>आरोग्य >गरोदरपण > आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होण्याचा धोका कसा कमी झाला ? ती ही झिरो संसर्ग कथा

आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होण्याचा धोका कसा कमी झाला ? ती ही झिरो संसर्ग कथा

जागतिक आरोग्य संघटनेचं घोषवाक्यच ‘झीरो व्हर्टीकल ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असं आहे. औषधांच्या साहाय्यानं गेल्या दहा वर्षांत, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी हे एचआयव्ही पार केलं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:12 PM2021-04-20T16:12:50+5:302021-04-20T17:14:19+5:30

जागतिक आरोग्य संघटनेचं घोषवाक्यच ‘झीरो व्हर्टीकल ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असं आहे. औषधांच्या साहाय्यानं गेल्या दहा वर्षांत, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी हे एचआयव्ही पार केलं आहे.

Although the success in preventing mother transmission HIV to her baby , but there are still challenges ! ! | आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होण्याचा धोका कसा कमी झाला ? ती ही झिरो संसर्ग कथा

आईकडून बाळाला HIVचा संसर्ग होण्याचा धोका कसा कमी झाला ? ती ही झिरो संसर्ग कथा

Next
Highlightsआईला योग्य उपचार सुरू असतील, तर सहा महिने तरी बाळाला निव्वळ अंगावरच पाजावं, अशी शिफारस आली. स्तनपानाच्या बाबतीतला एचआयव्ही आणि बिगर-एचआयव्ही असा फरक औषधांमुळे संपुष्टातच आला.रोदरपणी आपोआपच बायका डॉक्टरांच्या निगराणीत राहतात. यामुळे जन्मादरम्यान होणाऱ्या लागणीचं प्रमाण आटोक्यात आलं आहे.दीड महिन्याला पॉझिटिव्ह येतात ती गर्भावस्थेतच लागण झालेली बाळं. आधी निगेटिव्ह आणि दीड वर्षाच्या अखेरीस पॉझिटिव्ह येतात ती स्तनपानातून एचआयव्ही झालेली बाळं.

- डॉ. शंतनु अभ्यंकर

एचआयव्हीची औषधं आली; पण सुरुवातीला औषधोपचार खूप गुंतागुंतीचे होते. तापदायक असे सहपरिणाम होते. सरसकट औषधोपचार पुरवण्याइतका पुरवठाच नव्हता. उपचार इतके महाग होते की तेवढे पैसे कुणाकडेच नव्हते, मायबापाकडेही नाही आणि मायबाप सरकारकडेही नाही. मग, गरोदरपणी त्यातल्यात्यात वाईट अवस्था असेल तर आणि तेही फक्त काही महिने औषधं द्यायची असं धोरण ठरलं. हळूहळू औषधं सुधारली. अपवादात्मक परिस्थितीत, अत्यल्प काळ वापराऐवजी जागतिक आरोग्य संघटनेनी एचआयव्हीग्रस्त गरोदर स्त्रीला गरोदरपणी आणि पुढे आयुष्यभर एचआयव्ही औषधं देण्यात यावीत असं सांगितलं. (ऑप्शन बी प्लस, सप्टेंबर २०१५). कारण मूल उत्तम नागरिक म्हणून वाढायचं तर निव्वळ जन्म-निगडित लागण थोपवून काय उपयोग? त्याला आई मिळायला हवीच की. आई मिळायची तर पुढेही औषधं चालू ठेवायला हवीत. २०१० साली जेमतेम निम्या एचआयव्हीबाधित महिलांना असे उपचार मिळत होते. आज ९० टक्क्यांच्या वर स्त्रियांना अशी औषधं मिळत आहेत. आता तर गरोदर नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषही औषधांच्या छत्रछायेत आले आहेत.

एचआयव्हीग्रस्त आयांनी स्तनपान द्यावे की नाही, हा प्रश्न मात्र थोडा चकवा देणारा होता. आईच्या दुधातून एचआयव्हीचा धोका असतो. मग फक्त वरचं, म्हणजे पावडरचं दूध देण्याचे प्रयोग झाले. हे दूध जनसामान्यांना परवडणं शक्य नाही. परिस्थितीच्या रेट्यामुळे पावडरचं दूध थोडंथोडंच देणं, पातळच देणं, त्याबरोबर अंगावरचंही देणं, असे भलेबुरे फाटे फुटले. मग, स्वयंसेवी संस्था मदतीला आल्या. पावडरचे डबे फुकट देणाऱ्या योजना आल्या.

पण, पावडरच्या दुधानं एचआयव्हीची ईडा टळली तरी सगळी पीडा संपत नाही. आईच्या दुधानं बाळाला इतर अनेकानेक आजारांपासून संरक्षण मिळत असतं, ते पावडरच्या दुधातून मिळत नाही. पावडरचं दूध देऊन एचआयव्हीसारख्या गाजावाजा झालेल्या आजारापासून वाचवलेली बाळं; ‘मां का दूध’ न मिळाल्यानं जुलाब, कुपोषण, न्यूमोनिया अशा गरीबाघरच्या आजाराला चूपचाप बळी पडण्याची शक्यता खूप.

पण, यथावकाश औषधं उपलब्ध झाली तसा हाही प्रश्न मिटला. सरसकट वरचं दूध देण्याचा सल्ला अगदी अपवादात्मक परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात आला. जिथे वरचे देणे संपूर्ण सुरक्षित आहे अशा वेळीच वरचे, एरवी अंगावरचेच, हा नियम. पुढे आईला योग्य उपचार सुरू असतील, तर सहा महिने तरी बाळाला निव्वळ अंगावरच पाजावं, अशी शिफारस आली (२०१६). सहा महिन्यांच्या पुढे, वरचा आहार देत देत, अगदी दोन वर्षांपर्यंत अंगावर पाजलं तरी चालेल असंही सांगण्यात आलं. हे म्हणजे इतर चार बायकांना जो सल्ला दिला जातो तोच झाला. म्हणजे स्तनपानाच्या बाबतीतला एचआयव्ही आणि बिगर-एचआयव्ही असा फरक औषधांमुळे संपुष्टातच आला.

बाळाला संसर्ग झाला आहे वा नाही हे झटपट आणि नेमकेपणानं सांगणाऱ्या तपासण्या नव्हत्या. आता महिन्या - दीड महिन्याच्या बाळालाही एचआयव्ही आहे का हे तपासता येतं; तपासलं जातं. सहा महिन्यांनी पुन्हा तपासलं जातं. वर्ष - दीड वर्षाचं झाल्यावर, दूध तोडल्यावरही तपासता येतं; तपासलं जातं. जर सर्व काळजी घेऊनही बाळाला लागण झाल्याचं निदर्शनास आलं तर इतक्या तान्ह्या बाळाला औषधंही सुरू करता येतात; केली जातात. दीड महिन्याला पॉझिटिव्ह येतात ती गर्भावस्थेतच लागण झालेली बाळं. आधी निगेटिव्ह आणि दीड वर्षाच्या अखेरीस पॉझिटिव्ह येतात ती स्तनपानातून एचआयव्ही झालेली बाळं. ताबडतोब उपचार सुरू केले की बरंच भलं होतं त्यांचं.

एकुणात या जटिल प्रश्नांवर प्रयत्नपूर्वक मात केली आहे आपण. या आघाडीवर आपण मोठं मैदान मारलं आहे. पण, अजूनही आव्हानं संपलेली नाहीत. गरोदरपणी आपोआपच बायका डॉक्टरांच्या निगराणीत राहतात. यामुळे जन्मादरम्यान होणाऱ्या लागणीचं प्रमाण आटोक्यात आलं आहे. मात्र अंगावर पाजणाऱ्या बायका काही वारंवार दवाखान्यात येत नाहीत. अशा महिला बरेचदा औषधं सोडतात आणि मग त्यांच्या बाळांना दुधातून लागण होते. आयांना सतत औषधं घेत ठेवणं हे एक मोठंच आव्हान आहे. त्यामुळे तुलनेनं दुधातून एचआयव्ही बाधा हा प्रकार आता जास्त आढळतो. ज्या बाळांना एचआयव्ही होतो त्यांनाही औषधं देत राहणं हेही एक मोठ्ठं आव्हान आहे. यांच्या आई-बापांचे अनेक प्रश्न. एचआयव्ही, नोकरी, व्यसनं, आर्थिक ओढाताण असे अनेक. त्यात या बाळाच्या औषधोपचारचा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. जेमतेम अर्धी जनताच हे करू जाणे.

एचआयव्हीविरुद्धची लढाई जारी असली तरी एक चकमक आपण जिंकलेली आहे. प्रतिबंधासाठीच्या सगळ्या अटी, शर्ती पाळल्या तर लागण होण्याची शक्यता जवळपास शून्य होते. माझ्या स्वतःच्या छोट्याशा दवाखान्यात २५ वर्षांत अशी एकही केस घडलेली नाही! जागतिक आरोग्य संघटनेचं घोषवाक्यच मुळी ‘झीरो व्हर्टीकल ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असं आहे. अग्नीतून सहीसलामत पार जाण्याला अग्निदिव्य म्हणतात. हे एचआयव्हीदिव्य. औषधांच्या साहाय्यानं गेल्या दहा वर्षांत, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी, एचआयव्हीचा हा अनाहूत वारसा नाकारला आहे. हे एचआयव्हीदिव्य पार केलं आहे.

(उत्तरार्ध)

(लेखक स्त्री आरोग्यतज्ज्ञ आहेत.)

shantanusabhyankar@hotmail.com

Web Title: Although the success in preventing mother transmission HIV to her baby , but there are still challenges ! !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला? - Marathi News | HIV AIDS Undetectable, Untransmissible pregnancy & becoming a parent, story of a journey | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाला HIV चा लोप, संपला संसर्गाचा कोप, गरोदरमातांपासून बाळांना होणारा संसर्ग कसा कमी झाला?

तीस पस्तीस वर्षांपूर्वी, एचआयव्ही बाधित जोडपे जर म्हणाले की, आम्हाला मूल हवंय, तर अंगावर काटा यायचा, पण मग हे कोडं कसं सुटलं? ...