>आरोग्य > प्रसूतीप्रश्न > पाळी अनियमित होण्याची कारणं काय?

पाळी अनियमित होण्याची कारणं काय?

मासिक पाळीत होणारा रक्तस्त्राव पाच दिवसांचा असतो आणि दर महिन्याला पाळी येते. पण काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येत नाही आणि मासिक पाळीत जाणारे रक्तही अनियमित असते. असं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 06:30 PM2021-03-08T18:30:01+5:302021-03-08T18:44:32+5:30

मासिक पाळीत होणारा रक्तस्त्राव पाच दिवसांचा असतो आणि दर महिन्याला पाळी येते. पण काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येत नाही आणि मासिक पाळीत जाणारे रक्तही अनियमित असते. असं का?

What causes menstrual irregularities? | पाळी अनियमित होण्याची कारणं काय?

पाळी अनियमित होण्याची कारणं काय?

Next
Highlightsवयात आल्यानंतर पहिले काही वर्ष अनियमित पाळी असू शकते. अती ताण, अती व्यायाम आणि अती डाएट्स यामुळेही मासिक पाळी अनियमित होते.कधीतरी  पाळी अनियमित झाली, लवकर किंवा उशिरा आली तर काळजी करण्यासारखं काहीही नाहीये, पण जर पाळी सातत्याने अनियमित असेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.

नियमित मासिक पाळी २८ दिवसांची असते. यात सात दिवस पुढे मागे धरायचे. सामान्य मासिक पाळीमध्ये अंडनलिकेतून अंडं बाहेर सोडले जाते. या काळात जर अंडं  आणि स्पर्म यांचे मिलन झाले नाही तर तसे सिग्नल्स हार्मोन्सना दिले जातात आणि रक्त आणि टिश्यूजचा गर्भाशयात असलेला स्तर सुटून येतो. मासिक पाळीत होणारा रक्तस्त्राव पाच दिवसांचा असतो आणि दर महिन्याला पाळी येते. पण काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी नियमित येत नाही आणि मासिक पाळीत जाणारे रक्तही अनियमित असते.

मासिक पाळी अनियमित आहे असं केव्हा म्हटलं जातं?
१) मासिक पाळी २१ दिवसांच्या आधी आल्यास..
२) ८ दिवसांपेक्षा जास्त काळ रक्तस्त्राव सुरु राहिल्यास..
३) ९० दिवस किंवा ३ महिने पाळी न आल्यास..
४) अति रक्तस्त्राव आणि वेदना होत असल्यास..
५) दोन मासिक पाळींच्यामध्ये स्पॉटिंग म्हणजे थोडे थोडे रक्त गेल्यास..
६) मासिक पाळी उशिरा येत असल्यास.. दोन पाळींमध्ये ३५ दिवसांपेक्षा जास्त काळ जात असल्यास..

अनियमित पाळीची कारणे?
१) वयात आल्यानंतर पहिले काही वर्ष अनियमित पाळी असू शकते. या वयात हार्मोन्समध्ये बदल होत असतात त्यामुळे पाळी अनियमित असते.
२) मेनोपॉज किंवा पाळी जाण्याच्या काळातही पाळी अनियमित होते. हे वय साधारणपणे ४५ ते ५५ असतं. या वयात काहीवेळा पाळी येतच नाही किंवा रक्तस्त्राव अती  किंवा अगदी तुरळक होत जातो.
३) काही गर्भरोधकांमुळेही पाळी कमी अधिक होणे, रक्तस्त्राव कमी अधिक होऊ शकतात.
४) अती व्यायाम, डाएट, खूप वजन वाढणे किंवा कमी होणे या सगळ्याचाही पाळीवर परिणाम होतो. काहीवेळा पाळी पूर्णपणे थांबण्यासारखेही प्रकार होतात.
५) पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमसारख्या आजारात पाळी अनियमित होते.
६) अती  ताणामुळे हार्मोनल असंतुलन होतं आणि त्यामुळे मासिक पाळी अनियमित होते.
७) थायरॉईड सारख्या आजारात पाळी अनियमित होऊ शकते.
८) अनोरेक्सिया आणि बुलिमिया सारख्या खाण्याशी संबंधित आजारातही पाळी अनियमित होते.

निदान आणि उपचार

१) पाळी न येणं किंवा अनियमित येणं हे पहिलं आणि महत्वाचं लक्षण आहे. हे लक्षण जाणवल्याबरोबर डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
२) शक्यतो स्त्रीरोग तज्ज्ञांकडेच जा. कारण तिथेच योग्य निदान होऊन उपचार मिळू शकतात.
३) डॉक्टर्स या काही गोष्टी तपासून बघतात. रुग्णाला  पीसीओएस किंवा सीपीओडी नाहीये ना, थायरॉईड नाहीये ना, आणि जी स्त्री चान्स घेते आहे तिच्या काही महत्वाच्या चाचण्या केल्या जातात.
४) सर्व चाचण्या आणि तपासणीचे जे काही निष्कर्ष निघतील त्यानुसार तोंडावाटे घ्यायच्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा इतर औषोधोपचार सांगितले जातात.
५) अती ताणामुळे मासिक पाळी अनियमित होते. जर डॉक्टरांना रुग्ण ताणात आहे असं वाटलं तर त्यासाठी योग, प्राणायाम, ध्यान यासारख्या उपचार पद्धतीही सांगितल्या जातात.
६) अती व्यायाम आणि अती डाएट्स यामुळेही मासिक पाळी अनियमित होते. त्यामुळे या दोन्ही गोष्टी योग्य प्रमाणात केल्या पाहिजेत.
कधीतरी  पाळी अनियमित झाली, लवकर किंवा उशिरा आली तर काळजी करण्यासारखं काहीही नाहीये, पण जर पाळी सातत्याने अनियमित असेल तर मात्र लगेच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. म्हणजे वेळीच निदान होऊन लगेच उपचार मिळू शकतात. कारण सुदृढ आरोग्यासाठी मासिक पाळी नियमित होणं अतिशय आवश्यक असतं.

विशेष मार्गदर्शन: डॉ. सुलभा अरोरा

(MD DNB )

Web Title: What causes menstrual irregularities?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.