Join us

झोपेतून उठतानाच तोंडाला-घशाला खूप कोरड पडतेय, रात्री कोरड पडल्याने जाग येते? ५ कारणं, तब्येत काहीतरी गंभीर सांगतेय, लक्ष द्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2022 13:57 IST

उन्हाळ्यात घशाला-तोंडाला कोरड पडण्याचा त्रास अनेकांना जाणवतो, एरव्हीही काहीजण ही तक्रार करतात, त्याची कारणं काय?

ठळक मुद्दे अनेकजण पाणीच कमी पितात. उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाणी कमी होण्याचा त्रास वाढतो.

ऊन प्रचंड वाढू लागलं आहे. दिवसभर तर पाणी पाणी होतंच. त्यात रात्री झोपतानाही पाणी पिऊन झोपावंसं वाटतं. रात्री एकदम जाग येते. घशाला कोरड पडली आहे असं वाटतं, पाणी प्यावंसं वाटतं. असं होतं तुमचं? होत असेल तर ते उन्हाळ्यात तसं नॉर्मलच म्हणायला हवं. मात्र जर गेले काही दिवस रोज सकाळी झोपेतून उठताना तुमच्या घशाला खूप कोरड पडत असेल, तोंड कोरडं पडलं आहे, पोट आतून ओढल्यासारखं वाटतं आहे, कधी एकदा घटाघटा पाणी पितो असं होत असेल तर मात्र जरा लक्ष द्यायला हवं. उन्हाळ्यात असं सकाळी उठल्याउठल्या तोंड कोरडं पडणं योग्य नव्हे. मात्र मुळात हे पहायला हवं की असं नेमकं कशानं होत असेल आणि का? जनरल फिजिशियन डॉ. शैली उपाध्याय यासंदर्भात माहिती देतात..

(Image : Google)

तोंड फार कोरडं पडतंय का?

सकाळी उठतानाच घसा, तोंड, ओठ फार कोरडे पडत असतील तर त्याची ५ कारणं ढोबळमानानं दिसतात. ढोबळमानानं यासाठी की जनरल सामान्य प्रकृती असलेल्या व्यक्तींसंदर्भात ही कारणं दिसतात. ज्यांची तब्येत बिघडलेली आहे, काही आजार आहे त्यांच्यासंदर्भात ही कारणं वेगळीही असू शकतात.

१. औषधं कोणती आणि कधी घेताय?

अगदी साधी ॲसिडिटी, डोकेदुखी, पाठ किंवा गुडघेदुखी किंवा सर्दीची औषधं तुम्ही रात्री घेत असाल आणि वेळा न पाळता कधीही घेत असाल तरीही घशाला, तोंडाला अशी कोरड पडू शकते. त्यामुळे एकतर डॉक्टरांना सांगा की मला असा त्रास होतोय, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे करा. दुसरं म्हणजे औषधं रात्री फार उशीरा घेऊ नका. शक्य तेवढ्या लवकर, रात्री ८ पर्यंत घ्या. आणि रोज तीच वेळ सांभाळा.

(Image : Google)

२. तोंडाने श्वास घेताय, घोरताय का?

अनेकजण हे मान्यच करत नाहीत की आपण घोरतो. मात्र त्यामुळेही घसा कोरडा पडतो. मुख्य म्हणजे अनेकजण तोंडाने श्वास घेतात. त्यानंही घसा कोरडा पडतो, त्यावरही डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

३. स्मोकिंग, दारू पिणे किंवा पॅसिव्ह स्मोकिंग

व्यसनी लोकांना हा त्रास होतोच. मात्र सिगारेट सतत कुणी पीत असेल आणि दिवसभर त्यांच्या संपर्कात राहून पॅसिव्ह स्मोकिंग होत असेल तर तुम्हालाही श्वसनाचे त्रास, घसा कोरडा पडणे असे त्रास होऊ शकतात.

(Image : Google)

४. डिहायड्रेशन

हे कारण उन्हाळ्याशी संबंधित आहेच. अनेकजण पाणीच कमी पितात. उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीरात पाणी कमी होण्याचा त्रास वाढतो. दिवसा लक्षात येत नाही, रात्री मात्र हा त्रास वाढून पायात गोळे येणे ते घसा-तोंड काेरडं पडणं असा त्रास होतो.

५. डायबिटिस आहे?

तुम्हाला नसेलही डायबिटिस पण तरी शूगर वाढली आहे का? एकदा चाचणी करून घ्या. तीन महिन्यांची साखर तपासा, त्यातून कदाचित शुगरचा वाढता त्रास आणि घशाला कोरड याचं काही संबंध लागू शकेल.

टॅग्स : आरोग्यसमर स्पेशल