वैद्य विनीता बेंडाळे
आमच्या वेळेला एवढ्या अडचणी नाही बुवा यायच्या मूल होण्यासाठी. - अशा स्वरूपाची विधानं ‘मिलेनियल्स’च्या आधीच्या पिढ्यांकडून ऐकू येत असतात. खरंही आहे हे. वाढत्या अनपत्यतेची जी अनेकविध कारणे आहेत, त्यापैकी बदलती जीवनशैली हे अत्यंत महत्वाचे कारण आहे. निरनिराळ्या पद्धतींनी याचा विचार करणं आवश्यक ठरतं. एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्वीच्या मानाने लग्न ही उशीरा होतात. बहुतांशी वेळा शिक्षण पूर्ण होणे हे त्या मागचे कारण असते आणि निश्चितच महत्वाचेही असते. पण एवढ्यावर ही गोष्ट थांबत नाही. लग्नानंतर दोघांनी ‘करिअर’ मधे स्थिरावणे, आर्थिक स्तरावर अधिकाधिक सबळ होणे या दृष्टीकोनाला प्राधान्य दिले जाते आणि परिणामी मूल होण्याचा विचारच मुळी लांबणीवर टाकला जातो. ‘दोघांचे तीन’ होणे या पूर्वी ज्या विचारांना प्राधान्य दिले जाते, ते महत्वाचे आहेतच. परंतू असे करत असताना मूल होणे या स्वाभाविक प्रक्रियेला एक प्रकारे जे गृहीत धरलं जातं, तिथे कुठेतरी गणित चुकतं. ते मुख्यत: अशा दृष्टीने, की गर्भधारणा ही स्वाभाविकपणे होणे अपेक्षित असताना त्याच्याशी निगडीत जी जीवनशैली स्वाभाविकरित्या संतुलित, बॅलन्स्ड असणं अपेक्षित असतं, तिथे मात्र बहुतांशी वेळा ताळतंत्र चुकलेलं असतं.
पाश्चात्त्य देशांकडून विविध स्तरांवर शिकण्यासारखं आहे. परंतु काही वेळा त्यातील काही गोष्टींचं अंधानुकरण केलं गेल्यास, विशेषतः आरोग्याच्या बाबतीत ते महागात पडू शकतं. जीवनशैलीमधील असा अंधनुकरणाचा एक विषय म्हणजे आहार. Italian, Chinese, Continental, Oriental, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावांतच खरं तर हा मुद्दा स्पष्ट होतो. त्या त्या देशातील लोकांना पिढ्यानुपिढ्या त्या विशिष्ट पद्धतीचा आहार हा 'सात्म्य' झालेला असतो. म्हणजे त्यांच्यामधे तो पचवण्याची आणि शरीरातील पेशींमध्ये संमिलीत (assimilate) करण्याची स्वाभाविक योजना असते आणि त्या त्या प्रांतातील लोकांना त्या त्या प्रकारच्या आहाराची आवश्यकताही असते. चवीत बदल म्हणून कधीतरी अशा विविध प्रकारचा आहार घेणे ही गोष्ट वेगळी आणि वेळे अभावी, कंटाळा आला म्हणून, चैन म्हणून, सात्यत्याने आपल्याला सात्म्य नसलेला आहार घेणे यात फार फरक आहे आणि सध्या हेच विशेषत्वाने होताना दिसते. उशिरा अपत्यप्राप्तीच्या दृष्टीने विचार अथवा प्रयत्न करणे हा पाश्चात्यांच्या विचारसरणीच्या अनुकरणातीलही एक विचार असू शकतो. परंतु वस्तुस्थिती मात्र अशी आहे की उशिरा मूल होण्याची संभावना ही पाश्चात्य देशांमध्ये जितकी आहे, त्या तुलनेत आपल्याकडे कमी आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मग शिक्षण, आर्थिक स्थेर्य या गोष्टींना दुय्यम महत्व द्यायचं का असं कुणी विचारेल. तर निश्चितच नाही. परंतु कुठेतरी साऱ्याचा समतोल साधणं आवश्यकच आहे. त्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जीवनशैलीमधे संतुलन राखणं. ही बाब फार उपयुक्त ठरू शकतं आणि खर तर वाटतं तितकं ते अवघड नक्कीच नाही. या बरोबर अपत्यप्राप्तीचा विचार काही काळाने करण्याचे निश्चित असेल, तर त्या दृष्टीने वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास काही प्राथमिक तपासण्या करून घेण्याचा विचारही केला जाऊ शकतो. गर्भधारणेचा प्रयत्न सुरू करण्यापूर्वी अशा तपासण्यांमधे काही दोष आढळल्यास त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या वेळेचा सदुपयोग तर होऊ शकतोच, शिवाय महत्वाचे म्हणजे लगेच गर्भधारणेचा विचार नसल्यामुळे या दरम्यानचा मानसिक ताण टाळता येऊ शकतो, ज्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. अशा प्रकारे आवश्यक असल्यास काही सुधारणा वैद्यकीय मदतीने करून घेऊन योग्य जीवनशैलीची साथ राखल्यास गर्भधारणेची वेळ येईपर्यंत ती सुधारित स्थिती कायम राखण्यासाठी मदत होऊ शकते. गर्भधारणा होणे याच बरोबर एक 'बोनस' या संतुलित जीवनशैलीमुळे मिळू शकतो, की जी ‘ ऑफर’ खरंच कोणी हातची जाऊ देऊ नये, ती म्हणजे 'Improved Quality Of Life !'
(लेखिका आयुर्वेद आणि वंध्यत्व उपचार तज्ज्ञ आहेत. ‘द्युम्ना वुमेन्स क्लिनिक’, रसायू क्लिनिक, पुणे) ०२० २५४६५८८६, www.dyumnawomensclinic.com