Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सावधान ! कोरोना संसर्ग असताना वापरलेला ब्रश बरं झाल्यावर वापरु नका, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 20:21 IST

तज्ज्ञांच्या मते कोविड संसर्गबाधित व्यक्तीचा टूथब्रश हा कोविडचा संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरु शकतो. इतकंच नाहीतर संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही टूथब्रशच्या माध्यमातून पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. 

ठळक मुद्दे दंतचिकित्सकांच्या मते जे कोविड १९ संसर्गातून नुकतेच बरे झाले आहेत त्यांनी बरं झाल्या झाल्या आपला टूथब्रश बदलायला हवा. यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा संसंर्ग होण्याचा धोका टळतो आणि घरातले इतर सदस्यही सुरक्षित राहातात.टूथब्रशवर वाढणारे जिवाणू / विषाणू हे श्वसनमालिकेतील वरच्या भागाला संसर्ग करण्यास कारणीभूत ठरतात.जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस कोरोना संसर्ग झालेला असेल तर त्या व्यक्तीनं आधी आपला ब्रश आणि टंगक्लिनर हे साहित्य वेगळं ठेवायला हवं.

कोरोना संसर्गाच्या उद्रेकात प्रत्येकानं वैयक्तिक स्तरावर काळजी घेणं हे सुरक्षेचं पहिलं पाऊल मानलं जात आहे. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी कोरोनाचा संसर्ग थांबवण्यास प्रभावी ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणजे टूथब्रश. दंतचिकित्सकांच्या मते कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीनं वीस दिवसानंतर वापरात असलेले टूथब्रश , टंग क्लिनर हे टाकून देऊन नवीन टूथब्रश आणि टंग क्लिनर वापरायला हवेत.

तज्ज्ञांच्या मते कोविड संसर्गबाधित व्यक्तीचा टूथब्रश हा कोविडचा संसर्ग फैलावण्यास कारणीभूत ठरु शकतो. इतकंच नाहीतर संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तीलाही टूथब्रशच्या माध्यमातून पुन्हा कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. तज्ज्ञ म्हणतात की कोरोनाचा फैलाव रोखण्यास लस जरी प्रभावी काम करत असली तरी लस घेतल्यानंतरही कोरोना होणारच नाही हे अजून कोणीही खात्रीनं सांगू शकत नाही. त्यामुळेच काळजी घेणं हा एकमेव उपाय आहे. ही काळजी आतापर्यंत ज्यांना कोरोनाचा संसर्ग  झाला नाही त्यांनी घेणं जितकं महत्त्वाचं तितकंच जे या कोरोना संसर्गातून नुकतेच बरे झाले आहे त्यांनीही गाफील न राहाता काळजी घ्यायला हवी. दंतचिकित्सकांच्या मते जे कोविड १९ संसर्गातून नुकतेच बरे झाले आहेत त्यांनी बरं झाल्या झाल्या आपला टूथब्रश बदलायला हवा. यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीला पुन्हा संसंर्ग होण्याचा धोका टळतो आणि घरातले इतरही सुरक्षित राहातात.

आपल्या देशात बहुतांश लोकांची घरी छोटी छोटी असतात. त्यामुळे एकच टॉयलेट बाथरुम कुटुंबातील सर्व सदस्य वापरतात. या पार्श्वभूमीवर संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तीनं त्वरित आपला टूथब्रश बदलायला हवा असं नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमधील दंत शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. प्रवेश मेहरा म्हणतात. त्यांच्या या म्हणण्याला आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दंत सल्लागार डॉ. भूमिका मदान या दुजोरा देताना म्हणतात की, साधा फ्ल्यू, सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनाही आम्ही बरं झाल्यानंतर आधी टूथब्रश आणि टंगक्लिनर बदलायला सांगतो. हाच सल्ला कोविड१९ संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनाही आहे.कोविड संसर्ग झाल्यापासून २० व्या दिवशी त्या व्यक्तीनं आपला टूथब्रश बदलणं ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.

याचं कारण सांगताना डॉ. मदान म्हणतात की टूथब्रशवर वाढणारे जिवाणू / विषाणू हे श्वसनमालिकेतील वरच्या भागाला संसर्ग करण्यास कारणीभूत ठरतात. यापासून बचाव करण्यासाठी आम्ही रुग्णाला माऊथवॉश किंवा बेटाडिनच्या गूळण्या करायला सांगतो. जर घरात माऊथवॉश नसेल तर गरम सलाइन वॉटरच्या सहाय्यानं गूळण्या केल्या तरी तोंडाच्या आतील भागाची स्वच्छता आणि सुरक्षितता राखली जाते. याशिवाय दिवसातून दोनदा ब्रश करणंही आवश्यक आहे.

टूथब्रश बदलणं आणि तोंडाची स्वच्छता राखणं यामागचं शास्त्र काय? जागतिक आरोग्य संस्थेच्या मतानुसार विषाणू पसरायला खोकताना, शिंकतांना, बोलताना, ओरडाताना, हसताना तोंडावाटे, नाकावाटे बाहेर पडलेले बारीक शिंतोडे कारणीभूत ठरतात. विषाणूजन्य पृष्ठभागाला स्पर्श केल्यास आणि हात न धूताच ते चेहेरा, डोळे, नाकाला लावल्यास विषाणूचा संसर्ग होतो. याव्यतिरिक्त संसर्गबाधित व्यक्तीद्वारे बाहेर पडलेला विषाणू हवेत काही काळ राहातो आणि जर ती जागा पुरेशी हवेशीर नसेल, कोंदट असेल तर सोबतच्या व्यक्तीलाही संसर्गाची बाधा होते. विषाणू कसा पसरतो त्याची ही पार्श्वभूमी. या पार्श्वभूमीनुसार म्हणूनच कोरोनासंसर्गबाधित व्यक्तीचा टूथब्रश आणि टंगक्लिनर ही साधनं विषाणूचा प्रसार करण्यास कारणीभूत ठरतात. ज्याचा परिणाम म्हणून कोरोना संसर्गातून बरी झालेली व्यक्ती पुन्हा बाधित होण्याचा धोका असतो आणि घरातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस कोरोना संसर्ग झालेला असेल तर त्या व्यक्तीनं आधी आपला ब्रश आणि टंगक्लिनर हे साहित्य वेगळं ठेवायला हवं. या वर्षी जानेवारीत ब्राझीलमधील संशोधकांनी तोंडाची स्वच्छता आणि कोरोना संसर्ग याबद्दलचा अभ्यास केला . हा अभ्यास म्हणतो की टूथब्रशचं निर्जंतुकीकरण करणं महत्त्वाचं आहे. यामुळेही विषाणूचा संसर्ग होण्यास अटकाव होतो. तोंडाच्या स्वच्छतेतला हा महत्त्वाचा मूद्दा आहे. टूथब्रश हे सूक्ष्मजीव जोपासणारे साधन आहे. आणि म्हणूनच कोरोना संसर्गातून बरं झाल्यानंतर स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आधी वापरात असलेला टूथब्रश आणि टंगक्लिनर फेकून देण्याचा आग्रह दंतचिकित्सक करत आहेत.

कोरोना काळात टूथब्रशसंदर्भात काय काळजी घ्याल? १. टूथब्रश करताना आधी हात साबणानं स्वच्छ धुवावेत. आधी हात स्वच्छ धुवावेत, मग ब्रश करावा, गुळण्या करुन मग चेहेरा आणि हात पुन्हा स्वच्छ धुवावेत. हा क्रम मोठ्यांसोबतच लहान मुलांनी पाळणंही महत्त्वाचं आहे. २ ब्रश करुन झाल्यानंतर टूथब्रश हा गरम पाण्यानं स्वच्छ धुवावा ३ टूथब्रश होल्डरमधे ठेवताना एकमेकांचे ब्रश एकमेकांना स्पर्श करणार नाहीत असे ठेवायला हवेत. सारख्या रंगाचे ब्रश असतील तर एकमेकांचे ब्रश वापरले जाणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी टूथब्रशवर खूण करावी किंवा नाव चिटकवावं. ४ टूथब्रश हा वापरुन झाल्यावर टूथब्रश होल्डरमधे उभाच ठेवायला हवा. तो बेसिनवर तसाच आडवा करुन ठेवू नये. ५ टूथब्रश होल्डरचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. शिवाय ते साबणानं स्वच्छ धुवून कोरडं करुन वापरणं आवश्यक आहे. ६ . टूथब्रशवर टूथपेस्ट घेताना टूथब्रशचा त्याला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी. यासाठी पेस्ट आधी वॅक्स पेपरवर काढून मग आपल्या ब्रशवर घ्यावी. ७ कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीनं आपला टूथब्रश, टूथपेस्ट वेगळी ठेवावी.

 सौजन्य:- इंडिया टुडे