Join us   

World Aids Day : अजूनही अनेक महिलांना माहितीच नाही, की एड्स म्हणजे नक्की काय असतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 12:35 PM

महिलांमध्ये एडससारख्या गंभीर आजाराबाबत जनजागृतीची आवश्यकता, कुटुंबाच्या आरोग्यासाठी माहिती असणे गरजेचे

आज १ डिसेंबर जागतिक एडस दिन (World Aids Day) म्हणून ओळखला जातो. एखाद्या आजाराबाबत जनजागृती असणे त्या देशाच्या आणि राज्याच्या आरोग्याच्यादृष्टीने फायदेशीर असते. एड्स म्हणजेच ह्युमन इम्युनोडेफिशिअन्सी व्हायरस (HIV) सारख्या गंभीर आजाराबाबत तर माहिती असायलाच हवी. पण महाराष्ट्रात या आजाराबाबत माहिती  नसणाऱ्या महिलांची संख्या १२ टक्के इतकी आहे. गुप्तरोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराबाबत तरुणींपासून ते सर्वच वयोगटातील महिलांना माहित असणे आवश्यक आहे. शारीरिक संबंध ठेवताना समोरचा व्यक्ती जर एचआयव्ही पॉझिटीव्ह असेल तर या आजाराचे संक्रमण आपल्यालाही होऊ शकते. तसेच इतरही काही कारणांनी आपण या आजाराचे बळी होऊ शकतो. भारतात आणि महाराष्ट्रात या आजाराच्या रुग्णांची संख्या मागील काही वर्षात वाढताना दिसत आहे. त्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची आकडेवारीही जास्त आहे. असे असताना या आजाराबाबत जागरुकता होणे गरजेचे आहे.  

(Image : Google)

असुरक्षित शारीरिक संबंध, आजाराचे वेळेवर निदान न होणे यामुळे केवळ जोडीदारच नाही तर नव्याने ज न्माला येणारे मूलही एचआयव्ही बाधित असते आणि त्यामुळे कुटुंबापुढील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढतात. महाराष्ट्रात अशी अनेक कुटुंबे आज शारीरिक, आर्थिक, सामाजिक, मानसिक अडचणींचा सामना करताना दिसतात. या आजारावर औषधोपचार उपलब्ध असले तरीही हा आजार पूर्णपणे बरा होणारा नाही. त्यामुळे व्यक्तीला एकावेळी आरोग्याच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. असे असताना राज्यातील १२ टक्के महिलांनी या आजाराचे अद्याप नावही ऐकलेले नाही ही बाब धक्कादायक म्हणावी लागेल. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून ही गोष्ट नुकतीच समोर आली. आता ज्यांनी एडसबाबत ऐकले आहे त्यांनाही त्याबाबत कितपत पुरेशी माहिती आहे हाही प्रश्न यामुळे निर्माण होतो.

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराबाबत पुरेशी जागरुकता असूनही त्यांना हा आजार होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. देशात दिल्ली, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि दिव व दमण येथील महिलांमध्ये एडसबाबत बऱ्यापैकी जागरुकता असल्याचे समोर आले आहे. तर देशात पंजाबमध्ये सर्वाधिक म्हणजे ४९ टक्के महिलांना या आजाराबाबत माहिती असल्याचे समजते. तर आसाममधील महिलांच्या एकूण संख्येपैकी केवळ ९.४ टक्के महिलांनाच या आजाराबाबत माहिती असून दादरा नगर हवेलीमध्येही ९.३ टक्के महिला या आजाराबाबत सजग आहेत. 

(Image : Google)

एकाच व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास किंवा शारीरिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर केल्यास या आजारापासून दूर राहता येणे शक्य आहे याबाबत राज्यातील २८ टक्के महिलांमध्ये जागृती नाही. त्यामुळे हा आजार वाढण्याचा वेग आणि रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसते. एडस या जीवघेण्या आणि गंभीर आजाराबाबत संपूर्ण माहिती असलेल्या महिला राज्यात केवळ ३४ टक्के आहेत. त्यामुळे हा आजार इतका गंभीर आणि अतिशय नाजूक विषयाशी निगडित असूनही आपल्याकडे त्याबाबत पुरेशी जागृती नाही ही अतिशय खेदाची बाब आहे. या आजारामध्ये सुरुवातीला विशेष लक्षणे दिसत नाहीत. पण मळमळ, डोकेदुखी, घाम येणे, पोट खराब होणे अशा काही तक्रारी उद्भवतात. बहुतांशवेळा या आजाराचे निदान व्हायला उशीर झाल्याने तो तिसऱ्या किंवा शेवटच्या टप्प्यात गेलेला आढळतो. एकूणच महिलांना याबाबत जागृत करणे आणि सुरक्षित शारीरिक संबंधाविषयी माहित असणे आवश्यक असून त्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स : आरोग्यएड्सलैंगिक आरोग्यलैंगिक जीवन