lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Pregnancy > बाळंतपणानंतर डिप्रेशन? सतत रडारड, चिडचिड, असं होतं त्याचं नेमकं कारण काय?

बाळंतपणानंतर डिप्रेशन? सतत रडारड, चिडचिड, असं होतं त्याचं नेमकं कारण काय?

 डॉक्टर म्हणतात,पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास होतोय म्हणून खूप घाबरुन जाण्याची गरज नाही. पण काळजी मात्र घ्यायला हवी. बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना होणारा हा त्रास आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 05:37 PM2021-09-27T17:37:22+5:302021-09-27T17:53:12+5:30

 डॉक्टर म्हणतात,पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास होतोय म्हणून खूप घाबरुन जाण्याची गरज नाही. पण काळजी मात्र घ्यायला हवी. बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना होणारा हा त्रास आहे.

Depression after delivery?why it happen? | बाळंतपणानंतर डिप्रेशन? सतत रडारड, चिडचिड, असं होतं त्याचं नेमकं कारण काय?

बाळंतपणानंतर डिप्रेशन? सतत रडारड, चिडचिड, असं होतं त्याचं नेमकं कारण काय?

Highlightsपोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास बाळंतपणानंतर काही दिवसातच सुरु होतो. तो साधारणत: दोन आठवड्यांपर्यंत होतो.डॉक्टर सांगतात की, या त्रासाला काही गोळ्या औषधं घेण्याची, विशिष्ट उपचाराची गरज नसते. पोस्ट पार्टम ब्लूजमधे सौम्य प्रमाणात डिप्रेशन असलं तरी त्याला डिप्रेशन म्हणत नाही.

 वरदा छान मन मिळाऊ, हसरी, बोलकी. अगदी गरोदरपणातले नऊ महिनेही तिने हसत खेळत काढले. पण बाळंतपणानंतर मात्र तिच्या चेहेर्‍यावरचा हसरेपणाच मावळला. घरातल्यांना चिंता वाटू लागली. प्रसूती नॉर्मल झाली, बाळ छान सुदृढ आहे, मग ही एवढी उदास का? का तिला रडायला येतंय? छोट्या छोट्या कारणांवरुन चिडचिड होतेय, सतत ती तणावाखाली का? ती हसत बोलत का नाहीये? शेवटी घरातल्यांनी तिला दवाखान्यात नेलं. तिथे वरदाला होणारा त्रास तिच्या सासूनं डॉक्टरांना सांगितला. तेव्हा डॉक्टर म्हणाले की ‘हा पोस्ट पार्टम ब्लूज’ आहे. घरातल्यांना धक्का बसला. पण नंतर डॉक्टरांनी या त्रासाबद्दल वरदाला आणि तिच्या घरातल्यांन समजावून सांगितलं. तिची काळजी कशी घ्यायला हवी हे समजावून सांगितलं.

पोस्ट पार्टम ब्लूज म्हणजे?

स्त्री रोग तज्ज्ञ सांगतात की, बाळंतपणानंतर जवळ जवळ 75 टक्के महिलांना पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास होतो. पोस्ट पार्टम ब्लूज म्हणजे मानसिक समस्या. या त्रासात महिलांना मानसिक तणाव येतो, स्वभावात चिडचिडेपणा येतो. खूप उदास वाटतं. पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास बाळंतपणानंतर काही दिवसातच सुरु होतो. तो साधारणत: दोन आठवड्यांपर्यंत होतो. पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास होतोय म्हणून खूप घाबरुन जाण्याची गरज नाही. पण काळजी मात्र घ्यायला हवी. बाळंतपणानंतर बहुतांश महिलांना होणारा हा त्रास आहे. प्रसूतीनंतर शरीरात एस्ट्राडियोल, प्रोजेस्टरोन आणि प्रोलॅक्टिन या हार्मोनची पातळी एकदम खाली जाते आणि पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास होतो.

Image: Google

पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास बाळंतपणानंतर कोणत्याही स्त्रीला होवू शकतो. पण डॉक्टर म्हणतात की गरोदर राहाण्याआधी जर त्या स्त्रीला भीती, नैराश्य किंवा मासिक पाळीत मूड स्विंग्ज होण्याचा त्रास होत असेल तर त्यांना बाळंतपणानंतर पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. डॉक्टर सांगतात की, या त्रासाला काही गोळ्या औषधं घेण्याची, विशिष्ट उपचाराची गरज नसते. फारतर त्या स्त्रीचं थोडं समुपदेशन केलं, तिच्याशी बोललं तर तिला त्यातून लवकर बाहेर पडायला मदत होते. पण कोणतेही औषधोपचार किंवा समुपदेशन न करताही दोन आठवड्यानंतर हा त्रास संपूर्णपणे जातो. डॉक्टर म्हणतात की या काळात महिलांना सौम्य डिप्रेशनचा त्रास होतो. पण हे नैराश्य त्यांच्यापुरतीच सीमित असतं. त्याचा परिणाम इतरांवर होत नाही. पण या त्रासाकडे दुर्लक्ष करु नये असं डॉक्टर म्हणतात. कारण दोन आठवड्यानंतरही हा त्रास होत राहिला तर मात्र नैराश्याचा त्रास होण्याचे शक्यता असते. पोस्ट पार्टम ब्लूजमधे सौम्य प्रमाणात डिप्रेशन असलं तरी त्याला डिप्रेशन म्हणत नाही. तो पोस्ट पार्टम ब्लूजच असतो. पण स्वत: महिलेनं आणि तिच्या नातेवाईकांनी हा त्रास दोन आठवड्याहूनही जास्त राहिला तरी दुर्लक्ष केल्यास हा त्रास नैराश्याकडे झुकू शकतो.

Image: Google

काळजी काय घ्यायची?

 गरोदरपणात, बाळंतपणानंतर त्या स्त्रीची खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते. पण एवढीच काळजी पुरेशी नसते. आई झालेल्या स्त्रीचं मन हळवं झालेलं असतं. शरीरात हार्मोंन्स बदलल्यामुळे त्या स्त्रीमधे भावनिक चढउतार मोठ्या प्रमाणात होतात. पोस्ट पार्टम ब्लूज हा बाळंतपणानंतर बहुतांश महिलांमधे आढळणारा त्रास असला तरी हा त्रास काही गोष्टींची काळजी घेतल्यास रोखताही येतो किंवा या त्रासातून लवकर त्या स्त्रीला बाहेर काढता येतं. यासाठी कुटुंबाची जबाबदारी मोठी असते.

1. कुटुंबातील सदस्यांनी आई झालेल्या त्या स्त्रीला भावनिक आधार द्यायला हवा.

2. या काळात बाळाची काळजी घेणं, त्याला दूध पाजणं या गोष्टींकडे त्या स्त्रीला लक्ष द्यावं लागतं. पण नुकत्याच बाळंत झालेल्या त्या स्त्रीलाही आरामाची गरज असते. तिला प्रचंड थकवा आलेला असतो. हा थकवा घालवण्यासाठी त्या स्त्रीला पुरेसा आराम मिळणं, तिची झोप पूर्ण होणं गरजेचं असतं. साधारणत: अनेक स्रिया बाळ झोपल्यानंतर स्वत: आराम न करता काम करतात. पण असं न करता बाळ झोपल्यानंतर आईनंही झोपायला हवं , ती दिवसा किंवा रात्री झोपलेली असेल तर तिच्या झोपेत व्यत्यय न आणणं, कामातून तिला आराम देणं गरजेचं असतं.

Image: Google

3. अनेकदा आईची ओढाताण होते. बाळाची काळजी घ्यायची, घरचं काम बघायचं यामुळे तिची दगदग होते. बाळंत झालेल्या स्त्रीची दगदग टाळणं गरजेचं असतं. यासाठी घरातल्यांनी त्या स्त्रीला आराम करण्याची, फक्त बाळाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली तर ती स्त्री तणावमुक्त होते.

4. पोस्ट पार्टम ब्लूजचा त्रास टाळायचा असेल किंवा झाला असल्यास तो लवकर बरा होण्यासाठी घरात तिच्या आजूबाजूला आनंदी वातावरण असायला हवं. आई झालेल्या स्त्रीला कोणत्याही ताणापासून दूर ठेवावं.

Web Title: Depression after delivery?why it happen?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.