Join us   

व्हजायनल इरिटेशन: नाजूक भागात असह्य आग; सहन होत नाही-सांगता येत नाही, उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 4:42 PM

योनीमार्गात होणारी आग, खाज, जळजळ, इन्फेक्शन हे सगळं वयात येताना जास्त होतं, हे त्रास कशाने होतात? डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायला हवा?

ठळक मुद्दे योनीमार्गात आग हा सामान्य त्रास आहे. वयात येताना तो अनेकींना होतो.

व्हजायनल इरिटेशन, खास हा अत्यंत कॉमन प्रॉब्लम आहे. वयात येणाऱ्या मुलींना हा त्रास जास्त होता. काहीजणींना योनीमार्गात खाज येणं, आग होणं यासह चिकट स्त्रावही योनीमार्गातून येताना दिसतो. काहीजणींना योनीमार्ग लाल होणं, सूज येणं असेही त्रास होतात. अर्थात सूज येणं, लाल होणं भाग हे काही खाज किंवा आग होण्याइतपत कॉमन नाही. ती इन्फेक्शनची लक्षणं असू शकतात.

योनीमार्गात त्रास होण्याची कारणं..

१. योनीमार्गात झालेलं इन्फेक्शन. २. हा भाग अत्यात नाजूक असतो. त्यामुळे त्याभागात वापरले गेलेले परफ्यूम्स, क्रिम्स, ऑइनमेण्ट, स्प्रे यामुळे योनीमार्ग आणि त्याअवतीभोवतीचा भाग इथं त्यामूळे आग होऊ शकते. खाजही येते. ३. योनीमार्गाशी काही रसायनांचा संपर्क आला, साबणातल्या काही घटकांचा त्रास होऊ शकतो. ४. टॉयलेट पेपर वापरत असाल आणि चुकून लहानसा तुकडा तो त्याभागात राहून गेला तर त्रास होऊ शकतो. ५. टॅम्पॉन्स वापरत असाल आणि मासिक पाळीच्या काळात जर ते फार काळ आत राहिले, तर त्याचाही त्रास होऊ शकतो.

(Image :Google)

६. त्याभागात पावडर लावत असाल तरी खास, जळजळ असा त्रास होऊ शकतो. ७. सॅनिटरी नॅपकिन्स चांगल्या प्रतीचे वापरले नाहीतर तरी ॲलर्जी येते. ८. ओले, सूर्यप्रकाशात नीट न वाळलेले अंडरवेअर वापरण्याने त्रास होतो. ९. स्लॅक्स, जिन्स, स्पोर्ट्सवेअर, यासारखे टाइट -तंग कपडे सतत वापरल्याने त्याभागात घाम जास्त येतो, त्यातूनही त्रास वाढतो. १०. सिंथेटिक मटेरिअलचे अण्डरवेअर वापल्याने, लेस असलेले वापरल्याने खाज येऊ शकते. ११. मासिक पाळीच्या काळात कापड वापरणे, ते स्वच्छ धुतलेले नसले, कडक असणे यातून आग-खाज येते.

घरच्याघरी यावर उपाय काय?

काही सोप्या सोप्या गोष्टी करुन आपण हा त्रास कमी करु शकतो. १. कॉटनचे अण्डरवेअर वापरा. २. ढगळे-सैलसर-मोकळेढाकळे कपडे वापरला. पॅण्ट्स, स्कर्ट वापरणं उत्तम. घट्ट टाइट्स किंवा लेगिन्स वापरणं टाळा. ३. कपडे स्वच्छ धुतलेले आहेत, त्यांना डिटर्जण्ट तर लागलेले नाही हे तपासा. त्या कपड्यांवर फॅब्रिक सॉफ्टनर वापरु नका. ४. योनीमार्गाजवळचा एरिया नाजूक असतो, त्याची काळजी घ्या. ५. मऊ, रंगीत नसलेले, सुगंध नसलेले टॉयलेट पेपर वापरा. ६. बबल बाथ, फरफ्यूम सोप्स, वेगवेगळ्या क्रिम्स वापरू नका. ७. व्हजायनल वॉश वापरू नका.

(Image :Google)

८. लघवीला लागली की लगेच जा, धरुन ठेवू नका. ९. कॉटनचे पॅड आणि टॅम्पून्स वापरा. १०. व्यायाम करतानाचे, घामेजलेले कपडे तातडीने काढून आंघोळ करा. ११. खाज आली तर खाजवू नका. १२. तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह असाल तर खाज, आग होणे, दुखणे याकाळात सेक्स करु नका. १३. सेक्सनंतर नेहमी गार पाण्यानं योनीमार्ग आणि त्याभोवतीचा भाग स्वच्छ धुवा. १४. लैंगिक संसर्ग आजार टाळण्यासाठी कंडोम वापरण्याचा आग्रह धरा.

(Image :Google)

डॉक्टरकडे कधी जायला हवं?

 घरगुती उपचार करुनही जर आग, खाज यांचे प्रमाण कमी झाले नाही तर डॉक्टरकडे जायला हयं. डॉक्टर तिथं इन्फेक्शन नाही ना, असेल तर काय आहे याची खात्री करुन औषधं देतात.

१. लघवीला जाताना दुखत असेल, आग होत असेल तर तातडीनं डॉक्टरांना दाखवा. २. योनीमार्गतून रक्तस्त्राव किंवा पांढरा स्त्राव येत असेल तर.. ३. ताप असेल, पोटात दुखत असेल तर ४. योनीमार्ग किंवा भोवतीच्या भागात काही जखमा झाल्या असतील, फोड आले तर ५. सतत लाल होणे, रॅश, किंवा सूज दिसली तर ६. योनीमार्गातून येणाऱ्या स्त्रावातून दुर्गंधी येत असेल तर..

महत्त्वाचे.. योनीमार्गात आग हा सामान्य त्रास आहे. वयात येताना तो अनेकींना होतो. काही गोष्टी नियमित केल्यास त्रास कमी होतो. मात्र काही इन्फेक्शन असेल, त्रास जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.

विशेष धन्यवाद - डॉ. सुरेखा तायडे. ( जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज, वर्धा)  

टॅग्स : आरोग्यस्त्रियांचे आरोग्य