Join us
Daily Top 2 Weekly Top 5

बिग बॉसफेम स्नेहा वाघला झालेला हेमेटोमा हा आजार नेमका काय आहे? तो कशाने होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 15:12 IST

अभिनेत्री स्नेहा वाघ म्हणते, मला फेशिअल हेमेटोमाचा त्रास आहे. तो लवरकरच बरा होईल. तिची ही इन्स्टाग्रामवरील स्टोरी वाचून फेशिअल हेमेटोमा म्हणजे नक्की काय? हा काही सौंदर्यविषयक आजार आहे की इतर काही गंभीर आजार? असे प्रश्न निर्माण झालेत. काय आहेत त्याची उत्तरं?

ठळक मुद्दे आपल्या शरीरावर अचानक दिसणार्‍या डागांकडे दुर्लक्ष करु नये.छोटे वाटणारे डागच पुढे गंभीर रुप घेतात आणि हेमेटोमाचा त्रास होतो. गंभीर स्वरुपाच्या त्रासात शस्रक्रिया करावी लागते.

मराठी आणि हिंदी मालिकांमधील अभिनेत्री स्नेहा वाघ बिग बॉस 3मुळे बरीच चर्चेत होती. बिगबॉसमधील तिचे वाद, तिने दोन अपयशी लग्न, तिच्या दोन्ही नवर्‍यांबाबतच्या तक्रारी यामुळे स्नेहा वाघ कायम चर्चेत असते. सध्या तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात ती म्हणते मला फेशिअल हेमेटोमाचा त्रास आहे. तो लवरकरच बरा होईल. तिची ही इन्स्टाग्रामवरील स्टोरी वाचून फेशिअल हेमेटोमा म्हणजे नक्की काय? हा काही सौंदर्यविषयक आजार आहे की इतर काही गंभीर आजार? असे प्रश्न निर्माण झालेत. काय आहेत त्याची उत्तरं?

Image: Google

काय असतो हेमेटोमा?

आपल्या शरीरावर अचानक आपल्या काही डाग दिसतात. ते छोटे असतील तर त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण जर ते मोठे असतील तर ते का बरं आले असा प्रश्न पडतो. अर्थात वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात हे डाग म्हणजे त्या भागाला झालेल्या दुखापतीचे परिणाम असतात. पण कधी कधी काय दुखापत झाली हे आठवत नाही, तर कधी कधी दुखापत आठवून ह्या त्या दुखापतीच परिणाम असेल म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण तज्ज्ञ म्हणतात, की दुखापतीमुळे होणार्‍या शरीरावरील डागांकडे दुर्लक्ष केल्यास समस्येचं स्वरुप गंभीर होवू शकतं. साधे वाटणारे दुखापतींचे डाग नंतर गंभीर स्वरुप धारण करतात,. हे डाग दुर्लक्षित झाल्यास हेमेटोमासारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

हेमेटोमा म्हणजे मोठ्या रक्तवाहिनीच्या बाहेरच्या भागात रक्त साकळतं. यालाच हेमेटोमा म्हणतात. ही समस्या दुखापत झाल्यास , मार लागल्यास निर्माण होते. अपघातातील दुखापतीमुळे किंवा मारामुळे शरीरातील दुखापत झालेल्या भागातील रक्तवाहिन्यांच्या भिंतींला धक्का बसतो. यामुळे आजूबाजूंच्या उतींमधे रक्त पसरतं.

Image: Google

हेमेटोमाची लक्षणं काय ?

हेमेटोमामुळे तेथील त्वचेचा रंग बदलतो. सूज येते. आजूबाजूल लालसरपणा येतो. हेमेटोमामुळे आजूबाजूची त्वचा गरम होते किंवा तिथे वेदना व्हायला लागतात. अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्या चेहर्‍याला झालेला हेमेटोमा ( फेशिअल हेमेटोमा) हा दुखापतीमुळे किंवा मार लागल्यामुळे झालेला आहे असं तज्ज्ञ म्हणतात. त्वचेखाली रक्तसाकळल्यामुळे होणारा हेमेटोमा ( गाठ/ डाग) बरा होण्यासाठी छोटीशी श्स्त्रक्रिया करुन तिचा निचरा करावा लागतो. तज्ज्ञ म्हणतात शरीराच्या कोणत्याही भागावर डाग पडल्यास किंवा वर सांगितलेली हेमेटोमाची लक्षणं आढळ्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये. यामुळे छोटीसी गाठ किंवा डागाचं रुपांतर मोठ्या आजारात होवू शकतं.

वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की डोक्यात/ मेंदूत हेमाटोमा होणं हे घातक मानलं जातं. या घातक परिस्थितीत मग खूप डोकं दुखणं, हात आणि पाय हलवण्यास खूप कठीण वाटतं. बहिरेपणा येऊ शकतो. जेवताना अन्न गिळलं जात नाही तर कधी काही रुग्ण बेशुध्द  होतो.

Image: Google

डॉक्टर म्हणतात, हेमेटोमा हा अगदीच सामान्य आजार आहे. कुठे दुखापत झाल्यास हेमेटोमा विकसित होवू शकतो. हेमेटोमा होण्यासाठी दुखापत मोठीच असली पाहिजे असं नाही. तर अगदीच साधारण वाटणार्‍या दुखापतीमुळे ही हेमेटोमा होवू शकतो. तसेच अनेकजण रक्त पातळ होण्याची औषधंही घेत असतात. पण डॉक्टर म्हणतात की, रुग्ण शरीराचा कोणताही भाग दुखत असल्यास अँस्पिरिनसाखी वेदनाशामक गोळी घेतात. या गोळ्यांनी रक्त आणखी पातळ होवून हेमेटोमा गंभीर होण्याचा संभव असतो.

हेमेटोमा जर गंभीर असेल तर शस्त्रक्रिया करुन ते ड्रेनेज करण्याची गरज पडते. त्वचेखाली साकळलेलं रक्त पाठीचा कणा, मेंदू या अन्य भागांवरही दबाव टाकतं. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया करावी लगते. शस्त्रक्रिया केल्याने संक्रमण टळतं. हेमेटोमा ही सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष झाल्यास मात्र ती गंभीर होते.  म्हणून शरीरावर कुठेही अचानक दिसलेला डाग असो किंवा दुखापतीचा परिणाम म्हणून पडलेला डाग असेल त्याची वेळीच दखल घेऊन डॉक्टरांना  ते दाखवायला हवं.