Join us   

सावधान! मेनॉपॉजच्या काळात स्मरणशक्ती होते कमी; विसरण्याचा आजार कायमचा लागतो मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 1:23 PM

मेनॉपॉजच्या काळात होणारे परिणाम तात्कालिक असतात असा समज होता, पण अभ्यास म्हणतो ते खरं नाही..

ठळक मुद्दे शिकणं-समजून घेण्याच्या मेंदूच्या प्रक्रियेसह स्मरणशक्तीवर या टप्प्याचा परिणाम होतो, असं हा अभ्यास सांगतो. ‘द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी’च्या जर्नलमध्ये हा अभ्यास ऑनलाइन प्रसिद्ध झाला.

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती महिलांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. रजोनिवृत्तीचे परिणाम तात्कालिक असतात, असाच समज आहे. पण, हा समज खोडून काढणारा अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला. शिकणं-समजून घेण्याच्या मेंदूच्या प्रक्रियेसह स्मरणशक्तीवर या टप्प्याचा परिणाम होतो, असं हा अभ्यास सांगतो. ‘द नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटी’च्या जर्नलमध्ये हा अभ्यास ऑनलाइन प्रसिद्ध झाला. नैराश्य, भीती, गरम वाफा या समस्यांचा सामना रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर अनेक महिलांना करावा लागतो. पण, या समस्या विशिष्ट काळापुरत्याच असतात, असं आजवरचे अभ्यास म्हणत होते. मात्र, हा नवीन अभ्यास मात्र सांगतो आहे की, रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर होणारे परिणाम दीर्घकाळ राहतात आणि मेंदूच्या शिकण्या-समजण्याच्या प्रक्रियेवरही त्यांचा परिणाम होतो. या आधीच्याही काही अभ्यासात रजोनिवृत्तीमुळे महिलांच्या या क्षमतेत समस्या निर्माण होतात, हे अभ्यासकांनी मान्य केलं होतं.

पण, हा बदल किती काळ टिकतो यावर मात्र या अभ्यासाच्या निमित्ताने पहिल्यांदाच निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. एचआयव्ही, गरिबी, कमी शिक्षण, लैंगिक शोषण, अतिताण, आरोग्य सुविधांची अनुपलब्धता, मानसिक समस्या या साऱ्यांचाही या टप्प्यावर परिणाम होताे, असंही हा अभ्यास म्हणतो.  या नवीन अभ्यासाने रजोनिवृतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावर (रजोनिवृत्ती सुरू होण्यापूर्वी, रजोनिवृत्ती सुरू असताना आणि रजोनिवृत्ती झाल्यानंतर) संज्ञात्मक प्रक्रियेत कसा बदल होतो याची निरीक्षणं नोंदवली आहेत. रजोनिवृत्तीपूर्वी किंवा रजोनिवृत्तीच्या टप्प्यावर दिसणारे बदल रजोनिवृत्तीनंतरही टिकून राहातात आणि महिलांच्या बौद्धिक कामावर परिणाम करतात, असा निष्कर्ष काढला आहे.

टॅग्स : आरोग्यमहिला