Join us   

मूल होत नाही, गर्भधारणेत अडचणी येतात? -‘फर्टाइल विंडो’चं गणित समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 9:19 PM

बीजधारणा चक्र असतं, त्याची शास्त्रीय माहिती समजून घ्यायला हवी.

ठळक मुद्दे शरीरातील हार्मोन्सनी ओव्हयुलेशनच्या काळात खरोखरच उच्छाद मांडलेला असतो. या सगळ्याचा ट्रॅक ठेवून प्रेगन्सी नियोजन खरोखर शक्य आहे.

प्रेग्नन्सीबाबतीत काळजीत आहात? प्रयत्न करूनही गरोदर होत नाही आहात? - तर मग आधी तुम्ही मासिक पाळी नि बीजधारणेचं चक्र समजून घ्यायला हवं. आपली ‘फर्टाइल विंडो’ कशी आहे हे एकदा समजलं की गरोदरपणाची शक्यता वाढते व या काळाचं यशस्वी नियोजन करता येतं. ओव्हयुलेशन म्हणजे बीज उत्सर्जन. हा मासिक पाळी प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग. त्यावेळी बीजकोश म्हणजे ओव्हरीतून बीजं सुटतात नि फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयापर्यंत पोहोचतात. मासिक पाळीच्या चक्रात नियमितता असेल तर साधारण बारा ते सोळा दिवसांच्या दरम्यान ही क्रिया घडते. (प्रत्येक पाळीनंतर 30+2 दिवस मागेपुढे असणारं हे चक्र) बीज उत्सर्जन झालं की साधारण 24 ते 36 तास बीजं जिवंत असतात. स्त्रीच्या शरीराच्या विशिष्ट भागात शुक्राणू जिवंत राहाण्याचा कालावधी 48 ते 72 तासांचा असतो. या काळात स्त्रीच्या फॅलोपियन ट्यूबमध्ये शुक्राणूंचा प्रवेश होऊन ते जिवंत राहिले तर प्रेग्नंसीची शक्यता वाढते. ज्या स्त्रियांचं मासिक पाळी चक्र काही कारणांनी अनियमित असतं त्यांनी स्वत:च्या ‘फर्टाइल विंडो’वर लक्ष ठेवलं तर नीट ठरवून बाळाचं नियोजन करता येऊ शकतं.

ओव्हयुलेशन सुरू झालं का हे कसं तपासावं?

1. सर्व्हायकल म्युकस

 ओव्हयुलेशनची सुरूवात झाली की चिकट पांढरा स्राव म्हणजेच व्हाईट डिसचार्ज जाणवू लागतो. असं होणं अगदी नॉर्मल आहे. उलट या डिसचार्जमुळं शुक्राणूंचा फॅलोपियन ट्यूबपर्यंतचा प्रवास अधिक सहज व चांगला होतो. मात्र जर या स्रावामुळं चरचरणं, विचित्र वास येणं अशी लक्षणं जाणवली तर समजावं की इन्फेक्शन झालंय नि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

2. शरीराचं तापमान (बेसिल बॉडी टेम्परेचर) ओव्हयुलेशन सुरू झाल्यानंतर प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचं प्रमाण वाढल्यामुळं शरीराच्या मूळ तापमानात वाढ होते. ती झालीय का हे बघायचं तर सकाळी बेडवरून उतरण्यापूर्वी उठल्या उठल्या ताबडतोब तपासावं. अशावेळी वाढणार्‍या तापमानावर काही दिवस लक्ष ठेवलंत तर कळेल की ओव्हयुलेशन सुरू झालेलं आहे.

 

3. ओव्हयुलेशन स्ट्रीप  प्रेग्नंसी स्ट्रीप असते तशीच ही ओव्हयुलेशन स्ट्रीप. ओव्हयुलेशनपूर्वी सुमारे 24 ते 36 तास आधी युरिनमध्ये ल्युटिनायझिंग या हार्मोनचं प्रमाण वाढतं. ही स्ट्रीप आपल्याला ओव्हयुलेशन सुरू झालेलं आहे अथवा नाही हे समजून घेण्यासाठी मदतीची ठरते. स्ट्रीपवरच्या पहिल्या दोन रेघा लाल झाल्या की समजावं, पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये ओव्हयुलेशन सुरू होणार आहे. ही तपासणी दुपारच्यावेळी केली तर अधिक चांगलं!

4. ओव्युलेशन कॅल्क्युलेटर

हाताशी सहजपणे उपलब्ध असणार्‍या स्मार्टफोनचा वापर करून ओव्हयुलेशनचा नेमका काळ तुम्हाला कळू शकतो. या काळात सेक्सच्युअली सक्रिय राहाण्यातून प्रेग्नंसीची शक्यता वाढते. मात्र तुमचं मासिक पाळीचं चक्र मुळातच अनियमित असेल तर स्मार्टफोनमधल्या अ‍ॅपकडून विश्‍वासार्हतेची अपेक्षा कमी असते. तरीही अ‍ॅपच्या आधारे ओव्हयुलेशनचा काळ कळणं, महिन्यातल्या विशिष्ट वेळचे मूड स्विंग्ज समजून घेणं याचा फायदा होतोच. शरीरातील हार्मोन्सनी ओव्हयुलेशनच्या काळात खरोखरच उच्छाद मांडलेला असतो. या सगळ्याचा ट्रॅक ठेवून प्रेगन्सी नियोजन खरोखर शक्य आहे.

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसी