Join us   

कुलरमध्ये साचलेल्या पाण्यात डास होण्याचा धोका-आजारांना आमंत्रण; करा 5 उपाय, डास गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 5:41 PM

थंड हवेसाठी लावलेल्या कुलरच्या पाण्यात डास होण्याचा धोका; 5 उपाय करा डास होण्याचा धोका टाळा !

ठळक मुद्दे राॅकेलमधील रासायनिक घटकांमुळे डास मरतात. व्हाइट व्हिनेगरचा उपयोग स्वच्छतेसोबतच डास होवू नये यासाठीही होतो. कडुलिंबातील कडवटपणामुळे डास होत नाही. 

कुलरमुळे थंड हवा मिळते म्हणून भर उन्हाळ्यात निवांत आराम करता येतो. पण कुलरकडे दुर्लक्ष केल्यास डासांची समस्या उद्भवते. कुलरच्या पाण्यात डास अंडी घालतात त्यामुळे उन्हाळ्यात डेंग्यूचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी कुलरच्या पाण्यात डास होणार नाही याची काळजी घ्यावी.  5 सोपे उपाय केल्यास कुलरच्या पाण्यात डास होण्याची समस्या दूर होते. 

Image: Google

कुलरच्या पाण्यात डास होवू नये यासाठी...

1. कुलरच्या पाण्यात डास होवू नये यासाठी राॅकेलचा उपयोग करता येतो. राॅकेलमध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे डासांचा जीव गुदरमरतो. यासाठी कुलरच्या पाण्यात दोन ते तीन बूच राॅकेल टाकावं. आठवड्यातून दोन वेळा कुलरच्या पाण्यात राॅकेल घालावं.

Image: Google

2. डास होवू नये यासाठी कुलरच्या पाण्यात इसेन्शियल ऑइलही घालता येतं. यासाठी नीलगिरीचं तेल किंवा लेमनग्रास ऑइलच वापरावं लागतं. कुलरच्या पाण्यात इसेन्शियल ऑइलचे काही थेंब घालावेत. या उपायानं डास मरतात. आठवड्यातून दोन वेळा कुलरच्या पाण्यात इसेन्शियल ऑइल घालावं.

3. व्हाइट व्हिनेगरचा जसा स्वच्छतेसाठी उपयोग होतो तसाच त्याच उपयोग डासांसाठीही करता येतो.व्हाइट व्हिनेगरमधील गुणधर्मांमुळे डास मरतात. यासाठी कुलरच्या पाण्यात आठवड्यातून एकदा एक बूच व्हाइट व्हिनेगर घालावं. व्हाइट व्हिनेगर ऐवजी ॲपल सायडर व्हिनेगरचा वापरही करता येतो. 

Image: Google

4. आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या कडुलिंबाच्या पानांचा उपयोग डास मारण्यासाठीही होतो. यासाठी कडुलिंबाची पानं कुलरच्या पाण्यात घालावी. कडुलिंबाच्या पानातील कडूपणामुळे डास मरतात. आठवड्यातून एकदा हा उपाय करावा. 

5. घराच्या, टाॅयलेट , बाथरुमच्या फरशांची स्वच्छता करण्यासाठी फिनाइलचा उपयोग होतो. याच फिनाइलचा उपयोग करुन डासही मारता येतात. यासाठी कुलरच्या पाण्यात 2-3 झाकणं फिनाइल घालावं. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय केल्यास कुलरच्या पाण्यात डास होत नाही. 

Image: Google

हे लक्षात ठेवा..

* कुलरचं पाणी नियमित बदलावं. * कुलर जर दोन तीन् दिवस वापरणार नसू तर कुलरमधलं पाणी काढून टाकावं. * दोन आठवड्यातून एकदा कुलर स्वच्छ करावा.   

 

टॅग्स : हेल्थ टिप्सस्वच्छता टिप्स