Join us   

पेनकिलर सतत घेऊन किडनीच्या विकारांना देता आमंत्रण, वाट्टेल तेव्हा मनाने वेदनशामक गोळ्या घेत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 4:35 PM

मेडिकलमध्ये सहज मिळतात म्हणून डोकेदुखी, पाठदुखीसह अन्य वेदनाशामक गोळ्या घेणं टाळा कारण..

ठळक मुद्दे मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा.

डॉ. देवदत्त चाफेकर (किडनीविकार तज्ज्ञ)

बहुतांश औषधांच्या  दुकानात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गोळ्या या वेदनाशामक असतात. एकूण औषधांच्या तुलनेत वेदनाशामक गोळ्यांच्या विक्रीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळत असल्या तरी त्या वापरताना सावधानता लोक बाळगता येत नाही. सतत वेदनाशामक गोळ्या घेतल्याने त्याचा सर्वाधिक परिणाम शरीरातील इतर अवयवांपेक्षा मूत्रपिंडावर होतो. त्यामुळे किडनीच्या विकारांमध्ये तसेच किडनीच निकामी होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे.

वेदनाशामक गोळी आजार बरा करत नाही. शरीरातील एखादा अवयव दुखू लागला की तेथून मेंदूला रसायनांच्या माध्यमातून संदेश पाठवले जातात. पॅरासिटेमल असलेल्या गोळ्या मेंदूकडे येणारे व तेथून जाणारे वेदनेचे संदेश अडवण्याचे काम करतात आणि त्यामुळे वेदना होत असल्याचे लक्षात येत नाही. वेदनाशामक गोळ्यांमुळे फायदा होतो; पण काही वेळा गंभीर परिस्थितीही निर्माण होते. या गोळ्या थेट घेता येत असल्या तरी त्यांची गुणशक्ती वेगवेगळी असते. काही रुग्णांना एखाद्या गोळीनेही त्रास होतो. कोणत्याही औषधीच्या दुकानात व केव्हाही या गोळ्या मिळत असल्याने अनेक नागरिक थोडी जरी वेदना झाली की त्याचे सेवन करतात. वेदना होत नसताना अधिक काळ या गोळ्या घेतल्यास पोट बिघडणे, रक्तस्त्राव व हृदयाच्या कार्यक्षमतेसह मूत्रपिंडावर प्रभाव पडण्याचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय करायचे?

१. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळा. २. वेदनाशामक गोळी घेण्यापूर्वी वेदना नेमकी का होत आहे, आणि ते कारण कमी करता येईल का, याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळेच प्रत्येकाने कोणत्याही वेदनांवर गोळ्या घेताना वैद्यकीय सल्ला घेऊनच गोळ्या घेणे आवश्यक ठरते. ३. दुखणे हे नैसर्गिक असून ते लक्षण आहे. वेदनाशामक गोळी घेण्याचे कारणे डोकेदुखी, दातदुखी, अंगदुखी असू शकते. डोके दुखत असेल तर त्यामागे अपुरी झोप, सर्दी, ताण, उपवास अशी कारणे असू शकतात. ४. गोळी तत्काळ दिलासा देत असली तरी मूळ कारणावर उपाय केला तर पुन्हा पुन्हा गोळ्यांकडे वळावे लागणार नाही. वेदनाशामक गोळी हा केवळ तात्पुरता उपाय आहे. ५. सतत गोळ्या घेतल्याने त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि मेंदूवरही होतो. खूप वेदना होत असल्यास डॉक्टरांकडे जाण्याच्या वेळेपुरता आराम पडावा यासाठीच त्याचा उपयोग करणे आवश्यक ठरते.

किडनीचे कार्य काय?

शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. ज्याप्रकारे एखादी गाळणी पाण्यातील कचरा, अशुद्धी गाळून शुद्ध पाणी देते त्याचप्रकारे मूत्रपिंड शरीरातील टाकाऊ पदार्थ बाजूला करते. मूत्रपिंड दररोज जवळपास १८० लिटर इतके रक्त शुद्ध करते. त्यातून दोन लिटर मूत्र दररोज तयार होते. परंतु, योग्य काळजी घेतली नाही तर मूत्रपिंडाचे विकार जडतात आणि जीवन त्रासदायक होऊन बसते.

किडनीविकाराची लक्षणे लघवी अडकणे, लघवी बंद होणे, वारंवार लघवी होणे, लघवीतून पू येणे, पोटात सतत दुखणे, चेहरा सुजणे ही किडनीविकाराची काही लक्षणे आहेत. लघवीचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. डायबिटीस, उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंड विकार टाळण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा. भरपूर पाणी प्यावे. तसेच स्वतःहून कुठलीही औषधे घेणे टाळावे. आहारातील मिठाचे प्रमाण कमी, फास्ट फूड टाळा. रक्तदाब-डायबिटीस असल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक असते.  

टॅग्स : आरोग्य