Join us   

रक्तदान करायचेय, पण हिमोग्लोबिनच कमी.... या पदार्थांमुळे झटपट वाढू शकते तुमचे हिमोग्लोबिन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 1:19 PM

नियमितपणे रक्तदान करावे, असे अनेक महिलांना वाटते. पण हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे आलेला अशक्तपणा अनेकींसाठी अडसर ठरतो. त्यामुळे खूप इच्छा असूनही बऱ्याच जणींना केवळ लोह कमी असल्याने रक्तदान करता येत नाही. हिमोग्लोबिन वाढवा आणि रक्तदान करा, हा एवढा सोपा फंडा यासाठी लक्षात ठेवा आणि हे पदार्थ खाऊन झटपट हिमोग्लोबिन वाढवा.

ठळक मुद्दे महिलांचे रक्तदानाचे प्रमाण वाढते आहे, पण अजूनही हे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत खूपच कमी आहे. शहरी भागातील महिला आरोग्याविषयी सतर्क असतात, असे म्हणतात. पण आजही ५० टक्क्यांहून अधिक शहरी महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन बी कमी असेल तरी हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊ लागते.

सकाळची वेळ प्रत्येक महिलेसाठी अगदी धावपळीची. मग ती एखादी गृहिणी असो किंवा मग एखाद्या नामांकित कंपनीमध्ये असणारी उच्चपदस्थ अधिकारी. आई, पत्नी, सून, मुलगी या तिच्या भूमिका प्रत्येक घरी सारख्याच असतात. गृहिणी असली तरी घरातल्या सगळ्यांच्या वेळा सांभाळण्यात ती अडकून जाते आणि नोकरदार किंवा बिझनेस वुमन असली, की घरासोबतच बाहेरच्या जबाबदाऱ्यांसाठी तिला वेळेची जुळवाजुळव करावी लागते. या सगळ्या धावपळीत एक गाेष्ट मात्र बहुतांश महिला विसरून जातात ; आणि ते म्हणजे आहार.  घडाळ्याचा काटा पुढे सरकत जातो, सगळ्यांना आपण जेऊ- खाऊ घालतो. पण या सगळ्या धांदलीत आपल्या पोटात मात्र काहीच गेलेले नाही, हे आपण अगदी सहजपणे विसरून जातो. इथेच तर सगळा घोळ होतो आणि आपण दिवसेंदिवस अधिकच ॲनिमिक होत जातो. बहुतांश महिलांची हिच कहाणी असल्याने आजही भारतात ॲनिमिक किंवा अशक्तपणा असणाऱ्या महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. 

शरिरातील हिमोग्लोबिन म्हणजेच लोह किंवा आयर्न कमी असणे म्हणजेच ती स्त्री ॲनिमिक असणे. १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त प्रकर्षाने पुढे आलेली बाब म्हणजे अजूनही खूप इच्छा असूनही केवळ हिमोग्लोबिन कमी असल्याने अनेक महिला रक्तदान करू शकत नाहीत. एक्सरसाईज, वॉकिंग, जीम या सगळ्या गोष्टी अनेकजणी नियमितपणे अगदी न चुकता करतात. पण हिमोग्लोबिन वाढविणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश नसल्याने वरवर अगदी सुदृढ दिसत असल्या तरी आतून अनेक महिला अशक्त असतात. पुरूषांनी तीन महिन्यांतून एकदा तर महिलांनी चार महिन्यांतून एकदा रक्तदान करावे. रक्तदान करण्यासाठी महिलांच्या शरिरातील लोहाचे प्रमाण हे १२ किंवा त्यापेक्षा जास्त तर पुरूषांच्या शरिरातील लोहाचे प्रमाण हे १४ किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पण बहुतांश महिलांचे हिमोग्लोबिन हे १० किंवा त्यापेक्षाही कमी असते, असे डॉक्टरांचे निरिक्षण आहे. 

 

हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे अतिश्रमाची कामे. व्रतवैकल्ये आणि उपवास. आहाराकडे दुर्लक्ष. वारंवार होणारे गर्भपात. बाळांतपण आणि गर्भाशयासंबंधीचे आजार.

हिमोग्लोबिन कमी असल्याने होणारा त्रास अशक्तपणा येणे. वेगवेगळे अवयवांचे दुखणे. काम करण्याची इच्छा न होणे. प्रत्येक कामाचा कंटाळा येणे. दम लागणे. थकवा येणे. एकाग्रता नसणे.

 

हिमोग्लोबिन वाढवण्याचे उपाय सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्या, बीट, गाजर, गुळ- शेंगदाणे, डाळींब, बदाम, तांदूळ, ॲव्हाकॅडो, चवळी, राजमा, टोमॅटो, सफरचंद, खजूर या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास लोहाचे प्रमाण जलद गतीने वाढते.

टॅग्स : आरोग्यमहिलाहिमोग्लोबीनअ‍ॅनिमिया