वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला मासिक पाळी येतेच. प्रजननासाठी मासिक पाळी अत्यावश्यक असते. होणारा रक्तस्त्राव आणि त्यामुळे डाग पडू नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं असतं. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये पॅड्स वापरणं हा पर्याय असतो. कारण पॅड्स वापरायला सोपे आणि सुरक्षित असतात. मासिक पाळी आल्यानंतर सुरुवातीला पॅड्स वापरणं कधीही उत्तम. शिवाय पॅड्स वेगवेगळ्या साइजेसमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे होणाऱ्या रक्तस्रावावर पॅडचा साइज निवडता येऊ शकतो.
पॅड कसं वापरलं पाहिजे? आपल्या चड्डीत किंवा पॅंटीमध्ये पॅड लावताना या गोष्टींचा अवलंब नक्की करा. १) पॅड वापरण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. म्हणजे कुठलेही संसर्ग होणार नाहीत. २) अनेकदा पॅड्स रॅपरमध्ये बांधलेली असतात. एका बाजूनं रॅपर बंद केलेलं असतं. जरासं ओढलं की रॅपर उघडत आणि पॅड बाहेर काढता येतो. हेच रॅपर वापरून झालेलं पॅड फेकून देण्यासाठीही वापरता येतं. पॅड बदलताना जुनं पॅड या रॅपरमध्ये गुंडाळून मग कचऱ्यात टाकावं. ३) प्रत्येक पॅडच्या मागच्या बाजूला आणि दोन्ही बाजूंना स्ट्रिप्स असतात. या चिकटपट्ट्या काढून पॅड्स पँटीमध्ये बसवायचा आणि बाजूचे विंग्स वाळवून ज्या त्या बाजूने पॅंटीच्या मागच्या बाजूला बसवायचे. म्हणजे पॅड हालत नाही. आपण कितीही हालचाली केल्या तरी पॅडची जागा बदलत नाही. ४) पॅड पॅंटीला लावण्यासाठी पाय एकमेकांपासून लांब करून गुढग्यात वाकावं. आणि वर सांगितल्याप्रमाणे स्टिकर्स काढून पॅड पॅंटीला चिकटवावं. ५) विंग्स बरोबर बसले आहेत ना हे तपासावं. ज्या पॅड्सना विंग्स नसतील ते पॅड्स पॅंटीला घट्ट चिकटवावे. म्हणजे पॅड हलणार नाहीत. ६) पॅड नीट लावल्यानंतर नेहमी घालतो तशी पॅंटी घालावी. ७) पाळीचा रक्तस्त्राव या पॅडमध्ये जमा होईल.
विशेष आभार: डॉ. रिना वाणी (MD, FRCOG, DNB, DGO, FCPS, DFP, FICOG)