Join us   

Teeth Care: ठणकणाऱ्या दातांवर 5 घरगुती उपाय, तोंडाचे आरोग्य सांभाळा, दातदुखी टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 3:25 PM

Pain In Teeth And Gum: गारेगार आईस्क्रिम, कैरीचे आंबटचिंबट पदार्थ खाताना दात ठणकू लागले असतील तर हे काही घरगुती उपाय करून बघा आणि दातांचे आरोग्य (teeth care) सांभाळा..

ठळक मुद्दे दातांचं दुखणं कमी करायचं असेल तर डॉक्टरकडे जाण्याआधी हे काही घरगुती उपाय करून बघायला हरकत नाही. 

कळत नकळत कुठेतरी तोंडाच्या आरोग्याकडे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते आणि नेमका त्याचाच परिणाम दातांवर दिसू लागतो. दात किडतात, दुखतात, हिरड्यांचेही (gum) दुखणे मागे लागते. आता तर उन्हाळा असल्याने फ्रिजमधले थंडगार पाणी, वेगवेगळी सरबते, आईस्क्रिम- कुल्फी आणि कैरीपासून तयार केलेले आंबटचिंबट पदार्थ यांची तर खूपच रेलचेल असते. नेमके हे सगळे पदार्थ खाल्ले की अनेक जणांचे दात ठणकू लागतात. काही जण तर खूप आवडत असूनही केवळ दातांच्या समस्येमुळे या पदार्थांचा आनंद घेऊ शकत नाहीत. म्हणूनच तर दातांचं दुखणं कमी करायचं (how to reduce pain in gum and teeth) असेल तर डॉक्टरकडे जाण्याआधी हे काही घरगुती उपाय करून बघायला हरकत नाही. 

 

दातदुखीवर घरगुती उपाय.. १. लवंग लवंगमध्ये ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टी फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जर दात ठणकू लागला असेल तर एक- दोन लवंग त्या दुखऱ्या दाताखाली ठेवून थोडीशा चावणे. यामुळे दातांची ठणक हळूहळू कमी होऊ लागते. लवंगेचं तेल उपलब्ध असेल तर ते ही दातांवर दिवसातून एक- दोन वेळा चोळावं.

 

२. आलं दातदुखी थांबविण्यासाठी आल्याचा वापरही खूप गुणकारी ठरतो. यासाठी लवंगेप्रमाणेच आल्याचा वापर करावा. आल्याचा लहानसा तुकडा दुखऱ्या दाताखाली, दाढेखाली ठेवून चावावा. २० ते २५ मिनिटे तसाच ठेवावा. 

 

३. मीठाच्या पाण्याने गुळण्या दाताचा ठणका कमी करण्यासाठी मीठ अतिशय उपयुक्त ठरते. हा उपाय करण्यासाठी पाणी थोडं काेमट करा. त्यात एखादा चमचा मीठ टाका. व्यवस्थित हलवून घेतलं की या पाण्याने गुळण्या करा. दातांतील घाण काढून टाकण्यासाठी मीठाचा खूपच फायदा होतो.

 

४. लसूण  लसूणमध्येही भरपूर प्रमाणात ॲण्टी बॅक्टेरियल आणि ॲण्टीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे दातांचा ठणका थांबविण्यासाठी लसूणचा वापर करता येतो. यासाठी जेवताना लसणाच्या भाजलेल्या पाकळ्या घ्या आणि जो दात ठणकतो आहे, त्याच्याखाली त्या ठेवून चावावा. लसूण पेस्ट करून ती देखील तुम्ही दुखऱ्या दातावर आणि त्यावरच्या हिरड्यांवर लावू शकता. 

 

५. पेरुची पाने दातदुखीवर एक उत्तम उपाय म्हणजे पेरुची पाने. पेरूच्या पानांमध्ये असणारे घटक दातांचं आणि एकंदरीतच तोंडाचं आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरुच्या पानांमध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. दातदुखी थांबविण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. हे सगळे उपाय दातांची ठणक तात्पुरती थांबवू शकतात.     

टॅग्स : आरोग्यहोम रेमेडी