Join us   

मासिक पाळीच्या काळात मेन्स्ट्रुअल कप वापरताना काय काळजी घ्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 5:16 PM

मेन्स्ट्रुअल कप वापरण्याची चर्चा होते, मात्र तो वापरताना काय खबरदारी घ्यायची, आरोग्य आणि स्वच्छतेचे कोणते नियम पाळायचे हे माहित करुन घ्यायला हवं.

ठळक मुद्दे पूर्ण स्वच्छता घेण्याची तयारी असेल तरच हे कप उपयुक्त ठरू शकतात.

-डॉ. गौरी करंदीकर (स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ)

पिरिअड्स... फक्त उच्चारलं तरी आपल्या कपाळावर आठ्या येतात. त्या दिवसांमधली पोटदुखी. कंबरदुखी. पहिले तीन दिवस होणारा हेवी फ्लो. ती हलकीशी दुर्गंधी. सतत मनामध्ये निर्माण होणारी भीती... लिक तर नाही ना? सतत मैत्रिणींना विचारणं, मागे बघ ग प्लीज. ड्रेसवर डाग तर नाही ना? यात भर म्हणून त्या दिवसांत येणारा बुजरेपणा, एक प्रकारचा अवघडलेपणा. शाळा कॉलेजात जात असताना, आफिसमध्ये वा घरी असतानाही मासिक पाळीचे ते पाचेक दिवस बहुतांश सर्वच मुलींना-बायकांना नकोसेच वाटतात. अगदी या काळात वापरल्या जाणाऱ्या कापडी घडीची जागा पॅड्सने घेतली. पण घडीप्रमाणेच पॅड्स व्यवस्थित बसलेत ना, ते सरकले तर नसतील ना असे प्रश्न काही पाठ सोडत नाही. पॅड्सला पर्याय म्हणून टॅम्पून्स आले. मात्र तरीही, त्या दिवसांमधली ती अनाहूत भीती, अस्वस्थता अजूनही दूर झालेली नाही. कारण टॅम्पून्स पाठोपाठ ते जास्त वेळ आत राहिल्याने होणारा टॉक्सित शॉक सिंड्रोम आजाराचाही तेवढाच बोलबाला झाला. आता टॅम्पून्सना पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप समोर येत आहेत.

मेन्स्ट्रुअल कपचा पर्याय प्रगत देशांमध्ये फार पूर्वीपासूनच दिसून येतो. पण आपल्याकडे गेल्या काही वर्षांतच या कप विषयी बोललं जातंय. तेही आनलाईन जाहिरातींच्या माध्यमातून वा फेसबुकसारऱख्या सोशल मिडियावर असलेल्या बायकांच्या ग्रुपमधून. मासिक पाळीदरम्यान पॅडच्या तुलनेत हे कप खर्चिक असले तरी ही वन टाईम इनव्हेस्टमेंट असल्याचं कपची विक्री करणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं आहे. कारण हे कप रियुजेबल असतात आणि ते तुम्ही साधारण पाच वर्ष वापरू शकता.

मेन्स्ट्रुअल कप

हे कप बेल शेप (घंटाकार) असून ते 2 इंच लांब असतात. काही कप हे सिलिकॉनपासून बनवलेले असतात तर काही रबरपासून. ते दोन प्रकारांत आढळतात. एक रियुजेबल आणि दुसरा डिसपोजेबल. रियुजेबल तुम्ही पाच वर्ष वापरू शकता तर काही डिसपोजेबल कप हे प्रत्येक मेन्स्ट्रुल सायकलनंतर बदलावे लागतात तर काही प्रत्येक युजनंतर बदलावे लागतात. मासिक पाळी दरम्यान टॅम्पून्स प्रमाणेच हे कप योनी मार्गात बसवले जातात. फरक इतकाच की टॅम्पून्स पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव शोषून घेते तर हा कप रक्त गोळा करते. योनी मार्गात कप व्यवस्थित बसवल्यास लिक होण्याची भीती नसते तसेच दुर्गंधीपासूनही सुटका होते. हा कप ८ ते १२ तास वापरता येतो. फ्लो नुसार या कपच्या साईजही उपलब्ध आहेत.

 

कप कसा वापरावा?

हा कप फोल्ड करून योनीमार्गातून आत बसवायचा असतो. या कपची एक बाजू चिमटीत पकडून तो बाहेर काढता येतो. त्यात जमा झालेला स्त्राव टॉयलेटमध्ये रिकामा करून पाण्याने कप स्वच्छ करावा. आपले हात स्वच्छ धुवून मगच कप पुन्हा वापरता येतो. पाळी पूर्ण झाल्यानंतर मात्र कप धुवून उकळत्या पाण्यात उकळवून स्वच्छ केला जातो. दिवसातून फक्त एकदाच हा कप रिकामा करावा लागतो. कप वापरण्याबद्दलच्या सूचना प्रत्येक ब्रॅंडने बॉक्सवर दिलेल्या असतात. त्या सूचनांचे काटेकोर पालन करणं अपेक्षित असतं. सध्या तरी बायकांना हे कप उपयुक्त वाटतात. कारण पाळीदरम्यान होणार्या लिकेजच्या समस्येतून सुटका तर होतेच पण ते सारखे बदलावेही लागत नाहीत. शिवाय पैसेही वाचतात. धावणं, पोहण्यासारख्या अक्टिवीटी तुम्ही बिनधोक करू शकता.

कपचा काही त्रास?

आपल्या देशात बहुतांश आजार हे हात स्वच्छ न धुतल्यानेच उद्भवतात. साधा डायरियासारखा आजारही. मुळात आपल्याकडे स्वच्छतेचं महत्त्व अजूनही लोकांना उमगलेलं नाही. कप वापरण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे, कपची आणि हातांचीही. शिवाय कपमध्ये जमा केलेलं ब्लड योग्य ठिकाणी डिसपोज करणंही गरजेचं आहे. आपल्याकडच्या सार्वजनिक टॉयलेट्सची दशा तुम्हाला सांगायला नको. पण कपमध्य़े जमा केलेला स्त्राव नाही. तो योग्य ठिकाणीच डिसपोज व्हायला हवा. शिवाय टॅम्पून्स वापरणार्यांमध्ये जसं टॉक्सिक शॉक सिंड्रोम आढळला होता. तसंच कप वापरणाऱ्यांमध्येही आढळू शकतो. कप जास्त वेळ आत राहिल्यास पोटदुखी, ताप, युरिन इन्फेक्शन, सेफ्टिक उद्भवू शकते. कारण रक्तात जंतू वेगाने वाढतात. वारंवार संसर्ग झाल्याने वंध्यत्व ही येऊ शकते. पूर्ण स्वच्छता घेण्याची तयारी असेल तरच हे कप उपयुक्त ठरू शकतात.

टॅग्स : महिलाआरोग्य