार आहेत ज्यांना पूर्वी कधीतरी डिप्रेशन किंवा अन्झायटीचा त्रास होऊन गेला आहे. गर्भपातानंतर होणारे हे मानसिक साइड इफेक्ट हे शारीरिक परिणामांपेक्षाही मोठे आणि गंभीर असतात. वेळीच लक्ष दिलं नाही तर डिप्रेशनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे गर्भपातानंतर होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मनाकडे लक्ष द्या. वेळीच डॉक्टरांचा सल्ला, ओैषधोपचार घ्या.

विशेष धन्यवाद : डॉ रुक्षेदा सायेद ( एमबीबीएस, डीपीएम, मानसोपचारतज्ज्ञ)  

टॅग्स : प्रेग्नंसीमहिलामानसिक आरोग्यगर्भपात