गरोदरपणात आपण जे काही खातो, पितो ते सगळं आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही मिळतं. त्याचप्रमाणे आईला होणारे आजारही बाळाला होऊ शकतात. बाळाला जन्मतःच आजार असलेलं कुठल्याही आईला आवडणार नाही. हो ना? त्यासाठीच वेळच्यावेळी लसीकरण करुन स्वतःबरोबर बाळाचंही भवितव्य सुरक्षित करणं आवश्यक आहे. कारण काही आजारात आईची प्रतिकारशक्ती हेच बाळाचं सुरक्षा कवच असतं. सर्वसाधारणपणे लसीकरणाचे तीन प्रकार असतात. लाइव्ह व्हॅक्सिन. किल्ड व्हॅक्सीन्स आणि टॉक्सऑइड्स. लाइव्ह व्हॅक्सीन्स प्रेग्नन्ससीच्या काळात कधीही घेऊ नयेत कारण त्याचा बाळाला थेट धोका असू शकतो. बाळाला निरनिराळ्या आजारांपासून वाचवण्यासाठी खाली दिलेलं लसीकरण आवश्यक आहे.
गरोदरपणा आधी गोवर, गालगुंड आणि रुबेला व्हॅक्सिन (एमएमआर) हे काही संसर्गजन्य रोग आहेत. प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यात आईला झाले तर गर्भपाताचा किंवा बाळाला संसर्ग होऊन कायमस्वरूपी दोष बाळामध्ये निर्माण होण्याचा धोका असतो. लाइव्ह व्हॅक्सीन्स गर्भधारणेच्या किमान १ महिना तरी आधी घेतली गेली पाहिजेत, जेणेकरून बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. कांजिण्या कांजिण्यांचा बाळाला काय धोका असणार? असा विचार अनेकदा केला जातो कारण या आजारात ताप येतो आणि रॅश उठते बाकी लक्षण दिसत नाहीत. पण प्रेग्नन्सीमध्ये जर कांजिण्या झाल्या तर त्याचा धोका आई आणि बाळाला असा दोघांना असतो. गर्भधारणेनंतर पहिल्या तीन महिन्यात जर कांजिण्यांचा संसर्ग झाला तर बाळ कायमस्वरूपी दोष घेऊन जन्माला येऊ शकतं. जर शेवटच्या तीन महिन्यात संसर्ग झाला तर आई गंभीर आजारी होऊ शकते आणि तो संसर्ग प्रसूतीच्या वेळी बाळाला होण्याची शक्यता असते. गरोदरपणात इन्फ्लुएन्झा फ्लू ची लस मेलेल्या विषाणूंपासून बनवली जाते. त्यामुळे आई आणि बाळासाठी सुरक्षित असते. सर्वसाधारणपणे फ्लूची साथ पसरण्याआधीच ही लस घेणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सीच्या काळात जर फ्लू झाला तर आजार गंभीर वळण घेऊ शकतो. स्नायू दुखणं, डोके दुखी, कफ, थकवा आणि घशात खवखव सारखे प्रकार होऊ शकतात. काही वेळा न्यूमोनियाही होण्याची शक्यता असते.