Join us   

४ दिवसांची भयंकर परीक्षा! वयात येणाऱ्या मुलींशी मासिक पाळीविषयी बोलण्याची लाज का वाटते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 3:04 PM

मुलींच्या आरोग्याच प्रश्न आहे, जे तिच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, जे निसर्गचक्र आहे, त्याविषयी बोलायचंच नाही, मुलीला त्रास झाला तरी चालेल, हा जुनाट हट्ट कशाला?

ठळक मुद्दे मासिक पाळी हा मुलींच्या आयुष्यातला एक नॉर्मल आणि आरोग्यपूर्ण भाग आहे आणि त्याबद्दल कोणालाही लाज किंवा भीती वाटू नये.

किशोरवयीन मुलींच्या आयुष्यात मासिक पाळी सुरु होणं ही एक महत्वाची घटना असते. बालपणामधून प्रौढपणामध्ये जाण्याची ती सुरुवात असते. पहिली मासिक पाळी अनपेक्षितपणे येऊ शकते. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की हार्मोन्समुळे होणाऱ्या अनेक शारीरिक आणि भावनिक बदलांचा परिपाक हा मासिक पाळी हा असतो. मुलींसाठी ही वाढीतली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीच्या काळात गर्भाशयातील अस्तर व रक्त हे योनिमार्गावाटे बाहेर टाकले जाण्यामुळे रक्तस्राव होतो. सामान्यतः मुलगी ९ ते १४ वर्षांची असतांना मासिक पाळी सुरु होते, मात्र यात बदल होऊ शकतो. काही मुलींची मासिक पाळी ९ वर्षांच्या आधी सुरु होऊ शकते तर काहींची १४ वर्षांनंतर सुरु होऊ शकते. एखादी मुलगी किशोरावस्थेत प्रवेश करते तेव्हा तिच्या शरीरात अनेक बदल होतात. या बदलांमुळे मासिक पाळी लवकर सुरु होईल हे लक्षात येतं.

(छायाचित्र-गुगल)

 

यातले काही बदल म्हणजे..

१. ८ ते १३ वर्षांमध्ये स्तनांची वाढ सुरु होते.  २. नितंब रुंद होतात  ३. उंची वाढते ४. मुरुमं, घाम आणि शरीराचा विशिष्ठ वास या गोष्टी हार्मोनल बदलांमुळे होतात ५. किशोरावस्थेत मुली अधिक संवेदनशील, भावनाप्रधान होऊ शकतात. ६. योनीमार्गातून अधिक शेम्बडासारखा स्राव स्रवतो. तो अंतर्वस्त्रावर दिसतो किंवा त्या मुलीला जाणवतो. हा स्राव सामान्यतः पहिल्या मासिक पाळीच्या ६ महिने ते १ वर्ष आधी सुरु होतो. ७. मासिक पाळी येणं हा स्त्री शरीराच्या पुनरुत्पादन करणाऱ्या यंत्रणेतील नैसर्गिक बदलांचा परिपाक असतो. यामुळे हे अधोरेखित होतं की त्या मुलीने जर असुरक्षित लैंगिक संबंध ठेवले तर तिला गर्भधारणा होण्याची शक्यता असते. मासिक पाळी सामान्यतः ५ दिवस येते, मात्र त्यात फरक होऊ शकतो आणि हा कालावधी ३ ते ७ दिवस असू शकतो.

(छायाचित्र-गुगल)

 

मासिक पाळी कशामुळे येते?

शरीरातील हार्मोन्सच्या बदलामुळे मासिक पाळी येते. त्यात खाली दिल्याप्रमाणे वर्तुळाकार प्रक्रिया होते: दर महिन्याला स्त्रीच्या शरीरात एक बीजांडं तयार होतं. मासिक चक्राच्या मध्यावर (२८ दिवसांच्या चक्रात १२ ते १५व्य दिवशी) एक बीजांडकोश हे बीजांडं रिलीज करतो. याला ओव्ह्युलेशन म्हणतात. हे बीजांडं फेलोपियन नळीमार्गे गर्भाशयात प्रवेश करतं. त्याच वेळी शरीरातील टिश्यूज आणि रक्तामुळे गर्भाशयाचं अस्तर तयार व्हायला लागतं. या बीजांडाची गर्भधारणा न झाल्यास गर्भाशयाचं अस्तर नष्ट होतं, ज्यामुळे मासिक पाळी येते. या बीजांडाचं शुक्राणूबरोबर फलन झालं, तर ते गर्भाशयाच्या भिंतीला चिकटतं जिथे त्याची वाढ गर्भात होते. एकदा एक बीजांड सोडलं की ही प्रक्रिया पुन्हा सुरु होते. आधीच्या मासिक पाळीनंतर पुढची मासिक पाळी २१ ते २८ दिवसांनंतर येते. या २८ दिवसांच्या सायकलला मासिक पाली म्हणतात, ज्यात बीजांडनिर्मिती, फलन आणि मासिक पालीचा समावेश असतो. मासिक पाळीची लांबी ही पाळीच्या पहिल्या दिवसापासून ते पुढील पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत धरली जाते. एखाद्या मुलीची मासिक पाळी सुरु झाल्यानंतरची पहिली काही वर्षं ती अनियमित असू शकते आणि ते नॉर्मल आहे. मात्र पहिल्या मासिक पाळीनंतर २-३ वर्षांनंतर मुलीची पाळी नियमित होऊन ४-५ आठवड्यात एकदा यायला पाहिजे. प्रत्येकीने तयारीत राहण्यासाठी कॅलेंडरवर पुढील पाळीच्या तारखा लिहून ठेवल्या पाहिजेत. मात्र त्याव्यतिरिक्त इतर काही लक्षणांमुळे मुलींना हे समजतं की त्यांची मासिक पाळी जवळ आली आहे. उदाहरणार्थ: क्रॅम्पस येणं, पॉट फुगल्यासारखं वाटणं, अंग दुखणं आणि स्तनांमध्ये वेदना होणं खारट किंवा गोड पदार्थ खावेसे वाटणं भावनिक आंदोलनं, चिडचिडेपणा, डोकं दुखणं आणि थकवा

निष्कर्ष

मासिक पाळी हा मुलींच्या आयुष्यातला एक नॉर्मल आणि आरोग्यपूर्ण भाग आहे आणि त्याबद्दल कोणालाही लाज किंवा भीती वाटू नये. मुलगी किशोरवयाची झाल्यानंतरची ही नॉर्मल वाढ आणि महिन्याच्या रुटीनचा भाग आहे. मासिक पाळी येण्यामुळे शारीरिक क्रिया करणं, मजा करणं आणि रोजच आयुष्य यात बाधा येता कामा नये.

 तज्ज्ञ सल्ल्यासाठी विशेष आभार : डॉ. डी किरणमयी (MD, FICOG, SENIOR CONSULTANT OBG)

संदर्भ https://kidshealth.org/en/teens/menstruation.html https://www.everydayhealth.com/pms/a-teens-guide-to-her-first-period.aspx https://raisingchildren.net.au/pre-teens/development/periods-hygiene/periods https://www.unicef.org/wash/schools/files/UNICEF-MenstrualHygiene-PRINT-27May15.pdf

टॅग्स : आरोग्य