handful of grains to fight malnutrition! | कुपोषणाशी लढण्यासाठी हवं मूठभर धान्य!
कुपोषणाशी लढण्यासाठी हवं मूठभर धान्य!

रजनी मधुकर सराफ

स्थळ : सांजापूर (हिरपूर), ता. मूर्तिजापूर, जि. अकोला

 झाकली मूठ सव्वा लाखाची असे म्हणतात. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यात एका गावात याच ‘मुठी’ने किमया केली होती, ही मूठ होती धान्याची.. पण किंमत म्हणाल तर फक्त सव्वा लाखांची नाही तर लाखोंची. 
धान्याची ही मूठ लाख मोलाच्या चिमुकल्यांची भूक भागवित होती. चिमुकल्यांच्या भुकेला सुकडीसारखा आहार देण्याऐवजी पौष्टिक अन्न देणारी ही धान्याची मूठ कुपोषणाला हद्दपार करणारी व्रजमूठच ठरली होती. 
मूर्तिजापूर तालुक्यातील सांजापूर (हिरपूर) हे एक आडळवणाचं गाव. गावाची लोकसंख्या हजाराच्या घरात, अनेक ग्रामस्थांचा उदरनिर्वाह शेतीवरच.
गावात आरोग्याच्या समस्याही इतर गावांसारख्याच त्यामुळे मुलांचं पोषण हा मोठा प्रश्न ! गावाच्या अंगणवाडीत साधारणपणे 25 चिमुकले. या चिमुकल्यांना केवळ सरकारी आहार देण्याऐवजी काहीतरी वेगळं करता येईल का हा विचार या गावाच्या  अंगणवाडीसेविका रजनी मधुकर सराफ यांनी केला अन् मूठभर धान्याची संकल्पना समोर आली. 

रजनीताई 27 डिसेंबर 1994 पासून  सांजापूर (हिरपूर) येथे  अंगणवाडी-सेविका म्हणून काम करतात.  अंगणवाडी-सेविका म्हणून काम करीत असताना अनेक उपक्रमात स्वत:ला झोकून द्यायचे हा त्यांचा स्वभावच.
1994च्या जुलै महिन्यात त्यांनी स्वयंस्फूर्तीने कुपोषित बालकांसाठी ‘एक मूठ धान्य’ हा उपक्रम सुरू केला.

या उपक्रमामुळे पोषण आहाराच्या चवितही फरक पडला अन् कुपोषणाचं प्रमाण कमी झालं-अंगणवाडीतील चिमुकल्यांची उपस्थितीही  वाढली. 
ती आजतागायत कायम आहे. त्यावेळी  महिनाभरात गावक-यानी तब्बल दीड क्विंटल धान्य दिलं, ते पुरेसं होतं म्हणून मग ते संपेपर्यंत हा उपक्रम थांबविला नंतर पुन्हा सुरू केला.

हा उपक्रम कालांतराने बारगळला, शासनाकडूनही आहाराचे निकष बदलले. नवा आहार आला मात्र मूठभर धान्याची चव अविटच !  
आजही या अंगणवाडीत 68 मुले आहेत मात्र त्यातील एकही कुपोषित नाही कदाचित, त्या मूठभर धान्याच्या उपक्रमाने पोषणाचं महत्त्वच गावावर कोरलं गेलं असावं. त्यामुळेच आता पुन्हा एकदा रजनीताई या उपक्रमाची सुरुवात करण्याच्या तयारीत लागल्या आहेत. 

--------------------------------------------------

मूठभर  धान्य

*गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन मूठभर  धान्य गोळा करायचं
* धान्य  कोणतंही चालेल, दिलंच पाहिजे असा   दंडक नाही पण आपल्याच गावाच्या मुलांसाठी कोणी  नकार दिला नाही
*  दररोज येणार्‍या या धान्याचा वापर मुलांच्या  पोषण-आहारात

- राजेश शेगोकार 
(मुख्य उपसंपादक, 
लोकमत : अकोला)

Web Title: handful of grains to fight malnutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.