पर्यावरण दिन (world environment day 2025) आला की नेहमीची चर्चा झाडं लावा, कचरा कमी करा, क्लायमेट चेंज आणि तेच सगळं. ऐकायला वाचायला पण टिपिकल वाटतं. आणि मग वर्षभर आपण पर्यावरणाकडे बघत नाही असा फुसका उत्साह काय कामाचा? आपल्याकडे नसेल जमीन, नसेल जागा पण आपल्या घरात आपल्यापुरता हिरवा कोपरा, आपल्या खिडकीत चार कुंड्या हे तरी आपण करु शकतो.
त्यासाठी थोडी इच्छा आणि थोडे कष्ट हवे. शहरी भागात राहणाऱ्या माणसांसाठी म्हणून हा थोडा सोपा पण करुन पाहता येईल असा उपाय.
आपल्याला काय करता येईल?
विचारा स्वत:ला.. आणि आपल्या मुलांनाही आपल्याला शिकवता येईल का पाहा?१.आपल्या बाल्कनीतून दिसणारी किती झाडं आपल्याला ओळखता येतात?२. आपल्या भागातले किती पक्षी, किती कीटक आपण ओळखू शकतो?३. आपण खातो ती आपल्या आवडीची भाजी आपण निदान लहानशी कुंडीत तरी कधी लावून पाहिलेली आहे का?
४. आपण सांगतो का आपल्या मुलांना देशी झाडं कोणती, विदेशी कोणती, जे पालकांनाच माहिती नाही ते मुलांना कसं कळणार?५. मातीत हात घालू नको, इन्फेक्शन होईल हे पाहून वाढणारी आपली मुलं घालतील का मातीत हात? आधी पालकांनी मातीत हात घालून एकतरी रोप कुंडीत लावावं.
६. निसर्ग संयम शिकवतो, आज बी लावलं आणि उद्या फळ मिळालं, असं झट की पट निसर्गात काहीच घडत नसतं. त्यातूनही आपण शिकतो.७. लगेच प्लास्टिक कुंड्या, नर्सरीतून रोपं आणायचीही काही गरज नसते. आपल्या घरातले डबे, फुटके माठ, जुन्या बादल्या पुरेशा आहेत. कुणाकडून तरी मागून आणलेली फांदी, कसलं बी, घरातलीच कडधान्य इथून सुरुवात करु.
७. नेटवर भरपूर व्हिडिओ आहेत. कुंडी कशी भरायची ते आपण शिकू. आपल्या परिसरात, रस्त्याच्या कडेला वगैरे असलेली मातीच बादलीभर उचलून आणू आणि ती वापरु.८. आपल्या लहानशा खिडकीत तरी आपण एक लहानसा हिरवा कोपरा फुलवू. जमेल ते रोप रुजवू. आणि दिवसातले काही क्षण या हिरव्या कोपऱ्यात घालवले तर आपल्यालाही कळेल मातीचं आणि कष्टाचं मोल.