lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Adolescence > पाळीच्या दिवसात खूप पोट दुखतं? हे दुखणं कमी कसं करणार?

पाळीच्या दिवसात खूप पोट दुखतं? हे दुखणं कमी कसं करणार?

पाळीच्या दिवसात पोट दुखणं ही अनेकजणींची समस्या असते.पण काहींच्या वेदना इतक्या असतात की दैनंदिन कामकाज करणं अशक्य होतं. या त्रासावर उपाय आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 02:30 PM2021-04-12T14:30:47+5:302021-04-12T14:48:09+5:30

पाळीच्या दिवसात पोट दुखणं ही अनेकजणींची समस्या असते.पण काहींच्या वेदना इतक्या असतात की दैनंदिन कामकाज करणं अशक्य होतं. या त्रासावर उपाय आहेत.

Why does the stomach ache during menstruation? How will this reduce the pain? | पाळीच्या दिवसात खूप पोट दुखतं? हे दुखणं कमी कसं करणार?

पाळीच्या दिवसात खूप पोट दुखतं? हे दुखणं कमी कसं करणार?

Highlightsजसजसं वय वाढत जातं या वेदना कमी होतात आणि काहींच्या बाबतीत बाळंतपणानंतर पूर्णच बंद होतात.सर्वसाधारणपणे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदनेचा कुठल्याही स्त्री रोगाशी संबंध नसतो.पाळी वेदनेमुळे अति रक्तस्रावाचा त्रासही होऊ शकतो.

 मासिक पाळीच्या दिवसात किंवा पाळी चालू होण्याआधी अनेक मुलींच्या ओटीपोटात प्रचंड वेदना होतात. हा अनुभव अनेकांचा असला तरी काही मुलींमध्ये या वेदना तीव्र असतात. ज्याचा त्यांच्या रुटीनवर आणि रोजच्या कामकाजावर परिणाम होतो. काही मुलींमध्ये पाळी वेदना नियमित असतात. पण जसजसं वय वाढत जातं या वेदना कमी होतात आणि काहींच्या बाबतीत बाळंतपणानंतर पूर्णच बंद होतात.

लक्षणं कोणती?
१) ओटीपोटात कळा येणं. दुखायला लागणं आणि हे दुखणं वाढत जाणं.
२) बेंबीपाशी दाब जाणवणं.
३) खालची पाठ, मांड्या आणि पायांमध्येही वेदना सुरु होणं.

ज्यावेळी कळा तीव्र होऊन वेदना होतात तेव्हा...
१) पोट बिघडणं
२) मळमळणं, उलटी होणं
३) गरगरणं
या वेदना पाळीच्या १ ते ३ दिवस आधी सुरु होतात. पाळीच्य २४आधी तास तीव्र होतात आणि मग पुढच्या २ ते ३ दिवसात कमी होतात.

पाळी वेदनेची कारणं काय?
पाळी येते तेव्हा गर्भशाय आकुंचन पावतं ज्यामुळे गर्भाशयाच्या भिंतींना असणारं अस्तर सुटून येतं. हे प्रोस्टाग्लान्डिन्स सारख्या हार्मोन्समुळे घडतं. हे अस्तर सुटलं की मासिक पाळी सुरु होते. जर गर्भाशय खूप जोरात आकुंचन पावलं तर त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो आणि गर्भाशयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि वेदनांना सुरुवात होते. पाळी वेदनेमुळे अति रक्तस्रावाचा त्रासही होऊ शकतो.

पाळी वेदनेचे प्रकार कोणते?

प्राथमिक वेदना
सर्वसाधारणपणे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदनेचा कुठल्याही स्त्री रोगाशी संबंध नसतो. पाळी वेदना जवळपास ५० टक्के स्त्रिया अनुभवतात. आणि फक्त १० टक्के महिलांमध्ये या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात. तसंच वयाची वीस वर्ष ओलांडलेल्या महिलांमध्येही हा प्रकार सर्वसाधारणपणे दिसतो. बऱ्याच जणींच्या बाबतीत वयानुसार हे कमी होत जातं किंवा बाळंतपणानंतर अनेकदा बंदही होतं. काहीवेळा वेदना तीव्र स्वरूपाच्या असू शकतात पण त्यापासून कुठलाही धोका नसतो.
दुसऱ्या स्तराच्या वेदना
या वेदना काहीवेळा कुठल्यातरी स्त्री रोगाशी निगडित असू शकतात. जसं की, एन्डोमेट्रिओसिस, गर्भाशयावर येणाऱ्या गाठी, अडेनोमयोसिस, पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज. प्रौढ स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसतो.

उपचार काय?
वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपचारांचा नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर खालीलपैकी काही गोष्टीही तुम्ही करू शकता…
१) गरम फडक्यानं किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं पाठ आणि ओटीपोट शेकणं.
२) पाठ आणि ओटीपोटाला हलका मसाज करणं.
३) गरम पाण्यानं आंघोळ करणं.
४) आवश्यकता वाटल्यास आडवं पडणं, झोप घेणं.
५) खारट आणि कॅफेन असलेले पदार्थ टाळणं.
६) त्या काळात मद्यपान, धूम्रपान न करणं.
७) नियमित व्यायाम करणं.
८) हलका आणि पोषक आहार घेणं.
९) जर वेदना तीव्र स्वरूपाच्या असतील तर वेदना शामक औषधं घ्यायला हरकत नाही.

जर पाळी वेदना नियमित आणि तीव्र स्वरूपाच्या असतील आणि त्यामुळे शाळा, खेळ आणि रुटीन बिघडत असेल तर मात्र ताबडतोब स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवलं पाहिजे. डॉक्टर तुम्हाला कधीपासून त्रास होतोय या सगळ्याची माहिती घेऊन योग्य ते उपचार सांगू शकतात. तीव्र पाळी वेदनेमध्ये अनेकदा डॉक्टर्स वेदना शामक औषधं देतात, ज्यात तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्यांचाही समावेश असतो. ज्यामुळे पाळी वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते.

पाळी वेदना अनेक मुलींना होते. शरीरात बदल होतात तसेच या काळात भावनांमध्येही बदल होतात. कमी स्वरूपाच्या वेदना असतील तर त्याचा काहीही धोका स्त्रीला असत नाही. पण जर वेदना तीव्र स्वरूपाच्या असतील तर मात्र त्याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर आणि कामकाजावर होऊ शकतो. अशावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. जेणेकरून त्रास वाढणार नाही.
विशेष आभार: डॉ. डी. किरणमयी
 (MD, FICOG, SENIOR CONSULTANT OBG, ASSOCIATE PROFESSOR OSMANIA MEDICAL COLLEGE HYDERABAD)

Web Title: Why does the stomach ache during menstruation? How will this reduce the pain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.