Join us   

कंडोम हा विश्वासाचा सखा आहे, मात्र कंडोम वापराविषयी प्रचंड गैरसमज दिसतात; वाचा शास्त्रीय सत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 3:14 PM

चुकीच्या धारणेमुळे पुरुष कंडोम वापरणे नाकारतात. अनेकदा उच्चशिक्षित तरुणींशी चर्चा करतानाही लक्षात येते की मुलींमध्ये कंडोमबाबत फारशी जागरूकता नाहीये.

ठळक मुद्दे विवाहित स्त्रियांनीही नवऱ्याला ठणकावले पाहिजे की समागमाचे सुख कंडोमने कमी होत नसून, उलट वाढते.

डॉ. ऐश्वर्या रेवडकर

कंडोम, हा इतका उपयोगाचा, सहज उपलब्ध असणारा आणि वापरायलाही सोपा असताना, बिचारा गैरसमजांमुळे दुर्लक्षित असा मित्र आहे. लैगिक संबंधांचा निर्भेळपणे आनंद लुटायला हा मदत करतो परंतु “याच्या वापराने समागम सुख कमी होते” अशा चुकीच्या धारणेमुळे पुरुष कंडोम वापरणे नाकारतात. अनेकदा उच्चशिक्षित तरुणींशी चर्चा करतानाही लक्षात येते की मुलींमध्ये कंडोमबाबत फारशी जागरूकता नाहीये. याउलट ग्रामीण भागात तर अनेक ठिकाणी असे काही साधन उपलब्ध असते याचीच माहिती नसते. सतत पांढरे पाणी जाते अशी तक्रार करणाऱ्या मुलींना मी जेव्हा औषधासोबत कंडोम वापरायचाही सल्ला देते, तेव्हा तिकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होते.  तर  या कंडोमचे फायदे कोणते ?

१. उत्तम गर्भ निरोधक साधन २. लैगिक संबंधान्द्वारे पसरणाऱ्या आजारांपासून बचाव (यात पांढरे पाणी जाण्यापासून एच. आय. व्ही. पर्यंत सर्व आजार आले.) ३. विशेषतः अविवाहित जोडप्यांमध्ये किंवा विवाहित परंतु दूर दूर राहणाऱ्या जोडप्यांमध्ये लैंगिक संबंध नियमित नसतात. जशी भेट होईल, वेळ मिळेल त्यानुसार संबंध घडून येतात. अशावेळी मुलींसाठी नियमित रूपाने खाण्यात येणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्या किंवा तांबी हे पर्याय इतके उपयोगाचे नसतात. परंतु म्हणून कोणतीच काळजी घ्यायची नाही हा पर्यायही चुकीचा आहे. अनेक मुली सांगतात की आम्ही इमर्जन्सी पिल घेतो. आय पिल या नावाने बाजारात सहजपणे मिळणारी ही होर्मोन्सची गोळी असते. परंतु ही फक्त क्वचितच कधीतरी घ्यायची गोळी असते. सतत ती घेतल्याने तिची परिणामकारकता नाहीशी होऊन गर्भधारणा होऊ शकते. तसेच ही गोळी यौनिक आजारांपासून वाचवत नाही. नंतर गर्भ राहिल्यानंतर असे जोडपे गर्भपातासाठी येतात, कारण देतात की “आम्ही खूप कमी वेळा संबंध ठेवले, त्यामुळे वाटले नाही की गर्भ राहील.”  परंतु गर्भधारणेची गम्मत अशी असते कि कधीही कोणत्याही वेळी होऊ शकते, त्यामुळे नंतर पस्तावण्यापेक्षा सुरुवातीलाच सतर्क राहणे हे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. ४.  काही मैत्रिणी सांगतात कि त्यांच्या नवऱ्याला कंडोम वापरायला आवडत नाही. त्या गर्भधारणेच्या भीतीने चिंतीत असतात. गर्भनिरोधक गोळ्या या होर्मोन्सच्या असल्याने त्यांचेही काही दुष्परिणाम शरीरावर होतात. तसेच अनेकींना गर्भाशयात तांबी बसवायची नसते. अशावेळी नवऱ्याने कंडोम वापरणे हा सर्वात सोपा पर्याय ठरतो.  ५. काहीजण म्हणतात की संबंधांच्या वेळी, पुरुष जोडीदार स्त्रीच्या योनीमध्ये वीर्य (सिमेन) सोडत नाही, तर समाधानपुर्तीच्या वेळी शिश्न बाहेर काढून, वीर्य बाहेर पडते. त्यामुळे गर्भधारणा होणार नाही अशी जोडप्याची कल्पना असते. परंतु हे चुकीचे आहे. प्रणय सुरु झाल्यावर पुरुषांच्या शिश्नातून जो द्राव पाझरतो त्यातही पुरुषांचे बीज असू शकते ज्यामुळे स्त्रीला गर्भधारणा राहू शकते. त्यामुळे ही पद्धत चुकीची आहे. तसेच शिश्न बाहेर काढायच्या चिंतेने दोघेही प्रणयाचा मोकळेपणाने आनंद लुटू शकत नाहीत. ६. अगदी काही जणांना होणारी अलर्जी सोडली, तर कंडोमचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. 

कंडोम हे २ प्रकारचे असतात.

पुरुषांनी त्यांच्या शीश्नावर लावायचे आणि स्त्रियांनी त्यांच्या योनीमध्ये बसवायचे. परंतु पुरुषांनी लावायचे कंडोम जास्त वापरले जातात कारण ते वापरायला सर्वात सोपे असतात आणि बाजारात सहजपणे उपलब्धही आहेत. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे कंडोम आकर्षक रंग, फ्लेवर्समध्ये मिळतात. आपल्या आवडीच्या फ्लेवरचा कंडोम वापरून आपण आपले लैंगिक संबंध जास्त रोमांचक बनवू शकतो.  तसेच जर जोडपे विवाहित नसेल तेव्हा, किंवा तात्कालिक शारीरिक संबंध असतील (Dating sex, one night stand), तर अशावेळी कंडोम नक्कीच वापरला पाहिजे.  त्यामुळे जोडीदाराकडून लैंगिक आजार होणार नाहीत, याची खबरदारी घेऊ शकू.  विवाहित जोडप्यातही स्त्रीला दुसरे साधन वापरायचे नसेल, तर तिने नवऱ्याला हक्काने कंडोम वापरायला लावायला हवे. कारण बाकी सर्व गर्भनिरोधक साधनांचा कमी जास्त प्रमाणात स्त्रीच्या शरीरावर परिणाम होतो. परंतु कंडोम मात्र त्या सर्व परिणामांपासून मुक्त आहे. समागमानंतर लक्षात आले की कंडोम फाटला होता, (कमी प्रतीचे कंडोम सहजासहजी फाटतात) तर अशावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भनिरोधक गोळी घ्यावी. अशी गोळी (आय पिल) लैंगिक संबंधानंतर ४८-७२ तासांच्या आत घ्यावी लागते, तरच ती परिणामकारक ठरते. कारण काहीही असो, आपल्या बेजाबदार वर्तनाचे परिवर्तन जर गर्भपातात किंवा एच.आय.व्ही सारख्या गंभीर आजारात होत असेल तर नक्कीच कुठेतरी चुकतेय. त्यासाठी मी तरुणींना सल्ला देते की पर्समध्ये कंडोम ठेवत जा. न लाजता स्वतःच पर्समध्ये कंडोम बाळगा. शेवटी शरीर स्वतःचे आहे, काळजीही स्वतःच घेतली पाहिजे. हो आणि विवाहित स्त्रियांनीही नवऱ्याला ठणकावले पाहिजे की समागमाचे सुख कंडोमने कमी होत नसून, उलट वाढते. कारण कुठल्याही काळजीशिवाय दोघांनाही आनंद लुटता येतो.

 

(मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर स्त्री रोगतज्ज्ञ असून सध्या छत्तीसगड येथील दुर्गम भागात रुग्णसेवा बजावत आहेत. फेमिनिस्ट, ट्रॅव्हलर, लेखिकाही त्या आहेत.  त्यांच्या ‘बिजापूर डायरी’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.)

टॅग्स : आरोग्य