Join us
Daily Top 2 Weekly Top 5

एंडोमेट्रियल कॅन्सर नावाचा गर्भाशयाचाच एक कॅन्सर प्रकार, लवकर निदान आणि लवकर उपचार हे सूत्र विसरु नका.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 12:43 IST

एंडोमेट्रियल कॅन्सरची लक्षणं दिसायला लागण्यापूर्वीही या कॅन्सरचं शरीरातलं अस्तित्व ओळखता येऊ शकतं. त्यासाठी काही तपासण्या निर्धारित करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे  स्त्रीला नेहमीपेक्षा वेगळ्या तर्‍हेने जास्तीचा रक्तस्राव होत असेल तर तातडीनं पावलं उचलायाला हवीत.कधीकधी कॅन्सर बळावल्याशिवाय लक्षणं दिसत नाहीत हे ही खरं.  रजोनिवृती व त्यानंतरच्या काळात वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि तब्येतीवर लक्ष ठेवावं!

एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाशयाला असलेले श्‍लेष्मल, आतला मऊ बुळबुळीतसा भाग. तिथल्या पेशींची वाढ लक्षणीयरित्या वाढायला लागते व त्यातून युटेराईन किंवा एंडोमेट्रियल होण्याची शक्यता तयार होते. कधीकधी असंही होतं की शरीराच्या अन्य भागात पेशींची अनियंत्रित वाढ होते आणि  ती गर्भाशयाच्या भागात पसरते आणि परिणामी गर्भाशयाचा कॅन्सर होतो. गर्भाशयाचे दोन भाग असतात, एक वरचा, त्याला कॉर्पस असं म्हणतात आणि खालच्या भागाला योनीभाग म्हणतात. या भागाला मेडिकली सर्व्हिक्स म्हणजे पोटाचा तळाचा भाग म्हणूनही संबोधलं जातं. गर्भाशयाच्या आतल्या लाइनिंगमध्ये शक्यतो कॉर्पसच्या भागात कॅन्सरची सुरूवात होते. तज्ज्ञांनी या कॅन्सरविषयी बराच अभ्यास केला आहे. या कॅन्सरचं नाव जरी एक असलं तरी प्रत्यक्षात वेगवेगळ्या तर्‍हेच्या पेशींच्या वाढीतून व स्ट्रक्चरमधून कॅन्सर बदलत जातो असं संशोधनातून लक्षात आलं आहे. अ‍ॅडेनोकार्सिनोमा, क्लीअर सेल, सिरस सेल व विशेष दुर्मिळ असा स्क्वामस सेल कॉर्सिनोमा असे या कॅन्सरचे बदलत जाणारे रूप. 

एकदा कॅन्सर ओळखला की त्याच्या प्रवासाचे चार टप्पे असतात. पहिला अर्थातच सुरूवातीचा तर चौथा आणि शेवटचा हा त्रासदायक रूप घेऊन येणारा. त्यामुळंच शरीरातील बदल ओळखून वेळेत कॅन्सरचे निदान होऊ शकणं व योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यातून खरोखरच स्त्रीचा जीव वाचतो.  एंडोमेट्रियल कॅन्सरची लक्षणं दिसायला लागण्यापूर्वीही या कॅन्सरचं शरीरातलं अस्तित्व ओळखता येऊ शकतं. त्यासाठी काही तपासण्या निर्धारित करण्यात आल्या आहेत. त्या अशा :

1. ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड : ध्वनीची ऊर्जा वापरून पोटाच्या आतल्या भागातील अवयवांची बारकाईनं तपासणी करता यावी यासाठी अल्ट्रासाऊंडचे तंत्र वापरले जातं. या तर्‍हेच्या अल्ट्रासाऊंडमध्ये ट्रान्सड्युसर नावाचं  साधन योनीमार्गातू आत घालून शरीराच्या ओटीपोटातील भागांची इमेज घेतली जाते. आतल्या भागातील श्‍लेष्मलाचा थर जाडसर व घट्ट झाला आहे का, गाठी आहेत का आणि असल्या तर त्या कॅन्सरशी संबंधित आहेत का याची माहिती डॉक्टर्सना मिळते. या प्रक्रियेत जरूरीनुसार डॉक्टर मुत्राशय रिकामं ठेवायला सांगतात अथवा लघवीनं पूर्णपणे भरायला सांगतात, ज्यातून त्यांना पोटातला भाग जास्त स्पष्टपणे तपासता यावा. 2. एंडोमेट्रिकल सॅम्पलिंग/बायोप्सी : गर्भाशयाच्या तपासणीवेळी त्यातल्या आजाराची लक्षणं दिसतात अशा भागातला पापुद्रा या तपासणीत काढला जातो. यासाठी जेमतेम दहा मिनिटं लागतात, कधीकधी भुलीवाचूनही ही प्रक्रिया करता येते. पायपेल नावाच्या ट्यूबने ती केली जाते. ती झाल्यावर स्त्रीला थोडा रक्तस्राव अथवा स्पॉटिंग होणं हे नॉर्मल आहे. हा कॅन्सर स्त्रीला झाला आहे का हे तपासण्यासाठी हिस्टेरोस्कोपी, डायलेशन, क्युरेटेज अशाही तपासण्या केल्या जातात.

अखेर महत्त्वाचं हे की वेळेत कॅन्सरचं निदान होणं व त्यावरचे उपचार सुरू होणं. स्त्रीला नेहमीपेक्षा वेगळ्या तर्‍हेने जास्तीचा रक्तस्राव होत असेल किंवा डिसचार्ज जात असेल तर जागरूक राहून अगदी सुरूवातीच्या टप्प्यात कॅन्सर आहे अथवा नाही हे तपासून घेता येतं. कधीकधी कॅन्सर बळावल्याशिवाय लक्षणं दिसत नाहीत हे ही खरं, म्हणून तर रजोनिवृती व त्यानंतरच्या काळात वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि तब्येतीवर लक्ष ठेवावं!