Join us   

३ दिवस फक्त ताक प्यायचं? सायली संजीव म्हणते तसं 'तक्रकल्प' खरंच असं काही असतं का? आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात...

By manali.bagul | Published: December 06, 2023 4:11 PM

Is buttermilk good to drink every day : अभिनेत्री सायली संजीवचा ३ दिवस फक्त ताक पिऊन राहण्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे, तसे डाएट खरंच करावे का?

मनाली बागुल

आपण फिट राहावं, पचनक्रिया चांगली राहावी, आपल्याला कोणतेही आजार होऊ नयेत असं प्रत्येकालचा वाटतं. सोशल मीडियावर आरोग्यासंबंधी बरेच व्हिडिओज आणि पोस्ट व्हायरल होत असतात. अनेकजण सोशल मीडियावर सुचवलेल्या उपायांची शाहानिशा न करता  हे उपाय करतातही.(Is buttermilk good to drink every day)

अभिनेत्री सायली संजीवचा व्हिडिओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहे यात तिने आयुर्वेदातील तक्रकल्प म्हणजे ताक न पिण्याच्या डाएटबद्दल सांगितले आहे. यात कितपत तथ्य आहे याबाबत आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य परीक्षित शेवडे यांनी लोकमत सखीशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Is Buttermilk Good for You Benefits, Risks)

या व्हायरल व्हिडिओत काय सांगितले आहे?

महिन्यातून ३ तीन दिवस फक्त ताक प्यायचं. ताजं ताक बनवून त्यात काळं मीठ घालून ताक प्यायचे. संध्याकाळपर्यंत तुम्ही कितीही ताक पिऊ शकता. यामुळे तुमची स्किन, पोट क्लिंज होण्यास मदत होते. 

 आयुर्वेद तज्ज्ञांचे मत काय?

डॉक्टर परीक्षित शेवडे सांगतात, ''आयुर्वेदात अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख नाही. काही ठराविक विकारांमध्ये ताकाचा रोजच्या आहारातील वापर वाढवावा लागतो. याचा अर्थ जेवणाऐवजी ताक प्यावं असं नाही. याचे दुष्परिणामही उद्भवू शकतात कारण ताकात पाण्याचे प्रमाण जास्त असते. ३ दिवस सलग पाणी पिऊन  केलेल्या उपवासाप्रमाणे हे आहे. अशक्तपणा येणं, पित्ताचे त्रास वाढणं असे त्रास उद्भवतात. आयुर्वेदानुसार ताकाचे अनेक फायदे असले तरी सलग ताकच प्यावे असा कोणताही संदर्भ आयुर्वेदात नाही. 

उलट ताक हे उष्ण असल्याने जखम होणे, चक्कर येणे, जळजळ होणे, रक्तपित्ताचा त्रास अशा स्थितीत ताकाचे सेवन टाळावे.  ज्या लोकांना नॉन ब्लिडिंग पाईल्स, मूळव्याध आहे त्यांनी वैद्यकिय सल्ल्यानेच अशा स्थितीत ताक प्यावे. ज्यांना आरोग्याचे कोणतेही त्रास नाही त्यांनी रोजच्या जेवणात दुपारच्यावेळी १ वाटी ताक प्यावे. पण सर्दी-खोकल्याचे त्रास असतील तर ताक पिणं टाळलेलंच बरं.''

आपल्या फेसबुक पोस्टमध्येही त्यांनी लोकांना मार्गदर्शन केले की आयुर्वेदाच्या लेबलखाली सांगितली जाणारी प्रत्येक गोष्ट खरोखरच आयुर्वेद असेल असं नाही. तज्ज्ञांशी संपर्क साधूनच कोणतेही आयुर्वेदीक उपाय करा.

टॅग्स : सायली संजीवहेल्थ टिप्सलाइफस्टाइल