Ginger is useful for beauty treatments... How? | सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर ठरणारं आलं सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे .. ते कसं?

सर्दी खोकल्यासाठी फायदेशीर ठरणारं आलं सौंदर्यासाठीही उपयुक्त आहे .. ते कसं?

- मधुरा जाधव

प्रत्येक शतकांपासून आल्याचा उपयोग औषधी घटक म्हणून केला जात आहे. रोजच्या स्वयंपाकात भाजी, आमटी, उसळी यात चवीसाठी म्हणून घातलं जाणारं आलं घरात मुद्दाम राखून ठेवण्याचीही पद्धत आहे. आजीबाईच्या बटव्यातला महत्त्वाचा घटक म्हणजे आलं. पचनाचे विकार किंवा सर्दी खोकल्यावर आल्याच्या रसाचा औषधासारखा उपयोग केला जातो. पण हेच आलं सौंदर्योपचारातही वापरलं जातं. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी  आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आल्याचा उपयोग होऊ शकतो.
 * आल्यात असलेल्या अँण्टिऑक्सिडण्टमुळे त्वचेच्या समस्यांकरता आल्याचा वापर प्रभावी ठरतो. चेह-यावरचे डाग किंवा व्रण जाण्यासाठी ताज्या आल्याचा एक छोटा तुकडा घ्यावा. तो किसून त्याचा रस काढावा. तो रस डागांवर लावावा. रस सुकू द्यावा. आणि मग चेहरा धुवावा. हा उपाय दिवसातून दोनदा रोज करावा. काही आठवडय़ातच हे डाग पुसट होतात. दिसेनासे होतात.
*  वय वाढताना त्याच्या खुणा सर्वात आधी चेह-यावर दिसतात. वाढणा-या वयाच्या चेह-यावरच्या खुणा लपवण्यासाठी आल्याचा वापर करता येतो. यासाठी ताजं आलं किंवा सुंठाची पूड वापरता येते. आल्याचा रस किंवा सुंठ पावडर, मध आणि लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन एकत्र करावं. हा लेप चेह-यास लावावा. अर्ध्या तासनंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा चमकदार होते. 
*  आल्यामुळे केसांच्या मुळाशी असलेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि त्याचा फायदा केस वाढण्यासाठी होतो. यासाठी किसलेलं आलं आणि जोजोबा ऑइल समप्रमाणात घ्यावं. या मिश्रणानं केसांच्या मुळाशी मसाज करावा. अर्ध्या तासानं केस धुवावेत. 
 * आल्यात अँण्टिसेप्टिक गुणधर्म असतात त्याचा उपयोग केसातील कोंडा घालवण्यासाठी होतो.  यासाठी आल्याचं तेल किंवा किसलेलं आलं घ्यावं. तेल किंवा किसलेलं आलं दोन भाग आणि ऑलिव्ह किंवा तिळाचं तेल तीन भाग घ्यावं. या मिश्रणानं केसांच्या मुळाशी हलक्या हातानं मसाज करावा. 20-25 मिनिटानंतर केस धुवावेत. काही आठवडे नियमित हा प्रयोग केल्यास केसातला कोंडा जातो.                                                                                                                     

Web Title: Ginger is useful for beauty treatments... How?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.