Join us   

पाळीच्या दिवसात चेहऱ्यावर फोड-पिंपल्स येतात, चेहरा ड्राय दिसतो? 5उपाय, चेहरा दिसेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2022 6:56 PM

पाळीच्या काळात खराब होणाऱ्या चेहऱ्यावर  काळजी घेणं हाच एक उपाय.. चेहऱ्याची काळजी घ्यायची म्हणजे नेमकं काय करायचं?

ठळक मुद्दे पाळीच्या काळात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी नेहमीचं माॅश्चरायझर वापरु नये. ग्रीन टी आणि कोरफडचा गर याद्वारे तेलकट त्वचेची काळजी घेता येते. पाळीच्या काळात जास्त मेकअप केल्यास त्याचा त्वचेवर दुष्परिणाम दिसून येतो. 

पाळीच्या काळात होणाऱ्या अनेक त्रासांपैकी एक त्रास म्हणजे चेहरा खराब होतो. बऱ्याच महिला आणि मुलींच्या बाबतीत पाळीत चेहरा खराब होण्याची समस्या दिसून येते.  चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात, फोड येतात, त्वचा कोरडी होते किंवा खूपच तेलकट होते. पाळीच्या काळात ॲस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेराॅन या दोन हार्मोन्समधे असंतुलन निर्माण झाल्यानं त्वचा खराब होते असं तज्ज्ञ सांगतात. पाळीच्या काळात त्वचा खराब होण्यामुळे अनेकजणींचा मूड  जातो. आधीच काही करावंसं वाटत नाही त्यात चेहरा खराब दिसत असल्यानं त्याचा मानसिक पातळीवरही अनेकजणी त्रास करुन घेतात. पण तज्ज्ञ सांगतात यावर वैतागणं, चिडणं, स्वत: बद्दल न्यूनगंड बाळगणं हा पर्याय नाही,. पाळीच्या काळात हार्मोन्समध्ये निर्माण होणारं असंतुलन  थांबवणं, दुरुस्त करणं आपल्या हातात नसतं. पण या काळात त्वचेची विशेष काळजी घेऊन त्वचा खराब होण्यापासून् नक्कीच सुरक्षित ठेवता येते. 

ImageL: Google

पाळीत त्वचेची काळजी घेताना...

1. पाळीत ज्यांची त्वचा कोरडी पडते, रुक्ष  होते, ज्यांच्या त्वचेचे पोपडे निघतात त्यांनी नेहमी वापरतो त्या माॅश्चरायझरऐवजी पेट्रोलियम जेलीचा वापर करवा,  रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करावा. मग पेट्रोलियम जेली चेहरा, मान, हात, पाय यास हलका मसाज करत लावावी. पाळीच्या काळात हा उपाय केल्यास त्वचा कोरडी होण्यास प्रतिबंध होतो. 

2. पाळीच्या काळात त्वचा खूपच तेलकट होत असल्यास, त्वचेवर फोड, मुरुम पुटकुळ्या येत असल्यास ग्रीन टीचा उपाय करावा.  पाणी उकळून त्यात थोडा ग्रीन टी घालावा. ग्रीन टी थंड होवू द्यावा. थंडं झालेला ग्रीन टी कापसाच्या बोळ्याच्या मदतीनं चेहऱ्यास लावावा.  15-20 मिनिटांनी चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. नंतर चेहरा माॅश्चराइज करण्यासाठी कोरफडचा गर चेहऱ्यास लावावा. ग्रीन टी आणि कोरफडचा गर लावल्यानं पाळीच्या काळातील तेलकट त्वचेनं निर्माण होणाऱ्या समस्यांची तीव्रता कमी होते. 

Image: Google

3. मासिक पाळीच्या काळात पोटात, कंबरेत कळा येण्यानं, वेदना होण्यानं थकवा जाणवतो. हाच थकवा चेहऱ्यावरही दिसतो. या काळात प्रसन्न दिसण्यासाठी इसेन्शिअल ऑइलचा उपयोग करता येतो. रोज हिप ऑइल, लवेंडर इसेन्शिअल ऑइल, सॅंडलवूड इसेन्शिअल ऑइल,  लेमन इसेन्शिअल ऑइल या ऑइल्सचा वापर करता येतो. यासाठी आंघोळीला कोमट पाणी घ्यावं. पाण्यात इसेन्शिअल ऑइलचे  4-5 थेंब घालावेत. या पाण्यानं आंघोळ केल्यास  त्वचा ताजीतवानी होते. मूड चांगला होतो. आपल्याला जे इसेन्शिअल ऑइल मानवतं त्याचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

4. पाळीच्या काळात त्वचा संवेदनशील होते. या काळात जर जास्त मेकअप केल्यास त्याचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. या काळात मेकअपच्या अति उपयोगानं त्वचेवर फोड येऊन चेहरा खराब होतो. हे टाळण्यासाठी तज्ज्ञ नैसर्गिक घटकांचा वापर करण्याचा सल्ला देतात. पाळीच्या काळात अनेक महिलांना खूप घाम येण्याची समस्या असते. घाम येत असताना मेकअप जास्त केल्यास त्वचेची रंध्रं बंद होतात. त्वचेला श्वास घेणं अशक्य होवून त्वचा जास्त  खराब होते. त्यामुळे तज्ज्ञ पाळीच्या काळात मेकअप न करण्याचा, मेकअप प्रोडक्टसचा वापर कमी करण्याचा, नैसर्गिक उत्पादनं वापरण्याचा सल्ला देतात. 

Image: Google

5. मासिक पाळीच्या काळात  चेहरा सूजलेला दिसतो. चेहऱ्यावरची सूज घालवण्यासाठी तज्ज्ञ चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर माॅश्चरायझरनं किंवा  फेशिअल ऑइलनं चेहऱ्याचा 5-7 मिनिट मसाज करण्याचा सल्ला देतात. यासाठी क्लीन्जिंग बाम वापरला तरी चालतो. या बाममुळे चेहरा स्वच्छ होतो आणि चेहऱ्याचा मसाज देखील होतो. चेहऱ्याचा मसाज केल्यानं सूज कमी होते. 

टॅग्स : त्वचेची काळजीमासिक पाळी आणि आरोग्यब्यूटी टिप्स