Giving Beauty, Strength, and Wisdom: The Temptation in the Market Will Now Be the Bar of the Law! | सौंदर्य, सामर्थ्य आणि बुध्दी देऊ करणा-या बाजारातल्या प्रलोभनांना आता लागेल कायद्याचा लगाम!

सौंदर्य, सामर्थ्य आणि बुध्दी देऊ करणा-या बाजारातल्या प्रलोभनांना आता लागेल कायद्याचा लगाम!

- स्नेहा मोरे 


सुंदर चेहरा, झकपक कपडे, टापटीप राहणी म्हणजे सौंदर्य नव्हे किंवा पार्लरमध्ये जाऊन केलेले उपचार म्हणजेही सौंदर्य नव्हे. बाह्य सौंदर्याच्या हट्टापायी स्वभावातलं, असण्यातलं सौंदर्य हरवत चालल्याची जाणीव होते खरी; पण बाजारपेठेत रोज नव्याने येणारे चकचकीत पर्याय या विवेकावर मात करून ग्राहकांच्या आयुष्यात शिरतातच. .मग ती गोरेपणाचा वादा करणारी सौंदर्यप्रसाधने असोत, उंची वाढवण्याचा दावा करणारी टॉनिक्स असोत नाहीतर हरवलेला लैंगिक जोम पुन्हा देऊ करण्याचे दावे विकणारी ‘उत्तेजना-औषधे’ असोत!
एकतर शरीराची विशिष्ट ठेवण, अमुक इतकी उंची हे जे काही जन्मजात लाभते, त्यात सौंदर्याच्या आणि मर्दानी सामर्थ्याच्या व्याख्यांनुरूप बदल करून घेण्या-देण्याची ईर्ष्या दोन्ही बाजूंनी सारखीच असते. त्यामुळे पार्लरच्या वा-या  क्रीम्सचा मारा, जिमच्या चकरा आणि लैंगिक ‘ताकद’ पुन्हा देण्याचे वादे करणा-या  डॉक्टर-वैदूंचे उंबरठे झिजवणे चालू होते, ते संपता संपत नाही. लैंगिक शिक्षणाविषयी अज्ञान असल्यामुळे याविषयी तर समाजात अनेक गैरसमज आहेत. यामुळे गेल्या काही वर्षात लैंगिक क्षमता वाढविणा-या उत्पादनांच्या बाजारपेठेची उलाढाल कोटय़वधींच्या घरात गेली आहे. मात्र असे असूनही अजूनही आपल्या यंत्रणांकडून लैंगिक साक्षरतेसाठी कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही, ही संकल्पना केवळ कागदावरच धूळ खात पडली आहे. या बाजारपेठेचा ग्राहक समाजाच्या सर्वस्तरातील असल्यामुळे शेवटच्या घटकांना या उत्पादनांचे आरोग्यविषयक दूरगामी परिणाम सहन करावे लागतात. आणि याविषयी बोलायचीही चोरी असल्याने सगळाच मामला लपाछपीचा होऊन बसतो. गेल्या काही वर्षात लहानग्यांना सक्षम बनवणारा पोषक आहार ही पालकांच्या दृष्टीने आणखी एक मोठी चिंता होऊन बसली आहे. घरात सकस अन्न शिजवण्याच्या पद्धती वेळेसह अन्य अनेक गोष्टींच्या अभावी लोप पावत आहेत, त्यामुळे शिजवायला वेळ नसणारे पालक आपल्या चिमुकल्यांना पैशाने विकत घेता येणारे असे काय काय  ‘तयार’ अन्न देता येईल याचा विचार सतत करून आपला ‘गिल्ट’ घालवण्याचे मार्ग शोधत असतात. आईवडील दोघेही घराबाहेर असताना अपत्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा समतोल राखण्याचे आव्हान पालकांसमोर आहे. त्याचा परिणाम म्हणून लहानग्यांना मागील काही वर्षात फूड सप्लिमेंट्स, जंक फूड, बैठी जीवनशैली, सोशल मीडियाचे व्यसन, गेमिंगचा हट्ट अशा विविध आजारांनी ग्रासले आहे.  स्पर्धात्मक जगात आपल्या मुलाने टिकाव धरावा म्हणून लहानपणापासूनच त्यांना ‘सप्लिमेंट्स’ देण्याचा ट्रेण्ड आता उच्च मध्यमवर्गातून मध्यमवर्गाच्या दिशेने सरकतो आहे. या सगळ्या  ‘बाजारा’ला वेसण घालण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच एक पाऊल उचलले आहे. वर्ण उजळण्याचे, उंची वाढण्याचे, लैंगिक उत्तेजना पुन्हा येण्याचे असे विविध प्रकारचे ‘अवास्तव’ दावे करणा-या उत्पादनांना रोखण्यासाठी आणि त्यातून होणारी ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठीच केंद्र सरकारने ड्रग्ज अँण्ड मॅजिक रेमिडिज (आक्षेपार्ह जाहिराती अधिनियम, 1954) कायद्यात सुधारणा केली आहे. सुधारणोनंतर या कायद्यात काही नवे आजार आणि विकारांचा समावेश करण्यात आला आहे. या कायद्यात समाविष्ट करण्यात आलेले 78 आजार आणि विकार दूर करण्याचा दावा करणा-याउत्पादनांच्या जाहिराती करणे गुन्हा ठरणार आहे. सुधारित मसुद्यात दंडाची रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार पहिल्यांदा उल्लंघन केल्यास दोन वर्षाची कैद किंवा 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे आणि त्यानंतर पुन्हा उल्लंघन झाल्यास पाच वर्षाची कैद आणि 50 लाख रुपयांर्प्यत दंड होऊ शकतो. सुधारणा करून या कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. उदारीकरणानंतरच्या दशकाने भारतीयांच्या जीवनशैलीत मोठे बदल घडवले. विविध प्रकारांतील व्यसनांधता, स्थूलत्व आणि नवरोगांचा प्रसार याच काळात झाला आणि त्या प्रत्येक गोष्टीवर अक्सिर इलाजाचे दावे करणारी उत्पादनेही बाजारात येत राहिली. त्यांचा वेग वाढला आणी दाव्यांमधली कर्कशताही!  याच काळात जगसपाटी झाल्यामुळे सौंदर्याच्या संकल्पना, फॅशनच्या व्याख्या बदलत गेल्या. विश्वसुंदरी आणि जगत्सुंदरीच्या बाहुल्या भारतात तयार झाल्यानंतर जगभरच्या प्रसाधन कंपन्यांनी भारत ही हक्काची बाजारपेठ बनवून टाकली.  भारतीय आबालवृद्धांना सौंदर्य अट्टहासाच्या या मार्गातील कुरूपतेची जराही कल्पना नाही. नव्या उत्पादनांच्या मागे  लागून सौंदर्यप्रेमींकडून त्वचेवर केल्या जाणा-या अत्याचारांवर आणि एकूणच सौंदर्यसंकल्पनेवर मानसिकता बदलणे हा एकमेव उपाय असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सौंदर्योपचारांबरोबरच लैंगिक क्षमता वाढविणारी औषधे, सेक्स टॉइज, टॉनिक यालाही प्रचंड मागणी वाढली आहे. जगभरात हे कल्चर काही वर्षापूर्वीच रुजले होते; मात्र आता आपल्या देशातही या बाजारपेठेची कोटय़वधींत उलाढाल आहे. अतिरेकी दावे करणा-या या औषधांच्या विपरीत परिणांमाविषयी अनभिज्ञता असल्यामुळे त्यामुळे होणा-या उपायांपेक्षा अपायांमध्ये वाढ होण्याचा धोका संभवतो.
या सगळ्या व्यवहारांवर नियंत्रण आणण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे तज्ज्ञ मंडळी स्वागत करतात; पण त्याचबरोबर हेही सांगतात, की नुसते कायदे बदलून उपयोग नाही. आपली विचाराची पद्धत बदलणो आणि सारासार
विवेक सतत जागा ठेवण्याचा प्रयत्न करणोही तितकेच महत्त्वाचे आहे !!!
-----------------------------------------------------------------------

 

कायद्याला हवी विवेकाची जोड
सौंदर्योपचारांची मर्यादा कुठे संपते आणि गंभीर अशा वैद्यकीय तक्रारी/उपाय कुठे सुरू होतात यातली सीमारेषा अत्यंत पुसट होऊ लागली आहे. हे सुदृढतेचे लक्षण नव्हे. प्रत्येक वैद्यकीय तक्रारींमागे त्यासंबंधित अभ्यास तसेच पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे जसे चेह-यावरील वांग, उंची, लैंगिक विकार आदींकरिता वैद्यकीय शास्त्रात उपचार उपलब्ध आहेत. अशा समस्यांवर उपचार करण्यासाठी त्यासंबंधी प्रशिक्षित डॉक्टरांनाच त्यावर उपचार करण्याचा परवाना देण्यात आला आहे. एखादी तक्रार सौंदर्याशी निगडित असली, तरीही उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखालीच झाले पाहिजेत. याबाबतच्या नव्या कायदा सुधारणेला आता आपल्या सारासार विवेकाची जोड मिळणे फार आवश्यक आहे.
-डॉ. रिंकी कपूर,  
कॉस्मेटिक डरमॅटोलॉजिस्ट आणि डरमॅटोसर्जन

---------------------------------------------------------------

समजुतीपेक्षा गैरसमजच मोठे
आपल्या समाजात अजूनही सेक्सविषयी मोकळेपणाने बोलले जात नाही. त्यामुळे समजुतीपेक्षा गैरसमजच अधिक आहेत. गेल्या काही वर्षांत इंटरनेटच्या प्रसारामुळेही या विषयात आणखीच नवी गुंतागुंत आली आहे. पूर्वीही लैंगिक क्षमता वा लिंगाचा आकार वाढविण्याचे दावे करणारी उत्पादने चलनात होती, मात्र आता त्याचे स्वरुप आत्यंतिक गंभीर होत चालले आहे. दैनंदिन आयुष्यात वाढलेला ताणतणाव, कलह, बदललेली जीवनशैली या सर्वांच्या दडपणाखाली ग्राहक या उत्पादनांना बळी पडतात. आणि मग या उत्पादनांचे शारिरीक व मानसिक दूरगामी परिणामी ग्राहकांना भोगावे लागतात. कायद्यातील बदलाने या प्रकारांना काहीसा आळा बसू शकेल. या निर्णयाची अंमलबजावणीही काटेकोरपणो झाली पाहिजे.
-डॉ. प्रकाश कोठारी, 
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कन्सल्टिंग सेक्सॉलॉजिस्ट

-----------------------------------------------------------

सोपे पर्याय निरूपयोगी!
लहान मुलांचीे उंची, वजन आणि बुद्धिमत्ता वाढणो ही एक जैविक प्रक्रिया आहे. त्या प्रांतात अतिरेकी आणि इन्स्टन्ट रिझल्टसाठी घाई उपयोगाची नसते.
मुलांच्या संगोपनात सकस आहाराला तयार विकत आणण्याचे सोपे पर्याय शोधण्याने हाती फार काही लागणार नाही, 
हे आपण लक्षात घेतले पाहिजे. 
- डॉ. शकुंतला प्रभू, 
बालरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय संचालक, 
जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन


(लेखिका लोकमतच्या मुंबईआवृत्तीत वार्ताहर आहेत.)

moresneha305@gmail.com


 

Web Title: Giving Beauty, Strength, and Wisdom: The Temptation in the Market Will Now Be the Bar of the Law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.