Join us  

झाडांना रोज पाणी घालावं का? किती घालावं? सकाळी की सायंकाळी?- हिरव्यागार बागेचे रहस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 2:44 PM

झाडांना पाणी देणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळतं. पण किती पाणी घालावं आणि केव्हा घालावं, हे समजत नाही. त्यामुळे कधी झाडांना अतिपाणी होतं तर कधी झाडं सुकून जातात. 

ठळक मुद्देकुंडीच्या टोकाशी किंवा मातीवर जर शेवाळ किंवा पांढरे फंगस दिसले तर ते झाडांना पाणी जास्त होत आहे, याचे लक्षण आहे.

ज्या व्यक्ती नव्याने गार्डनिंग सुरु करतात किंवा ज्यांना बागकाम करण्यात अचानक इंटरेस्ट येऊ लागतो, अशा व्यक्ती झाडं लावतात तर खरं पण मग झाडांची काळजी कशी घ्यावी, त्यांची निगा कशी राखावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडांना पाणी कधी आणि किती घालावं, हे समजत नाही. त्यामुळे सुरुवातीला झाडं मोठ्या हौशीने लावली तर जातात, पण मग त्यांची योग्य काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे एक तर पाणी जास्त झाल्यामुळे झाडांची पानं पिवळी पडू लागतात किंवा मग पाणी कमी झालं म्हणून झाडं सुकू लागतात. म्हणूनच तर झाडांना कधी आणि किती पाणी घालावं हे जाणून घ्या. 

 

झाडांना कधी आणि किती पाणी घालावं?

१. झाडांना पाणी घालण्याच्या बाबतीतला सगळ्यात पहिला नियम म्हणजे झाडांना कधीही दूपारी पाणी घालू नये. संध्याकाळी किंवा सकाळी लवकर झाडांना पाणी द्यावे. २. झाडांना दररोज पाणी देण्याची गरज नाही. एक दिवसाआड पाणी घातले तरी चालते.३. झाडाच्या पानांची टोके जर पिवळी पडत असतील आणि झाड मलूल दिसत असेल तर झाडांना गरजेपेक्षा जास्त पाणी होत आहे, हे समजून घ्यावे. - झाडांना पाणी कमी पडते आहे, हे ओळखण्याची एक सोपी युक्ती म्हणजे झाडाची पाने हातात घ्या. जर हाताला झाडाचे पाणी कमी वजनाचे, कुरकुरीत वाटले तर ती पाने सुकत चालली आहेत, असे समजावे आणि झाडांना पाणी देणे वाढवावे. - काही फुलझाडांच्या बाबतीत आपण असे पाहतो, की झाडांना कळ्या तर पुरेशा प्रमाणात येतात, पण फुलं उमलत नाहीत. असे झाले तर त्याचे मुख्य कारण म्हणजे झाडाला पाणी जास्त झाले आहे, हे असू शकते. 

 

झाडांची अशीही काळजी घ्या- कुंडीतील पाण्याचा योग्य निचरा होतो की नाही, हे वारंवार तपासत जा.- दर पंधरा दिवसातून एकदा कुंडीतील माती उकरत जावी आणि भुसभुशीत करावी. मात्र हे करताना झाडांच्या मुळांना इजा होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. - झाडाची माती वरून कोरडी दिसत असेल, तरच झाडाला पाणी द्या. माती ओलसर दिसत असेल, तर पाणी देणे टाळावे.- झाडांना सतत पाणी घातल्याने झाडे खराब होतात. त्यामुळे मातीत ओलावा राहील पण पाणी साचून राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे. 

- कुंडीच्या टोकाशी किंवा मातीवर जर शेवाळ किंवा पांढरे फंगस दिसले तर ते झाडांना पाणी जास्त होत आहे, याचे लक्षण आहे. त्यामुळे त्वरीत पाणी घालणे कमी करावे, अन्यथा झाडे खराब होऊ शकतात. - कुंडीच्या तळाशी असलेली माती जर चिकट झाली असेल, तरीही पाणी जास्त होत आहे, असे समजावे.  

टॅग्स :बागकाम टिप्सपाणी