lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Gynaecology Disorder > ब्रेस्टफीडिंगकाळात छातीत दुधाच्या गाठी झाल्यानं त्रस्त आहात? फिजिओथेरपीच्या मदतीने करा जलद उपचार

ब्रेस्टफीडिंगकाळात छातीत दुधाच्या गाठी झाल्यानं त्रस्त आहात? फिजिओथेरपीच्या मदतीने करा जलद उपचार

बाळ झाल्यानंतर अनेक आयांना पहिला प्रश्न असतो तो ब्रेस्टफीडिंगमध्ये येणाऱ्या समस्यांचा. अनेकींना ते जमत नाही, बाळ रडल्यावर त्या जास्तच घाबरतात. आणि दुसरीकडे स्तनांच्या काही समस्याही याच काळात उद्भवतात. तो त्रास कशाने होतो, उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 04:23 PM2021-08-31T16:23:04+5:302021-08-31T16:41:33+5:30

बाळ झाल्यानंतर अनेक आयांना पहिला प्रश्न असतो तो ब्रेस्टफीडिंगमध्ये येणाऱ्या समस्यांचा. अनेकींना ते जमत नाही, बाळ रडल्यावर त्या जास्तच घाबरतात. आणि दुसरीकडे स्तनांच्या काही समस्याही याच काळात उद्भवतात. तो त्रास कशाने होतो, उपाय काय?

Suffering from breast engorgement, blocked duct during breastfeeding? Get treatment faster with the help of physiotherapy | ब्रेस्टफीडिंगकाळात छातीत दुधाच्या गाठी झाल्यानं त्रस्त आहात? फिजिओथेरपीच्या मदतीने करा जलद उपचार

ब्रेस्टफीडिंगकाळात छातीत दुधाच्या गाठी झाल्यानं त्रस्त आहात? फिजिओथेरपीच्या मदतीने करा जलद उपचार

डॉ. देविका गद्रे

बाळ झाल्यानंतर अनेक आयांना पहिला प्रश्न असतो तो ब्रेस्टफीडिंगमध्ये येणाऱ्या समस्यांचा. अनेकींना ते जमत नाही, बाळ रडल्यावर त्या जास्तच घाबरतात. आणि दुसरीकडे स्तनांच्या काही समस्याही याच काळात उद्भवतात. तो त्रास कशाने होतो, त्यावर उपाय काय हे आपण आज पाहू..
ब्रेस्टफीडिंग काळात स्तनांसंबंधित कोणत्या समस्या उद्भवू शकतात?

ब्रेस्ट एन्गोर्जमेंट

स्तनपान करताना बाळाला योग्य पद्धतीने स्तनाग्रे चोखता न आल्याने हा त्रास उद्भवतो. स्तनांमधील दुधाचे प्रमाण वाढून ते पूर्णपणे भरून जातात. स्तनाग्रांना दुखणे, बाळाच्या हिरड्यांमुळे तिथे जखम होणे असे प्रकारही होऊ शकतात. म्हणूनच बाळाला एखाद्या टेबलवर ठेवून त्यावर पुढे झुकून स्तनपान करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गुरुत्वाकर्षणाची मदत होऊन स्तनपान करणे सोपे जाते व जास्तीत जास्त दूध बाळाला मिळू शकते. स्तनांना आलेली सूज, दुखणे कमी करण्यासाठी तुम्हाला फिजिओथेरपिस्ट मदत करू शकतात. अल्ट्रासाउंड नावाच्या मशीनचा वापर करून स्तनांची सूज कमी करता येते. तसेच लिंफॅटिक मसाज सारख्या पद्धती वापरूनही सूज कमी होते. बर्फाचा शेक घेतल्याने दुखणाऱ्या स्तनाग्रांना अराम मिळतो.


ब्लॉक डक्ट

म्हणजेच स्तनांच्या ज्या भागात दूध असते व ज्या नलिकांमधून ते बाळापर्यंत पोहचते त्या ठिकाणी आलेला अडथळा. दूध पुढेपर्यंत न पोचल्याने ते मागच्या भागात साचले जाते व त्यामुळे स्तनांना जडपणा येणे, दुखणे इत्यादी समस्या येतात. कधी कधी स्तनाला हात लावल्यास हातास गोळा लागू शकतो. यासाठी सुद्धा फिजिओथेरपिस्ट हळुवार पद्धतींचा वापर करून ह्या भागाला मोकळे करण्यास मदत करू शकतात. या व अशा पद्धतीच्या अनेक समस्यांवर तोडगा निघू शकतो. अनेक महिला या समस्यांना सामोरे जात असतात. त्यामुळे यात लाजण्यासारखे काही नसून योग्य वेळेत तज्ज्ञांचा सल्ला महत्वाचा ठरतो.
अनेक वेगवेगळ्या स्थितींमध्ये बाळाला स्तनपान करता येऊ शकते. क्रेडल पोजिशन म्हणजेच बाळाचं डोकं एका हाताच्या कोपराजवळ ठेवून दुसऱ्या हाताने बाळाच्या पाठ व कंबरेला आधार देणे. ही सर्वात जास्त सोयीस्कर व जास्त वापरात असलेली पोजिशन आहे. तसेच क्रॉस क्रेडल सारखी पोसिशन सुद्धा आईला व बाळाला आरामदायी ठरू शकते. काही वेळा आई पाठीवर झोपून बाळाला आपल्या वर ठेवूनसुद्धा स्तनपान करू शकते. हल्ली या सर्व गोष्टींसाठी लॅकटेशन तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येतो.

हे सारे त्रास, उपाय काय?

स्त्री गर्भवती असतानाच स्तनांसाठी काही उपाययोजना शिकवल्या जातात. त्यामध्ये टिशू रिलीज टेक्निक, लिंफॅटिक ड्रेनेज यासारख्या पद्धतींचा समावेश होतो. 
१. स्तनाच्या व छातीच्या भागामध्ये असलेल्या स्नायूंना मोकळे करता येणे शक्य असते. ह्यामुळे बाळाला दूध मुबलक प्रमाणात मिळते व आईची तब्येत चांगली राहते. स्त्री गर्भवती राहण्याआधीपासून ते अगदी बाळ झाल्यावरही शरीराला योग्य व्यायाम देणे अत्यावश्यक असते. 
२. गर्भधारणेच्या आधी संपूर्ण शरीराचे व्यायाम व मुखत्वे पाठीचे व्यायाम महत्वाचे असतात. पोट वाढल्यामुळे साहजिकच पाठीवरचा ताण वाढतो. यासाठी आधीच पाठीच्या स्नायूंना ताकदवान बनवणे महत्वाचे ठरते. 
३. तसेच मूल झाल्यावर स्तनपान करताना चुकीच्या पद्धतीने बसल्याने मान, पाठीचा वरचा भाग, खांदे इत्यादी अवयवांना त्रास होऊ शकतो. यासाठी ताकदीचे व्यायाम व योग्य प्रमाणात स्ट्रेचिंग गरजेचे असते. तसेच विविध प्रकारचे श्वासाचे व्यायामही महत्वाचे ठरतात.
४. स्तनपान करताना योग्य पद्धतीने बसा. पाठीसाठी व कंबरेसाठी उशीला पूर्णपणे टेकून बसा. पोक येऊन देऊ नका. मांडीत उशी घेऊन त्यावर बाळाला ठेवल्यास तुम्हाला खाली वाकावे लागणार नाही. आपोआपच तुमच्या आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. ह्या सर्व गोष्टींसाठी फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे असते.
५. मूल झाल्यावर स्त्रीला अनेक नवीन गोष्टींना सामोरे जावे लागते. शरीरात घडणारे नवीन बदल, अचानक वाढलेली जबाबदारी, नवीन अपेक्षांचं ओझं, बदललेल्या झोपेच्या वेळा या व अशा अनेक गोष्टींना हळू हळू स्त्री सरावत असते. उत्तम नवी पिढी घडवण्यासाठी आवश्यक असलेली सर्व जीवनसत्वे ही आईच्या दुधात असतात. अशा वेळी स्तनपानासंबंधी योग्य माहिती व सल्ला मिळाल्यास अनेक तक्रारी कमी होण्यास मदत होते. 
६.यासंपूर्ण काळात अनेक तज्ञांची आपल्याला मदत घ्यावी लागते. जसे की स्त्रीरोगतज्ज्ञ, लहान मुलांचे तज्ज्ञ, एंडोक्रिनॉलॉजिस्ट, ब्रेस्ट सर्जन, मानसिक स्वास्थ्यासाठी मानसतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट इत्यादी. ह्या सर्वांच्या मदतीने स्त्रीसाठी हा काळ आनंदाचा व सुखाचा ठरू शकतो. नवीन गोष्टींशी जुळवून घेताना आपल्या परिवाराचा पाठिंबा आणि आपली चांगली मानसिकता यांची नितांत गरज असते. जर आई आनंदी आणि आरोग्यपूर्ण असेल तरच बाळ सशक्त व सुदृढ होईल.

(लेखिका फिजिओथेरपिस्ट आहेत. फिजिओमंत्र, विलेपार्ले, मुंबई)
devikagadre99@gmail.com
https://www.facebook.com/PhysioMantra-108691731387758/

Web Title: Suffering from breast engorgement, blocked duct during breastfeeding? Get treatment faster with the help of physiotherapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला