Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मासिक पाळीत अस्वच्छ पॅड्स वापरल्याने गर्भाशयाला इन्फेक्शन होण्याचा धोका; स्वच्छता आणि आरोग्य सांभाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 18:15 IST

मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर जंतूसंसर्ग होऊन मोठ्या आजारांचा त्रास होण्याची शक्यता असते.

ठळक मुद्दे नकोसे अनुभव टाळण्यासाठी लहान साध्या गोष्टी पाळणं महत्वाचं आहे. काळजी घेणंच योग्य.

स्त्रीच्या शरीरातील पुनरुत्पादनाचं आरोग्य सांभाळणारी मासिक पाळी ही एक नॉर्मल जीवशास्त्रीय घटना आहे. बीजांडकोषातून निघालेल्या बीजांडाचे जेव्हा फलन होत नाही, तेव्हा त्यासाठी तयार झालेलं गर्भाशयाचं अस्तर शरीराकडून टाकून दिलं जातं. यात असणाऱ्या रक्त, अस्तराचे भाग आणि म्यूकस या सगळ्याला एकत्रितपणे मासिक स्त्राव म्हंटलं जातं. आरोग्याची मूलभूत काळजी आणि पुरेशी काळजी घेतली तर मासिक पाळी सुरळीतपणे पार पडू शकते. प्रत्येक स्त्रीला दर महिन्यात चार ते ५ दिवस मासिक पाळी येते. त्याची कोणी आतुरतेने वाट जरी बघत नसलं  तरी मासिक पाळीच्या काळात जगणं अवघड व्हायला नको, म्हणून स्वच्छतेच्या काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती हव्याच.

(Image : Google)

मासिक पाळीतील स्वच्छता पाळण्याच्या पद्धती

१. सॅनिटरी नॅपकिन दर ४-५ तासांनी बदला: एकदा मासिक स्त्राव शरीरातून बाहेर पडला की त्याचं विघटन होऊ लागतं. वापरलेलं, ओलसर पॅड योनिमार्गाच्या आणि त्वचेच्या जवळ फार काळ ठेवल्यामुळे जंतुसंसर्ग होऊन खाज येणं, ऍलर्जी, वेदनादायक चट्टे किंवा युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतं. पॅड्स किंवा टॅम्पून्स नियमितपणे बदलल्याने अशा संसर्गाची शक्यता कमी होते. विशेषतः टॅम्पून्स जर फार काळ शरीराच्या आत ठेवले तर त्याने धूसर का असेना, टॉक्सिक शॉक सिंड्रोमची शक्यता असते.

२. बाजारात सॅनिटरी नॅपकिन्सचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी स्त्राव किती होतो आहे याप्रमाणे योग्य तेवढं शोषून घेणारं पॅड निवडणं महत्वाचं असतं.

३. काही मुली  सॅनिटरी पॅड बरोबर कापड, टॅम्पून्स किंवा अजून एक पॅड वापरत असतील तरी ती काही चांगली कल्पना नव्हे. पॅड नियमितपणे बदलणं हेच योग्य आहे. एकाहून अधिक पॅड्स किंवा टॅम्पून्समुळे रॅशेस आणि संसर्ग होऊ शकतो.

४. वापरलेल्या पॅडवरील जंतू इतरत्र पसरू नयेत यासाठी पॅड बदलल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजेत.

(Image : Google)

५. पाळीच्या काळात बाहेर जातांना हाताशी अजून एक अंतर्वस्त्रांचा जोड ठेवला पाहिजे. जर का निकरवर डाग पडले असतील तर ती बदलून धुवून टाकली पाहिजे. डाग पडलेलं अंतर्वस्त्र तसंच घालून चालणं हिताचं नाही.

६. योनीच्या बाहेरील भागाच्या त्वचेला घड्या असतात. त्यात रक्त साचून दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे तो भाग नियमितपणे धुवा. योग्य तऱ्हेने धुणंदेखील महत्वाचं आहे. योनिमार्गाकडून गुद्द्वाराकडे धुवा, उलटं करू नका. त्याने जंतुसंसर्गाचा धोका वाढतो.

७. योनीमार्ग हा स्वतः स्वतःला स्वच्छ ठेवणारा अवयव आहे. तेथील नैसर्गिक स्रावांची रचना बदलू न देणं महत्वाचं असतं. डॉक्टर्स या भागाची स्वच्छता पाणी आणि कमी तीव्र साबणाने करायला सांगतात. तीव्र साबण, डिओ आणि सुवासिक वस्तूंचा वापर इथे टाळला पाहिजे कारण यातील रसायनांनी त्वचेला त्रास होऊ शकतो.

८. झोपेत शरीराची क्रिया मंदावते आणि रक्तस्रावही कमी होतो. त्यामुळे जर अतिरक्तस्राव होत नसेल किंवा डाग पडत नसतील तर रात्रभरात एकच पॅड वापरायला हरकत नाही.

८. पाळीच्या काळातील अस्वच्छता आणि अस्वच्छ पॅड यामुळे रिप्रॉडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतं ज्यामुळे गर्भाशयाच्या भिंती, बीजांडकोश आणि बीजांडनलिकांना इजा पोचू शकते.

(Image : Google)

९. सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पून्सची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. ते नवीन पॅडच्या कव्हरमध्ये किंवा टॉयलेट पेपरमध्ये नीट गुंडाळून कचऱ्याच्या डब्यात टाकले पाहिजेत. यामुळे त्याची दुर्गंधी आणि आणि काही काळानंतर तिथे तयार होणाऱ्या जंतूंचा प्रसाराला आळा बसेल.

१०. मेन्स्ट्रुअल कप्सवरील जंतू काढून टाकण्यासाठी ते दिवसातून किमान एकदा कोमट पाण्याने आणि जंतुप्रतिबंधक द्रावणाने धुतले पाहिजेत.

महत्त्वाचे ..

वैयक्तिक स्वच्छता राखणं ही सुरक्षित मासिक पाळीची गरज आहे. पाळीच्या स्वच्छतेबद्दल योग्य माहिती नसल्यामुळे एखादीला गरजेपेक्षा जास्त त्रास सहन करावा लागू शकतो. जंतुसंसर्ग आणि इतर नकोसे अनुभव टाळण्यासाठी लहान साध्या गोष्टी पाळणं महत्वाचं आहे. काळजी घेणंच योग्य.

 विशेष आभार : डॉ. रीना वाणी (Obstetrician & Gynecologist) (MD, FRCOG, FICOG, DNBE, DGO, DFP, FCPS)

 

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्य