'कडीपत्ता' हा भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य पदार्थ आहे. डाळ, भाजी, आमटीला फोडणी देण्यापासून ते ताज्या कडीपत्त्याचे वेगवेगळे पदार्थ तयार करण्यापर्यंत अनेक प्रकारे कडीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो. पदार्थ कोणताही असो, ताज्या कडीपत्त्याची फोडणी जेवणाची चव दुपटीने वाढवते. बहुतेक प्रत्येक भारतीय घरांमध्ये हमखास कडीपत्ता अगदी दररोज वापरलाच जातो. कडीपत्ता रोजच्या वापरातील असल्याने आपल्यापैकी बहुतेकजण बागेत किंवा कुंडीत कडीपत्त्याचे रोप मोठ्या हौसेने लावतात. परंतू अनेकदा असं होतं की, भरपूर काळजी घेऊनही कडीपत्त्याचे रोप सुकू लागते, त्याची पाने गळतात किंवा नवीन पालवी फुटणे बंद होते किंवा हिरवीगार पानेच येत नाहीत. जर तुमचेही कडीपत्त्याचे झाड काड्यांसारखे झाले असेल आणि त्याला पाने येत नसतील, तर बाजारातील महागडी खते आणण्यापूर्वी तुमच्या स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून पहा(tips and tricks how to keep curry leaf plant green healthy at home).
सुकलेल्या, कोमेजलेल्या कडीपत्त्याच्या रोपासाठी महागडी खतं किंवा केमिकल्स वापरण्याऐवजी घरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पदार्थांपासून केलेले घरगुती उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांच्या मदतीने कडीपत्त्याच्या सुकलेल्या रोपालाही पुन्हा नवसंजीवन देऊ शकतो. योग्य वेळी योग्य पदार्थांचा वापर केल्यास कडीपत्त्याचे रोप पुन्हा ताजेतवाने होते, पानांची वाढ सुरू होते आणि रोप निरोगी राहते. कुंडीतील कडीपत्त्याच्या रोपाला हिरवीगार( how to keep curry leaf plant green and healthy) पाने येण्यासाठी घरगुती उपाय म्हणून नेमक काय करावं ते पाहूयात...
कुंडीतील कडीपत्त्याच्या रोपाला हिरवीगार पाने येण्यासाठी काय करावं?
१. कढीपत्त्याच्या रोपाला नायट्रोजनयुक्त आणि सौम्य आम्लयुक्त माती खूप फायदेशीर ठरते, अशा मातीमध्ये या रोपाची वाढ वेगाने होते.
२. माती खूप जास्त कोरडी राहणे किंवा त्यात नेहमी पाणी साचून राहणे (खूप ओलावा), या दोन्ही गोष्टी रोपासाठी घातक आहेत. मातीतील ओलावा मध्यम असावा, अन्यथा झाड लवकर खराब होऊ शकते.
३. कडीपत्त्याच्या रोपाला कोवळे किंवा हलके ऊन मिळणे आवश्यक असते. कडक उन्हापेक्षा सकाळचे ऊन या झाडासाठी उत्तम असते. तसेच, झाडाला योग्य हवा मिळणे देखील तितकेच गरजेचे आहे.
४. जेव्हा मातीतील आवश्यक पोषक तत्वे संपतात, तेव्हा कढीपत्त्याची पाने पिवळी पडू लागतात आणि झाडाची वाढ पूर्णपणे थांबते. अशा वेळी झाडाला नैसर्गिक खतांची गरज असते.
१. आंबट ताक किंवा दही : कडीपत्त्यासाठी नॅचरल टॉनिक :- कडीपत्त्याच्या रोपासाठी आंबट ताक किंवा दही एखाद्या नैसर्गिक टॉनिकप्रमाणे काम करते. यात असलेल्या घटकांमुळे मातीचा pH स्तर संतुलित राहतो आणि रोपाला आवश्यक असलेले नायट्रोजन मुबलक प्रमाणात मिळते. एक ग्लास पाणी घ्या आणि त्यात दोन ते तीन चमचे आंबट ताक किंवा थोडे आंबट दही मिसळा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि आठवड्यातून एकदा झाडाच्या मुळाशी टाका. काही दिवसांतच पानांवर चमक येईल आणि झाडाला नवीन पालवी फुटू लागेल.
शुगर वाढण्याची भीती विसरा! रोज फक्त १ कप 'ब्लॅक कॉफी', मधुमेहावर रामबाण उपाय - रहाल कायम फिट...
२. एप्सम सॉल्ट : पिवळ्या पानांच्या समस्येवर उपाय :- जर तुमच्या कडीपत्त्याची पाने पिवळी पडून गळत असतील, तर हे मातीतील मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. अशा वेळी एप्सम साल्ट खूप फायदेशीर ठरते. यामुळे रोपाला आवश्यक मॅग्नेशियम मिळते आणि प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) प्रक्रिया सुधारते. एक लिटर पाण्यात एक छोटा चमचा एप्सम सॉल्ट घालून द्रावण तयार करा. हे पाणी महिन्यातून दोनदा झाडाच्या मुळाशी घाला किंवा पानांवर हलका स्प्रे करा. यामुळे झाड पुन्हा हिरवेगार, दाट आणि मजबूत दिसू लागते.
३. वापरलेली चहा पावडर : कडीपत्त्याच्या वाढीसाठी उत्तम खत :- घरात रोज चहा बनल्यानंतर उरलेली चहापत्ती फेकून न देता, ती तुम्ही कढीपत्त्याच्या झाडासाठी वापरू शकता. चहापत्ती हा नायट्रोजनचा एक उत्तम स्रोत आहे. कडीपत्त्याच्या जलद वाढीसाठी आणि फांद्या फुटण्यासाठी नायट्रोजनची खूप गरज असते. वापरलेली चहापत्ती प्रथम स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्या, जेणेकरून त्यातील दूध आणि साखरेचा अंश निघून जाईल. त्यानंतर ही चहापत्ती कडक उन्हात चांगली सुकवून घ्या. महिन्यातून एकदा दोन चमचे ही सुकलेली चहा पावडर कुंडीतील मातीत मिसळा. यामुळे मातीचा दर्जा सुधारतो, ती भुसभुशीत होते आणि झाडाला नवीन फांद्या व फुटवे येऊ लागतात.
४. सूर्यप्रकाश आणि पाण्याचे अचूक प्रमाण :- कडीपत्त्याचे रोप सुदृढ राहण्यासाठी फक्त खत देऊन चालत नाही, तर त्याला मिळणारा सूर्यप्रकाश आणि पाणी यांचा समतोल राखणेही तितकेच गरजेचे आहे. कडीपत्त्याच्या रोपाला दररोज कडक उन्हात ठेवणे चुकीचे आहे. त्याऐवजी, रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे दिवसातून ४ ते ५ तास हलके किंवा कोवळे ऊन मिळेल. अति उष्णतेमुळे झाडाची पाने करपू शकतात. झाडाला तेव्हाच पाणी द्या जेव्हा कुंडीतील वरची माती कोरडी वाटेल. प्रत्येक वेळी खूप जास्त पाणी घातल्याने मुळे सडू शकतात आणि रोप कायमचे खराब होऊ शकते. दर १५ ते २० दिवसांनी कुंडीतील माती एखाद्या खुरप्याच्या साहाय्याने हळुवारपणे वर-खाली करावी. यामुळे मुळांना हवा मिळते आणि रोपाची वाढ चांगली होते.
