कॅन्सर हा प्राणघातक ठरू शकणारा आजार आहे. शरीराच्या कुठल्याही भागात असामान्य पेशींची निर्मिती होऊ लागली की कॅन्सर हातपाय पसरायला लागतो. अशा अपरिचित पेशी नियंत्रित पद्धतीनं शरीराच्या कुठल्याही अवयवात वाढतात, त्यांचा धोका त्यात्यावेळी मुळीच जाणवत नाही. हळूहळू ती वाढ पसरत जाते. स्तनांच्या भागात अशाच तर्हेच्या पेशींची वाढ होऊन घातक गाठ तयार होणं म्हणजेच स्तनाचा कॅन्सर. काखेत असणार्या लिंफ नोड्समध्ये किंवा रक्तवाहिन्यांमधून अन्य ठिकाणी या कॅन्सरचा प्रसार होण्याची शक्यता असते. आज संपूर्ण जगभरात स्त्रियांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणारा हा दुसर्या क्रमांकाचा घटक आहे आणि तरीही अमुका एका गोष्टीमुळेच अशा प्रकारच्या कॅन्सरची शक्यता असते असं ठामपणे म्हणता येत नाही. म्हणूनच योग्य वेळी या कॅन्सरचं निदान होणं महत्त्वाचं. त्यासाठी होणार्या स्क्रीनिंग टेस्ट काय असतात व त्या का महत्त्वाच्या हे यातून लक्षात येईल.
स्तनाचा कॅन्सर असल्याची आपल्या मनात शंका नसताना आणि कुठलीही बाह्य लक्षणं दिसत नसतानाही स्क्रीनिंग टेस्ट होऊ शकतात व त्यातून कॅन्सरच्या अस्तित्वाचं निदान करता येतं. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे कॅन्सरला रोखण्याचा प्रतिबंधात्मक उपाय नव्हे, ती एक तपासणी आहे. या तपासणीतून अगदी सुरूवातीच्या टप्प्यात कॅन्सर ओळखता आला तर खाली वर्णन केलेल्या उपचारपद्धती वापरून रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता वाढते. आणखी एक महत्त्वाचं, वेळेवर निदान झाल्यामुळं स्तनातली गाठ किंवा गोळा शस्त्रक्रियेतून काढून टाकता येणं शक्य होतं. कॅन्सर पसरला तर संपूर्ण स्तन काढावा लागू शकतो त्यापेक्षा वेळेवर निदान होण्यातून स्तन वाचतातच, शिवाय किमोथेरपीचा टप्पाही वाचण्याची शक्यता असते. चाळीशी ओलांडलेल्या सगळ्याच स्त्रियांनी खबरदारीचा उपाय म्हणून ही स्क्रीनिंग टेस्ट नक्की करून घ्यावी. कुणाच्या कुटुंबात स्तनाच्या अथवा ओव्हेरियन कॅन्सरची हिस्ट्री असेल तर चाळीशी ओलांडण्यापूर्वीच डॉक्टर स्क्रीनिंग टेस्ट करवून घेण्याचा सल्ला जरूर देतात.
स्तनाच्या कॅन्सरच्या स्क्रीनिंगसाठी खालील तंत्रे अवलंबली जातात :
1. मॅमोग्राफ : स्तनाच्या कॅन्सरची कुठलीही व किती शक्यता आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टर्स स्तनांचा एक्स रे काढतात. त्यालाच मॅमोग्राफ म्हणतात. 40 ते 45 या वयात असणार्या स्त्रियांनी वर्षातून एकदा ही तपासणी करवून घ्यावी. 55 ते 75 या वयात असणार्या स्त्रियांनी दिड ते दोन वर्षाच्या अंतरानं ही तपासणी करावी. वेळेवर निदान झाल्यामुळे पुढची हानी टाळणं शक्य होतं. 2. थ्रीडी टोमोसिंथेसिस : हा वेगळ्या तर्हेचा डिजिटल मॅमोग्राफ. यातून स्तनातील पेशींची थ्रीडी इमेज मिळते. कुठलीही लक्षणं दिसत नसतील तर डॉक्टर सर्रास तपासणीसाठी हे तंत्र वापरतात. ज्या स्त्रियांचे स्तनांचे टिश्यू अगदी दाट असतात त्यांच्यासाठी ही तपासणी अधिक बिनचूक उपाय असते. स्तनात असणार्या ग्लँड्यूलर टिश्यूंचे उच्च तंत्राच्या सहाय्यानं सुपरइंपोजिशन मिळत असल्याने या तपासणीत अगदी सूक्ष्म बदलही टिपला जातो. वेगळी वाढ पकडली जाते. आजच्या काळात उपलब्ध असणारं हे सगळ्यांत सेन्सिटिव्ह तंत्र आहे. 3. ब्रेस्ट अल्ट्रासाऊंड : उच्च वारंवारितेच्या ध्वनी लहरी वापरून स्तनांची इमेज मिळवण्याचं हे तंत्र मॅमोग्राफीला पूरक तपासणी म्हणून वापरलं जातं.
आता कॅन्सरचं निदान करणं व त्यावर योग्य ते उपचार करणं ही गोष्ट तंत्रज्ञानामुळे खूप सुलभ झाली आहे. अत्यंत घातकी समजल्या जाणार्या या आजाराचं वेळेवर निदान झालं की त्यानंतर उपचाराचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. स्त्रियांमध्ये सर्वसामान्यपणे आढळून येणारा हा आजार असल्यामुळे महत्त्वाचं हेच की योग्य रीत वापरून निदान होऊ शकणं. तसं झालं की आजाराला घाबरण्याचं कारण उरत नाही.
---