Join us   

जेवणानंतर आंघोळ करता किंवा लगेच ढाराढूर झोपता? -आवरा... अन्यथा गंभीर परिणाम होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 8:10 PM

सकाळी फटाफट सगळी कामे आटोपून घ्यायची, नाष्टा करायचा आणि मग आंघोळ करायची अशी सवय अनेक महिलांना असते. तरूण मुलींचे रूटीनही काहीसे असेच असते. पण जेवणानंतर आंघोळ अशी उलट कृती करत असाल, तर सावधान !!

ठळक मुद्दे तरूण मुलींचे चक्र तर आणखीनच भन्नाट असते. कधी झोपायचे, कधी उठायचे, कधी जेवायचे आणि कधी आंघोळ करायची याचा आणि घड्याळाचा काही संबंध असतो, असेच मुळी त्यांना वाटत नाही.

सकाळी उठल्यावर चहा-पाणी झाले की लगेचच आंघोळीला जायचे, असे आपल्याला आपल्या घरातील मोठ्या बायकांनी सांगितलेले असते. पण आपली रोजची कामाची धावपळ आणि व्यस्त रूटीन यामुळे अनेकदा हा नियम फॉलो करायला अवघड वाटतो. अनेक जणी तर सकाळचा चहा झाला की नाष्टा करतात आणि त्यानंतर आंघोळीला जातात.

तरूण मुलींचे चक्र तर आणखीनच भन्नाट असते. कधी झोपायचे, कधी उठायचे, कधी जेवायचे आणि कधी आंघोळ करायची याचा आणि घड्याळाचा काही संबंध असतो, असेच मुळी त्यांना वाटत नाही. सकाळी १०- ११ ला निवांत उठणे, भूक लागली म्हणून भरपेट यथेच्छ खाणे, त्यानंतर निवांतपणे आंघोळ करणे आणि आंघोळीनंतर पुन्हा मस्तपैकी ताणून देणे, हा सुटीचा अनेकांचा दिनक्रम ठरलेला असतो. कोरोना काळात तर सगळे काही बंदच असल्याने अनेक मुली अशाच पद्धतीने वागत आहेत, अशी तक्रारही त्यांच्या आई करत असतात. पण मुलींनो आणि त्यांच्या आयांनो, तुम्हीही हेच चक्र फॉलो करत असाल, तर स्वत:ला लगेच आवरा. अन्यथा या चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. 

जेवल्यानंतर का नाही करायची आंघोळ ? जेवण केल्यानंतर दोन तास आंघोळ करू नये असे आयुर्वेदात सांगितले आहे. जेवण झाल्यावर अन्न पचविण्यासाठी आपल्या शरीरातील फायर एलिमेंट ॲक्टीव्ह झालेले असते. यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि रक्ताभिसरणाची क्रिया अधिक जलद होऊ लागते. शरीराचे तापमान वाढल्यावर जर तुम्ही आंघोळ केली तर शरीराचे तापमान कमी होऊ लागते आणि रक्ताभिसरणाची क्रिया मंद होत जाते. यामुळे ॲसिडीटी, पचनाला त्रास होणे आणि लठ्ठपणा वाढणे असे त्रास होऊ शकतात. 

 

जेवल्यानंतर झोपत असाल, तर वाढेल वजन जेवल्यानंतर लगेचच बेडवर आडवे होणे तुम्हाला निश्चितच महाग पडू शकते. यामुळे पचनासंबंधीचे विविध त्रास तर होतातच पण त्यासोबतच लठ्ठपणा, ॲसिडीटी, छातीत जळजळ होणे असेही त्रास सुरू होतात. या सवयीमुळे मधुमेहालाही खतपाणी मिळू शकते, असेही तज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स : आरोग्यअन्नमहिला