Give this year's Diwali a pat on the back! | यंदाच्या दिवाळीत  द्या स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थाप!

यंदाच्या दिवाळीत  द्या स्वत:च्या पाठीवर शाबासकीची थाप!

- डॉ. प्रज्ञा कुलकर्णी

सखी, झाली का तुझी दिवाळीची कामं? घराची स्वच्छता झाली का? जाळीजळमटं काढून झाली का? डबेडुबे घासून झाले का? घरातलं नकोसं सामान मोडीत काढून घर जरा मोकळं आणि हलकं केलंस ना? फराळाच्या पदार्थांना लागणारी पिठं, भाजण्या केल्यास का? कोणाला आवडतं म्हणून काय करायचा घाट घातलास? सामान आणून झालं का ? आणि हो आकाशकंदील, रांगोळीचे रंग, पणत्या? खरेदी झाली का? सगळं काही सालाबादप्रमाणे पार पडलं असेल आणि पडेलही; पण आता सांग तू स्वत:साठी काय करणार आहेस?

तू नेहमीच सगळ्यांसाठी काहीबाही करत धावत असतेस. कुणाकुणाला काहीबाही देत असतेस; पण तुला काय गिफ्ट हवंय, तुला काय करावं वाटतंय याचा विचार केलास का? तुला वाटेल कदाचित वाटेल की सांगितलं तरी काय उपयोग होणार? आपल्या मनासारखं कोण देणार?

सखी, खरं तर तुझं मनापासून अभिनंदन! कशाबद्दल? अगं गेल्या सात-आठ महिन्यांत तुझ्या शरीरावर आणि मनावर एक विलक्षण ताण तू सहन केला आहेस. आयुष्य सगळ्यांचंच बदललं होतं; पण तुझ्यावर त्याचा खूप जास्त परिणाम झाला होता. शारीरिक आणि मानसिकही. दमली आहेस तू खूप .ज्या परिस्थितीला तू सामोरी गेली आहेस त्या काळात तुझी शारीरिक आणि मानसिक शक्ती तू पणाला लावली आहेस. कष्टासाठी लागणारा चिवटपणा, सहनशक्ती, नकारात्मक परिस्थितीतही जपलेली उमेद हे सारं मोलाचं आहे. घरातलं वातावरण हसतखेळत ठेवायला तू स्वत:चं सॅण्डविच करून घेत होतीस आणि तरीही नवनवीन पदार्थ उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये करून रांधून तुझ्यातल्या कल्पकतेला नवनवीन आव्हानं सातत्यानं देत होतीस.

आवतीभोवती काहीही नॉर्मल नसताना खंबीरपणे उभे राहून तू बदलाला सामोरे जात होतीस. दिनक्रम तर सगळ्यांचाच बदलला होता, पण जणूकाही काहीच झालं नाही असं मानून सणवार साजरे करून तू उत्साह आणि घरातलं चैतन्य जपत होतीस. हे जे अवघड काम तू केलंस ना, त्यासाठी तुझं अभिनंदन.

खरं तर या अवघड काळात, घराच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायानं समाजाच्या जीवनचक्राला गती देण्याचं आणि आधार देण्याचं काम तू करत होतीस. ते केलंस कारण तुझ्यात वसली आहे एक विलक्षण नैसर्गिक ताकद. अर्थात हे सगळं तू तुझ्या माणसांसाठी स्वखुशीनं केलंस. तेव्हा यासाठी कोणी तुझं कौतुक करणार नाही की सत्कार करून तुला काही भेटही देणार नाही.

दिवाळीत तुला मिळेलही काहीतरी भेटवस्तू पाडव्याला नवऱ्याकडून आणि भाऊबिजेला भावाकडून.

पण आज एक गोष्ट मात्र नक्की कर तू स्वत:ला काहीतरी भेट दे. आपण कधी देत नाही

स्वत: स्वत:ला स्वीकारणं फार मोलाचं असतं. तूच जर तुला नाही स्वीकारलंस तर लोकांनी स्वीकारावं अशी अपेक्षा तरी कशी करणार?

तुझ्यातली ताकद आणि तिचा तू केलेला विलक्षण वापर आधी तू स्वीकार आणि एक छानशी भेटवस्तू घे. ती भेटवस्तू काहीही असू दे. स्वत:बरोबर घालवलेला छानसा दिवस असूदे. एखादं छोटंसं पुस्तक, लहानशी असली तरी तुला हवी असणारी काही वस्तू असूदे. स्वत:ला ओळखून स्वत:ला स्वीकार आणि मग आपोआपच सुचेल तुला स्वत:ला काय भेट द्यायची ते. म्हण स्वत:ला हॅपी दिवाळी!

( लेखिका भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक आहेत)

pradnya.kulkarni@dcpune.ac.in

Web Title: Give this year's Diwali a pat on the back!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.